आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञांपैकी महत्वाचा शास्त्रज्ञ म्हणून अल्बर्ट आइनस्टाईनचा उल्लेख केला जातो. त्याचे संशोधन प्रामुख्याने भौतिकशास्त्रात असले तरीही त्याचे संशोधन खगोलशास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षण लहरींपासून ते बुधाच्या कक्षेपर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात उपयोगी पडत आहे.
विशेष सापेक्षता – E = mc^2 – हे स्पष्ट करण्यात मदत करणारे शास्त्रज्ञाचे समीकरण भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञानातही प्रसिद्ध आहे. सापेक्षता सिद्धांत (गुरुत्वाकर्षणाचे स्पष्टीकरण) आणि फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट यासाठी आईन्स्टाईन ओळखला जातो. विशिष्ट परिस्थितीत इलेक्ट्रॉनचे वर्तन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट स्पष्ट करतो. नंतरच्या त्याच्या कार्याबद्दल त्याला १९२१ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आइन्स्टाईनचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म येथे झाला. त्याच्या निवासस्थानी सध्या एक छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार अल्बर्टच्या जन्मानंतर लगेचच आईनस्टाईन कुटुंब म्युनिकला रवाना झाले.
त्याच्या वडिलांना स्वतःचा व्यवसाय चालवण्यात अनेक अडचणी आल्यामुळे त्यांनी व्यवसायाचा गाशा गुंडाळून इटलीमध्ये स्थलांतरित झाले. आईन्स्टाईनचे वडील हर्मन हे इलेक्ट्रोकेमिकल कारखाना चालवत होते आणि त्याची आई पॉलीन यांनी अल्बर्ट आणि त्याची धाकटी बहीण मारिया यांचा सांभाळ केला.
हॅन्स-जोसेफ कुपर यांनी दिलेल्या माहितीनुसार आईन्स्टाईनवर दोन गोष्टींचा खोलवर परिणाम झाला. आईन्स्टाईनला वयाच्या पाचव्या वर्षी कुठून तरी होकायंत्र मिळाले. कुठली तरी अदृश्य शक्ती सुईला विचलित करू शकते यामुळे त्याची उत्सुकता चाळवली गेली. त्याच्यावर प्रभाव निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे भूमितीचे पुस्तक. ते त्याला १२व्या वर्षी मिळाले. तो त्याची पूजाच करत असे.
अल्बर्ट शिक्षणाच्या बाबतीत खूप हुशार वगैरे नव्हता. भौतिकशास्त्र आणि गणितात त्याने प्रावीण्य मिळवले असले तरी इतर विषयांमध्ये ‘सुमार’ दर्जाचा विद्यार्थी होता. अल्बर्टने त्याच्या काही शिक्षकांच्या हुकूमशाही वृत्तीविरुद्ध बंड केले आणि १६ व्या वर्षी शाळा सोडली.
नंतर त्याने झुरिच येथील स्विस फेडरल पॉलिटेक्निक स्कूलसाठी प्रवेश परीक्षा दिली. भौतिकशास्त्र आणि गणितात चांगले गन मिळवूनही इतर विषयात गुण कमी पडल्याने तो अनुत्तीर्ण झाला. नंतर त्याने सन १८९६ मध्ये स्विस पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आणि १९०१ मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित शिकवण्यासाठी डिप्लोमा प्राप्त केला.
हा डिप्लोमा घेऊनही आइन्स्टाईनला अध्यापकाची नोकरी मिळाली नाही. त्याने १९०१ मध्ये बर्न पेटंट कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. तिथे असतानाच, पेटंट अर्जाचे विश्लेषण करताना, त्याने विशेष सापेक्षता आणि भौतिकशास्त्राच्या इतर क्षेत्रांमध्ये त्याचे संशोधन कार्य विकसित केले. त्यामुळे त्याला शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळाली.
आईन्स्टाईनने १९०३ मध्ये झुरिचमधील मिलिव्हा मॅरिक हिच्याशी लग्न केले. त्यांची मुले, हॅन्स अल्बर्ट आणि एडवर्ड यांचा जन्म १९०४ आणि १९१० मध्ये झाला. आईन्स्टाईनला कामानिमित्त अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्याने सन १९०५ मध्ये झुरिच विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आणि त्यानंतर झुरिच (१००९), प्राग (१९११) आणि पुन्हा झुरिच (१९१२) येथे प्राध्यापक पदावर काम केले. पुढे, त्याने कैसर विल्हेल्म फिजिकल इन्स्टिट्यूटचे संचालक आणि बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले.
रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सर आर्थर एडिंग्टन यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी ताऱ्यांची स्थिती मोजण्यासाठी आफ्रिकेतील मोहिमेचे नेतृत्व करताना सन १९१९ मध्ये आइन्स्टाईनच्या संशोधनाला अधिकृत मान्यता दिली. सूर्याभोवती प्रकाश परिवर्तित झाल्याने ताऱ्यांची स्थिती बदलल्याचे त्याच्या संशोधन समूहाला आढळले.
कुप्रसिद्ध नाझी हुकूमशहा एडॉल्फ हिटलर सत्तेवर येईपर्यंत म्हणजेच सन १९३३ पर्यंत आईन्स्टाईन जर्मनीत राहिला. नंतर आपले जर्मन नागरिकत्व सोडले आणि प्रिन्सटन येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करून अमेरिकेला रवाना झाला. तिथेच १९४५ मध्ये तो निवृत्त झाले.
आईन्स्टाईन त्याच्या नंतरच्या काळात भौतिकशास्त्र संशोधकांच्या समुदायात सक्रिय राहिला. त्याने सन १९३९ मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांना पत्र लिहून इशारा दिला की, युरेनियमचा वापर अ*णुबॉ*म्बसाठी केला जाऊ शकतो. आईनस्टाईनच्या आयुष्याच्या उत्तरार्धात क्वांटम सिद्धांताच्या वैधतेबद्दल भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर याच्याशी त्याचे वाद रंगले.
१८ एप्रिल १९५५ रोजी आईनस्टाईनचा मृत्यू झाला. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री (AMNH) नुसार त्याच्या हृदयाजवळ रक्तवाहिनी फुटली. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, आईन्स्टाईनने नकार दिला. “माझी वेळ आली की जायचे आहे. कृत्रिमपणे आयुष्य वाढवणं हे बेचव आहे. माझ्या आयुष्यात मी माझा वाटा उचलला आहे; आता जाण्याची वेळ आली आहे. मी आनंदाने या जगातून निघून जाईन,” असं त्याने त्या डॉक्टरांना सांगितलं.
आईन्स्टाईनच्या मृत्यूनंतर त्याच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. डॉ. हार्वे यांनी शवविच्छेदन करून आईन्स्टाईनने मेंदूच्या ऊतींचे शेकडो पातळ भाग मायक्रोस्कोपच्या स्लाइड्सवर ठेवण्यासाठी कापले आणि अनेक कोनातून मेंदूचे १४ फोटो काढले. त्याने मेंदूचे टिश्यू, स्लाईड्स आणि प्रतिमा सोबत घेतल्या. जेव्हा तो विचिटा, कॅन्सस येथे गेला तेव्हा त्याने मेंदूचे ऊतक, स्लाइड्स आणि प्रतिमा आपल्यासोबत घेतल्या.
पुढील ३० वर्षांमध्ये, हार्वेने इतर काही संशोधकांना विनंती केल्यामुळे त्यांना काही स्लाइड पाठवल्या. उर्वरित मेंदू दोन काचेच्या भांड्यांमध्ये, कधी कधी सायडर बॉक्समध्ये ठेवला. आईन्स्टाईनच्या मेंदूची कथा १९८५ पर्यंत मोठ्या प्रमाणावर चर्चेत नव्हती. डॉ. हार्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आईनस्टाईनच्या मेंदूबद्दल प्रायोगिक न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली.
सन १९९६ मध्ये न्युरोसायन्स लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की, आइनस्टाईनच्या मेंदूचे वजन फक्त १ किलो २३० ग्रॅम आहे. प्रौढ पुरुषांच्या मेंदूचे वजन साधारणपणे १ किलो ४०० ग्राम असते. तसेच, त्याची सेरेब्रल कॉर्टेक्स साधारण मेंदूच्या तुलनेत पातळ होते, परंतु न्यूरॉन्सची घनता जास्त होती.
आइन्स्टाईनचे भौतिकशास्त्रातील संशोधन कार्य महत्वाचे आहे. त्यापैकी काही महत्वाच्या संशोधनांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत
हा सिद्धांत म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची पुनर्रचना आहे. सन १६०० च्या दशकात न्यूटनने गतीचे तीन नियम तयार केले, त्यापैकी गुरुत्वाकर्षण दोन शरीरांमध्ये कसे कार्य करते हे स्पष्ट केले. प्रत्येक वस्तू किती विशाल आहे आणि वस्तू किती अंतरावर आहेत यावर त्यांच्यामधील बल अवलंबून असते. आइन्स्टाईनने दाखवून दिले की, स्पेस-टाइमबद्दल विचार करताना, एखाद्या मोठ्या वस्तूमुळे स्पेस-टाइममध्ये विकृती निर्माण होते.
सामान्य सापेक्षतेने सन २०१९ मध्ये आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या एका सुपरमॅसिव्ह कृष्णविवराचा समावेश असलेल्या प्रयोगात महत्वाचे योगदान दिले आहे.
फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट
सन १९०५ मध्ये आईन्स्टाईनच्या कार्यात प्रकाशाचा विचार फक्त एकाच लहरीऐवजी कणांचा (फोटोन) प्रवाह म्हणून केला जावा, असा विचार केला जात असे.
युनिफाइड फील्ड थिअरी
आइन्स्टाईनने बरीच वर्षे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि गुरुत्वाकर्षणाचे क्षेत्र यामध्ये संशोधन केले. मात्र, त्यात तो अयशस्वी ठरला. भौतिकशास्त्रज्ञ अजूनही या समस्येवर काम करत आहेत.
गुरुत्वीय लहरी
सन २०१६ मध्ये लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (LIGO) ने स्पेस-टाइम रिपल्स शोधले त्याला गुरुत्वाकर्षण लहरी म्हणून ओळखले जातात. या लहरी पृथ्वीपासून सुमारे १. ४ अब्ज प्रकाश-वर्षांवर कृष्णविवर आदळल्यानंतर निर्माण झाल्या.
या प्रयोगशाळेने गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लावण्यापूर्वी सुमारे १०० वर्ष आधी आईनस्टाईनने या लहरी अस्तित्वात असल्याचे भाकीत केले होते. आईनस्टाईनच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताचा तो एक पैलू आहे.
बुधाची कक्षा
बुध हा एक लहान ग्रह आहे. सामान्य सापेक्षतेने हे दाखवून दिले की, स्पेस-टाइमच्या वक्रतेचा बुधाच्या हालचालींवर परिणाम होत आहे आणि त्याची कक्षा बदलत आहे. कोट्यवधी वर्षांपेक्षा जास्त काळ घडत असलेल्या या बदलांमुळे बुध आपल्या सौरमालेतून बाहेर काढला जाऊ शकतो.
ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग
जसे की आकाशगंगा क्लस्टर किंवा ब्लॅक होल यांच्यावरील एक अदृश्य आवरण तिच्याभोवती प्रकाश वाकवते. दुर्बिणीद्वारे त्या प्रदेशाकडे पाहणारे खगोलशास्त्रज्ञ नंतर प्रकाश वाकल्यामुळे, मोठ्या वस्तूच्या मागे थेट वस्तू पाहू शकतात. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आइन्स्टाईन क्रॉस, पेगासस नक्षत्रातील क्वासार: अंदाजे ४०० दशलक्ष प्रकाश-वर्ष दूर असलेली आकाशगंगा क्वासारचा प्रकाश वाकवते ज्यामुळे ती आकाशगंगेभोवती चार वेळा दिसते.
ब्लॅक होल
एप्रिल २०१९ मध्ये, इव्हेंट होरायझन टेलिस्कोपने कृष्णविवराच्या पहिल्या-वहिल्या प्रतिमा दाखवल्या. या प्रतिमांनी पुन्हा सामान्य सापेक्षतेच्या अनेक पैलूंची पुष्टी केली. कृष्णविवरे केवळ अस्तित्वात आहेतच असे नाही तर त्यांच्यामध्ये एक वर्तुळाकार क्षितिज देखील आहे, हे सामान्य सापेक्षता सिद्धान्त कथन करतो.
आईनस्टाईन जितका विद्वान संशोधक होते; तितकाच मोठा विचारवंतही होता. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाने तो भारावलेला होता.
त्याच्याबाबतीतला जपानमध्ये घडलेला किस्सा उल्लेखनीय आहे. जपान दौऱ्यावर असताना हॉटेलच्या खोलीत तो एकटाच लिखाण करत बसला होता. त्याला पार्सल द्यायला कुरियरवाला खोलीत आला. त्याला ‘टीप’ द्यायला सुट्टे मैसे नव्हते म्हणून त्याने एका चिठ्ठीवर स्वतःच्या अक्षरात ‘जीवनमार्ग’ लिहून दिला. ‘कायम यशाच्या मागे धावण्यापेक्षा शांत आणि साधं आयुष्य जागा. तेच तुम्हाला खरा आनंद मिळवून देईल,’ हा जीवनमंत्र त्याने कुरियर घेऊन आलेल्या माणसाला दिला.
तसंच दुसऱ्या कागदावर ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग निघतोच,’ असा विचार लिहून दिला. काही काळापूर्वी या दोन्ही कागदांचा लिलाव करण्यात आला आणि त्यांना तब्बल ११ कोटी डॉलर एवढी किंमत मिळाली.
आजही आईन्स्टाईनच्या संशोधनावर अनेक शास्त्रज्ञ संशोधन करतायत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.