आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज आपण वापरत असलेलं इंटरनेट एकेकाळी प्रचंड महाग होतं. वर्षानुवर्षे त्यात बदल होत राहिले आणि टू-जी आलं, मग थ्री-जी. दिवसेंदिवस इंटरनेट स्वस्त आणि वेगवान होत चाललं होतं. थ्री-जी नंतर पुढचा टप्पा होता फोर-जीचा! या फोर-जीच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाचे योगदान एका भारतीय वंशाच्या नागरिकाचे आहे.
१९७१ चे यु*द्ध. भारतासमोर अनेक आव्हाने होती. पूर्व आघाडीवर यु*द्ध जिंकत असलो तरी पश्चिम आघाडी अवघड जात होती. अमेरिकेने पाकिस्तानच्या संरक्षणार्थ आपली न्यूक्लिअर यु*द्धनौका पाठवली होती. पाकिस्तानचं नौदलही जोमात होतं. पण ९ डिसेंबर १९७१ रोजी गुजरातमधील दीवजवळ पाकिस्तानी पाणबुडी – हँगोरने भारतीय नौसेनेची यु*द्धनौका (आयएनएस) – खुकरी बुडवली. दुसऱ्या महायु*द्धानंतर एखाद्या पाणबुडीने यु*द्धनौका बुडवल्याची घटना पहिल्यांदाच घडली होती. १९७१ च्या प्रचंड विजयाच्या धामधुमीत लोकांचे या पराभवाकडे दुर्लक्ष झाले. पण याच पराभवामुळे जगाला फोर-जी आणि फाईव्ह-जी तंत्रज्ञान तुलनेने लवकर वापरायला मिळणार होतं.
या घटनेवरून कदाचित असं वाटेल की यात आपले नौसैनिक किंवा खलाशी कुठेतरी कमी पडले असतील. पण तसं अजिबात नव्हतं. खरंतर ही यु*द्धनौका ब्रिटनची होती, १९५० साली या यु*द्धनौकेला भारतीय नौसेनेत जागा मिळाली. ही यु*द्धनौका २० वर्षे जुनी असल्याने त्यावरील SONAR सिस्टीम कालबाह्य झालीच होती, शिवाय आयएनएस खुकरीवर ॲक्टिव्ह SONAR सिस्टीम होती (म्हणजे आयएनएस खुकरी वरील SONAR सिस्टीम फक्त वेव्ह्स बाहेर पाठवत होती.), तर पाकिस्तानी पाणबुडीवर पॅसिव्ह SONAR सिस्टीम होती, जी फक्त वेव्ह्स सोडत नसत तर समोरून येणाऱ्या वेव्ह्स पकडत देखील असत. त्यामुळे अव्यवस्था झाली.
पाणबुडी असूनही, पीएनएस हँगोरची SONAR सिस्टीम पाण्याखाली चांगली काम करीत होती आणि ती आयएनएस खुकरीच्या प्रोपेलरचा आवाज आधी ओळखू शकली होती. यामुळे पाणबुडीचे स्थान न कळताच आयएनएस खुकरीचा मागोवा घेता येत होता. याउलट, आयएनएस खुकरीचा सोनार पीएनएस हंगोरची अचूक स्थिती निश्चित करू शकत नव्हता, त्यामुळे आयएनएस खुकरीवरील लोकांना उपाययोजना करता आल्या नाहीत. आयएनएस खुकरीला धोक्याची जाणीव झाली तोपर्यंत, पीएनएस हंगोरने आधीच टॉर्पेडो (पाण्यातील मिसाईल) सोडले होते, खुकरीला काही करण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही.
या लढाईतून नौदलाच्या ऑपरेशन्समध्ये प्रगत SONAR सिस्टिम्स आणि अँटी-सबमरीन वॉरफेअरचे महत्त्व भारतीय नौदलाला आणि नेतृत्वाला समजले. पीएनएस हँगोर तंत्रज्ञानात पुढारलेले असल्याने आयएनएस खुकरी बुडाली, यामध्ये नौसैनिकांचे शौर्य कुठेही कमी पडले नाही. पण या घटनेमुळेच प्रगत SONAR प्रणालीची गरज भासू लागली आणि नौदलाने यावर संशोधन सुरु केले.
या संशोधनाच्या नेतृत्वाची जबाबदारी डॉ. अऱोग्यस्वामी पॉलराज यांनी उचलली. भारतीय नौदलात कार्यरत असताना त्यांनी रेडिओ संचार आणि सिग्नल प्रोसेसिंग या क्षेत्रात संशोधन सुरू केले. पुढे त्यांनी MIMO हे वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले, हेच तंत्रज्ञान आज 4G आणि 5G नेटवर्कसाठी मूलभूत तंत्रज्ञान आहे.
MIMO तंत्रज्ञान म्हणजे एकाच वेळी अनेक अँटेना वापरून डेटा ट्रान्सफर करण्याची प्रणाली. यामुळे सिग्नलची गुणवत्ता सुधारते, वेग वाढतो आणि नेटवर्क अधिक कार्यक्षम होते. आज जगभरातील मोबाईल नेटवर्क, WiFi आणि इतर दूरसंचार तंत्रज्ञानात याचा वापर केला जातो.
भारतीय नौदल फक्त लढण्यासाठी ओळखले जात नाही, तर वैज्ञानिक प्रगतीमध्येही त्याचे मोठे योगदान आहे. आयएनएस खुकरीच्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेला हा निर्णय आणि डॉ. पॉलराज यांचे संशोधन यामुळेच आज संपूर्ण जग वेगवान वायरलेस तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे असे म्हटले तरी अतिशयोक्त ठरणार नाही.
डॉ. पॉलराज यांनी केवळ यामध्ये संशोधनच केले नाही, तर त्यांनी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत तीन मोठ्या कंपन्या स्थापन केल्या –
लोस्पॅन वायरलेस (स्थापना – १९९८) – वायरलेस ब्रॉडबँड तंत्रज्ञानासाठी
बेकेम कम्युनिकेशन्स (स्थापना – २००४) – 4G WiMAX च्या विकासासाठी
रासा नेटवर्क्स (स्थापना – २०१४) – नेटवर्क ॲनालिटिक्ससाठी
डॉ. पॉलराज यांना त्यांच्या संशोधनासाठी आणि कार्यासाठी अनेक सन्मान मिळालेले आहेत.
२०१० साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच IEEE अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल मेडल, मार्कोनी प्राईज अँड फेलोशिप, USPTO नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेम हे जागतिक पातळीवरील पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. आजही डॉ. पॉलराज हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रोफेसर एमेरिटस म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या संशोधनामुळे भारताने आणि जगाने संचार क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज आपण वेगवान इंटरनेट वापरत असलो, तरी त्याच्या मुळाशी असलेली ही कथा फारच कमी लोकांना ठाऊक आहे. आता, जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 4G किंवा 5G नेटवर्क वापरताना लक्षात ठेवा की याचे मूळ एका भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या मेहनतीत व संशोधनात आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.