आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दोन राष्ट्रांमध्ये खेळला जाणारा कोणताही सामना हा त्या दोन राष्ट्रांमधील सलोख्याचं प्रतीक मानला जातो. दोन राष्ट्रांच्या संघामध्ये तीव्र स्पर्धा असली तरी खिलाडूवृत्ती जोपासली जाते. अशाच खेळांच्या सामन्यांमध्ये आघाडीवर आहे ऑलिम्पिक क्रीडा सामने. ऑलिम्पिक सामन्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मुख्य ३ प्रकार म्हणजे समर ऑलिम्पिक्स, विंटर ऑलिम्पिक्स आणि पॅरालिंपिक्स. समर (उन्हाळी) ऑलिम्पिक्स दर चार वर्षांनी होतात, तर विंटर (हिवाळी) ऑलिंपिक्स प्रत्येक समर ऑलिंपिक्सनंतर २ वर्षांनी होत असतात. पॅरालिंपिक्स देखील प्रत्येकी चार वर्षांनी समर आणि विंटर ऑलिम्पिक्सनंतर होतात.
ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये अंदाजे ख्रिस्तपूर्व ७७६ साली ऑलिंपिया याठिकाणी झाली. या स्थानाच्या नावावरूनच क्रीडा सामन्यांचे नाव “ऑलिम्पिक” ठेवण्यात आले. हे सामने ग्रीक देवता झ्यूसच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येत होते आणि यात फक्त पुरुष ग्रीकच सहभागी होऊ शकत. सुरुवातीला फक्त एक फूट-रेस होऊन ऑलिंपिक्स एकाच दिवसात संपत होते. कालांतराने या सामन्यांमध्ये लांब उडी, शॉट पुट, भालाफेक, बॉक्सिंग, पँक्रेशन आणि अश्वारोहण अशा स्पर्धा आल्या आणि ते सामने पाच दिवस चालत असत.
इसवी सन ३९३ पर्यंत हे ऑलिम्पिक सामने सुरुच होते. पण ३९३ मध्ये रोमन सम्राट थिओडीसियस (पहिला) याला असे वाटले की हे सामने मूर्तिपूजेचे प्रतीक आहेत, म्हणून त्याने ऑलिम्पिक्सवर बंदी आणली.
आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन ‘पियरे डी कौबर्टिन’ यांनी १८९६ साली ग्रीस येथील अथेन्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर केले. क्रीडा सामन्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सौहार्द व शांतता प्रस्थापित करणे हा त्यांचा हेतू होता. पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक सामन्यात १३ राष्ट्रांमधील २८० खेळाडू सहभागी झाले होते. तेव्हा ऑलिम्पिक्समध्ये ४३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होत्या. १९१३ साली प्रकाशित करण्यात आलेले ऑलिंपिक्सचे चिन्ह अर्थात ऑलिम्पिक रिंग्स या पाच खंडांचे संघटन आणि जगभरातील खेळाडूंचे प्रतीक आहे.

ऑलिम्पिक सामने हे असंख्य क्षणांचे साक्षीदार आहेत. ज्यांमध्ये १९३६ साली पहिल्यांदा झालेल्या टॉर्च रिलेची सुरुवात, १९३६ साली झालेले पहिले दूरदर्शन प्रसारण, १९७२ साली म्युनिक येथे होत असलेल्या ऑलिम्पिक सामन्यावरील द*हश*तवादी ह*ल्ला, अशा घटनांचा समावेश होतो. टॉर्च रिलेमध्ये एक पेटती मशाल ग्रीसमधील ऑलिंपियामधून ज्या देशात ऑलिम्पिक्सचे सामने होणार आहेत तिथे आणली जाते आणि संपूर्ण देशात मिरवली जाते. ही परंपरा प्राचीन आणि आधुनिक ऑलिम्पिक सामन्यांमधील दुव्याचे प्रतीक आहे.
सुमारे १०० वर्षांनंतर पॅरिसला ऑलिम्पिक्सचे सामने आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. याआधी १९२४ साली पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्सचे सामने झाले होते. सध्या सुरु असलेले ऑलिम्पिक्सचे सामने अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काय आहेत ती वैशिष्ट्ये, जाणून घेऊया या लेखातून –
दिग्गज भारतीय खेळाडूंपैकी दोन वेळा पदक जिंकलेल्या पी. व्ही. सिंधू आणि आपल्या कारकिर्दीच्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा टेनिसचा दिग्गज खेळाडू शरथ कमल या दोघांनी ऑलिम्पिकच्या परेड ऑफ नेशन्समध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारतातील एकूण ११२ खेळाडू १६ खेळांमध्ये सहभागी होतील, ज्यामध्ये पाच राखीव खेळाडू देखील असणार आहेत.

पॅरिस शहर विविध पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या पर्यटनस्थळांचा समावेश ऑलिम्पिक्सच्या सामान्यांमध्येही होत आहे. अगदी आयफेल टॉवरपासून ते सीन नदीपर्यंत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ऑलिम्पिक्सचे सामने रंगवले जात आहेत. याशिवाय पॅरिस हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेले शहर आहे. त्यामुळे या ऑलिम्पिक्समध्ये फ्रेंच कला, संगीत, खाद्यपदार्थ आणि फॅशनची रेलचेल असेल. पहिल्यांदाच, ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंची समान संख्या आहे. क्रीडा क्षेत्रातील स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
पॅरिस ऑलिंपिक्समधील सर्फिंगची स्पर्धा सर्वांत आगळीवेगळी असणार आहे. पॅसिफिक महासागराच्या प्रचंड लाटांवर फ्रान्सच्या ताहिती या किनारी प्रदेशात ही स्पर्धा होईल. ताहिती पॅरिसपासून सुमारे १५ हजार किलोमीटर अंतरावर आहे. एखाद्या होस्ट सिटीपासून स्पर्धेचे ठिकाण लांब असण्याचे सर्व रेकॉर्ड्स ताहितीने तोडले आहेत.
या वर्षीच्या ऑलिंपिक्स सामन्यांत एक नवा क्रीडाप्रकार आणला जात आहे, त्याचे नाव आहे “ब्रेकिंग”. “ब्रेकिंग” मुळात हिप-होप संस्कृतीमधून आलंय. यात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी अशा दोन प्रकारच्या स्पर्धा असतील. अनुक्रमे ९ व १० ऑगस्ट रोजी या स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. खेळांच्या बाबतीत आणखी एक विशिष्ट बाब म्हणजे ऑलिम्पिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये सामान्य नागरिकांनाही धावण्याची परवानगी देण्यात आली असून यामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सुमारे ३५ हजार धावपटू सहभागी होतील.
फ्रायजेस हे पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे अधिकृत मॅस्कॉट्स आहेत. हे मॅस्कॉट्स फ्रान्सचे प्रतीक असलेल्या पारंपारिक लहान फ्रिगियन हॅट्सवर आधारित आहेत. फ्रेंच प्रजासत्ताकच्या रूपकात्मक व्यक्तींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते निवडले गेले असे आयोजकांचे म्हणणे आहे.
२०२४ चे ऑलिम्पिक्स हे इतर ऑलिम्पिक्सपेक्षा पर्यावरणपूरक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक्समध्ये कोणत्याही क्रीडापटूच्या खोल्यांमध्ये एअर कंडिशनिंग नसेल. त्याऐवजी, क्रीडापटूंच्या निवासस्थानांच्या इमारती एका नैसर्गिकरित्या थंडावा कायम ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या मदतीने डिझाइन केल्या आहेत, या शिवाय या निवासस्थानांच्या खिडक्या व दारे असे डिझाईन केले गेले आहेत की खेळाडूंना व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल.
ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच, ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर, सीन नदीजवळ झाला. ऑलिम्पिकची ओपनिंग परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू झाली आणि आयफेल टॉवरच्या समोर ट्रोकाडेरो येथे संपली. यावर्षीच्या ऑलिम्पिक्समध्ये ऑलिम्पिक कॉलड्रॉन देखील निराळी असणार आहे.
ऑलिम्पिक कॉलड्रॉन म्हणजे ऑलिम्पिक ज्योत/मशाल ठेवण्यासाठी तयार केलेली अवाढव्य कढई. ही ज्योत उद्घटनाच्या वेळी प्रज्वलित केली जाते आणि सामने संपेपर्यंत अखंड तेवत ठेवली जाते.
२०२४ ची ऑलिम्पिक कॉलड्रॉन मागील ऑलिम्पिक कॉलड्रॉनपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी आहे. सर्वांत मुख्य म्हणजे ती पहिल्यांदाच हॉट एअर बलूनच्या साहाय्याने हवेत तरंगत ठेवण्यात आली असून, ही ज्योत कोणतंही पारंपरिक इंधन न वापरता वीज वापरून प्रज्वलित केली गेली आहे. ऑलिम्पिक ज्योत ठेवलेला हॉट एअर बलून दिवसा ट्यूलरीज गार्डन्समध्ये स्थिर असतो तर संध्याकाळी हवेत ३०-६० मीटर उंचीवर नेला जातो. ऑलिम्पिक कॉलड्रॉनचं हे अतिशय विलोभनीय दृश्य असतं.
तर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ च्या सामन्यांमध्ये भारताने आतापर्यंत (दि. ३० जून २०२४, १९:१५) दोन कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिंपिक्स २०२४ बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे हे कमेंट्स करून नक्की कळवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.