The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

by Nitten Gokhaley
29 May 2026
in विश्लेषण, वैचारिक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


पोलीस स्टेशन आणि चौकी यांच्यातील महत्त्वाचे फरक तुम्हाला माहित आहेत का?

 

“अनेकदा आपल्याला एकाच परिसरात रस्त्यावरून जाताना पोलीस चौकी दिसते आणि थोडे अंतर पुढे गेल्यावर पोलीस स्टेशन. उदाहरणार्थ, कात्रज चौकात सिग्नलजवळ पीएमपी बसस्टॉप शेजारी कात्रज पोलीस चौकी आहे, आणि स्वारगेटच्या दिशेने थोडे पुढे गेले की लगेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दिसते. चौकी असताना मग पोलीस स्टेशनची गरज काय, असा प्रश्न काहींना पडतो. चला, आज आपण पोलीस स्टेशन आणि चौकी मधील फरक जाणून घेऊयात.”

 



“पोलीस ठाणे आणि पोलीस चौकी”

पोलीस ठाणे, अर्थात, पोलीस स्टेशन ही साधारणपणे अनेक मजले आणि खोल्या असलेली स्वतंत्र इमारत असते.  गुन्ह्यांची नोंद करणे आणि तपास करणे यांसारख्या कामांसाठी पोलीस ठाणे हेच मुख्य केंद्रे असते. पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांच्या विविध कागदपत्रांसाठी माहितीची पडताळणी, तसेच, पासपोर्ट संदर्भातील प्रक्रिया पण पार पडल्या जातात. कायद्याची अंमलबजावणी करणे, कोर्टाकडून व सरकारी प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार विविध प्रकरणात चौकशी करणे देखील पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामातला एक भाग असतो. सर्व पोलीस ठाणे गुन्हे आणि संबंधित न्यायालयीन खटल्यांशी निगडित नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवते. प्रत्येक पोलीस ठाण्याचे एक कार्यक्षेत्र असते. अर्थात, त्यांच्यासाठी एक विशिष्ट भौगोलिक भाग किंवा हद्द निश्चित केलेली असते. पोलीस स्टेशनमुळेच त्या विशिष्ट हद्दीतील नागरिक आणि कायदेशीर व्यवस्था यांच्यात एक प्राथमिक दुवा निर्माण होतो. हद्दीतील वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य भाडेकरूंपासून ते अगदी रेकॉर्डवरील गुन्हेगारांपर्यंत (हिस्टरी शीटर्स) सर्वांची नोंद ठेवली जाते.

 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

कोणत्याही पोलीस ठाण्यासाठी ‘जनरल डायरी’ हे कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन आहे. पोलीस यामध्ये आपल्या पाळीदरम्यानच्या (शिफ्टमधील) घडामोडी, घटना, दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, करण्यात आलेला तपास, अटकसत्र, चौकशी आणि इतर घटनांची दैनंदिन नोंद ठेवतात. आरोपींना थोड्यावेळाकरिता स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये कोठड्यांची (लॉकअप्सची) देखील सोय असते. पोलीस ठाण्यातील प्रत्येक खोलीत बसण्याची पुरेशी व्यवस्था असल्याची खात्री करणे पोलीस ठाणे प्रमुखाचे (एसएचओ) कर्तव्य आहे. तरीही, या बाबीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभाग सीसीटीव्ही निगराणीखाली असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक अहवालांनुसार, ६० टक्क्यांहून अधिक पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात.

 

दुसरीकडे, पोलीस चौकी ही एक लहान स्थानिक उप-चौकी (पोस्ट) असते. या चौकीतील अधिकारी चौकीअंतर्गत असलेल्या छोट्या परिसरात कायद्याची अंमलबजावणी व कायदेसुव्यस्था राखणे, परिसरात पाळत ठेवणे, आणि नागरिकांना किरकोळ कागदपत्रांची मदत करणे यांसारखी कामे हाताळतात. कधी कधी पोलीस चौक्यांमध्ये संसाधनांची कमतरता असते. अशा परिस्थितीत, आपली कामे करून घेण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात जावे लागते. व्हीव्हीआयपी हालचालींच्या वेळी, गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी या दोन्ही ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक असते. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्या या शहरी किंवा ग्रामीण नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम्स) आणि गस्त घालणाऱ्या पथकांच्या जाळ्याशी (नेटवर्कशी) जोडलेल्या असतात. एका पोलीस ठाण्यांतर्गत २ ते ६ पोलीस चौक्या असू शकतात, परंतु, मोठ्या शहरांमध्ये हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो.

 

“चौकी आणि पोलीस ठाण्यात उपलब्ध अधिकाऱ्यांचे प्रकार”

पोलीस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर, सब-इन्स्पेक्टर, असिस्टंट सब-इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, स्टेशन रायटर (लेखक)/अंमलदार आणि होम गार्ड्स असे अधिकारी असतात. दुसरीकडे, पोलीस चौकीत मात्र तुलनेने लहान पथक असते. चौकीत सब-इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट सब-इन्स्पेक्टर हे चौकी प्रभारी म्हणून काम सांभाळतात. या पथकात हेड कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, आणि होम गार्ड्स यांचाही समावेश असतो.

 

“पण पोलीस ठाणे असताना पोलीस चौकीची गरज काय?”

पोलीस ठाण्यांची स्थापना ही प्रामुख्याने पोलीस-लोकसंख्या गुणोत्तर आणि पोलीस-क्षेत्र गुणोत्तर, तसेच इतर विविध बाबींचा विचार करून केली जाते. कमी लोकसंख्या असलेल्या भागांमधील पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र (ज्युरीस्डिक्शन) खूप मोठे असते. त्यामुळे, तक्रार दाखल करण्यासाठी अशा भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे, एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यास पोलिसांनाही घटनास्थळी पोचायला लांबचा प्रवास करावा लागतो. अशा वेळेस ‘पोलीस चौक्या’ किंवा ‘उप-केंद्रे’ महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

पोलीस चौक्यांमुळे, नागरिकांना लांबचा प्रवास न करताच विविध घटनांची माहिती देणे आणि आवश्यक मदत मिळवणे शक्य होते. पोलीस चौक्या या स्थानिक समुदाय आणि मुख्य पोलीस ठाणे यांच्यातील दुवा बनून काम करतात. दुर्गम भागांमध्ये एखादी घटना घडल्यास, पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी करण्यास या चौक्या मदत करतात. पोलीस ठाण्यांपासून दूर असलेल्या संवेदनशील भागांवर, तसेच जास्त रहदारीच्या आणि वाहतुकीच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर देखरेख ठेवण्यात या चौक्या पोलिसांना मदत करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस चौक्यांच्या ठिकाणी पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्याचे काम करते; आणि यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास मदत होते. पोलीस ठाण्यांपासून दूर असलेल्या भागांमध्ये, पोलीस चौक्या या पोलिसांसाठी ‘अग्रेसर केंद्र’ म्हणून कार्यरत असतात. मात्र, येथे हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, पोलीस चौक्यांमार्फत दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रशासकीय कामकाज आणि त्यासंबंधीचा तपास मात्र मुख्य पोलीस ठाण्याद्वारेच हाताळला जातो.

 

नवीन पोलीस ठाणे किंवा चौकी कधी स्थापन करण्यात येते? भारतातील जमिनीचा प्रत्येक तुकडा कोणत्या न कोणत्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतो. जर एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर राज्याचा गृह विभाग नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याबाबतची अधिसूचना जारी करतो. तसेच, एखाद्या विशिष्ट भागात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्यास, शहराचे पोलीस प्रमुख किंवा पोलीस अधीक्षक आदेश देऊन तिथे नवीन पोलीस चौकी स्थापन करू शकतात.

 

“दखलपात्र गुन्हा असल्यास चौकीतून गुन्ह्याची नोंद करूनच बाहेर येणे गरजेचे असते का?”

गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्यानंतर, ‘ड्यूटी ऑफिसर’ (साधारणपणे पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक) ‘एफ.आय.आर.’ नोंदवून घेतो. या एफ.आय.आर.ची एक प्रत तक्रारदाराला मोफत दिली जाते. त्यानंतर, संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) तपासाला सुरुवात करण्यासाठी हे प्रकरण एका ‘तपास अधिकाऱ्याकडे’ (सहाय्यक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक) सोपवतात. नंतर, संशयितांना ताब्यात घेतले जाते, प्राथमिक पुरावे गोळा केले जातात आणि आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते. काही वेळा, कामाचा बोजा असल्याने, लेखक उपलब्ध नसल्यामुळे, किंवा काही काळेबेरे असल्याने, एखादा गुन्हा दखलपात्र असूनही अधिकारी एफ.आय.आर. नोंदवून घेण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत, पीडित व्यक्ती योग्य त्या निवारणासाठी पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांकडे दाद मागू शकते. तसेच, पीडित व्यक्ती न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वकिलामार्फत खाजगी तक्रार दाखल करू शकते.

 

“अदखलपात्र गुन्हा असल्यास एनसी किंवा डायरी नोंद चौकीत करता येते का?”

पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांना किरकोळ गुन्ह्यांमध्ये एनसी (अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद) दाखल करण्याचे अधिकार असतात. हे अधिकारी स्टेशन डायरीमध्ये तक्रारीची नोंद करू शकतात आणि त्याबाबतची पोचपावती देखील देऊ शकतात. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते अदखलपात्र गुन्ह्यांचा तपास करू शकत नाहीत.  चौकीतील पोलीस कर्मचारी सहसा सार्वजनिक उपद्रवाच्या तक्रारी आणि परिसरातील शाब्दिक किंवा अहिंसक वादांचे निवारण करतात.

 

“ऐतिहासिक संदर्भ”

तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, पोलीस चौकी आणि पोलीस स्टेशनची संकल्पना किती जुनी आहे?  पोलीस ठाण्यांचा इतिहास पाहिला तर, १७२० पासूनच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्तामध्ये पोलीस स्टेशन आणि ठाणेदार यांची व्यवस्था केली होती. पोलीस चौक्या किंवा उप-केंद्रे ही ब्रिटिश काळापासूनच अस्तित्वात आहेत. १९१२ सालातील दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ऐतिहासिक नोंदींमध्ये अशा पोलीस चौक्या आणि उप-केंद्रांच्या अस्तित्वाचा उल्लेख आढळतो. त्या काळात, दिल्ली पोलीस विभाग हा पंजाब पोलिसाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करत होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा:फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: bharti vidyapeeth police stationcivic rightsfir infogeneral awarenessindian lawinformative articlekatraj chowkyknow your rightslaw and orderlegal awarenesslegal educationmaharashtra policepolice station vs police chowkypolicechowkypolicestationpune police
ShareTweet
Previous Post

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.