आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युरोपातील अनेक राजे आणि व्यापाऱ्यांना भारताचं आकर्षण निर्माण झालं ते येथील प्रचंड संपत्तीमुळे. भारतभूमीतून एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणणे अतिशयोक्त असले तरी भारतात नैसर्गिक साधनसंपत्तीची कधीच कमतरता नव्हती, मसाल्यांसारखे अन्य पदार्थ निर्यात केल्याने भारतात प्रचंड प्रमाणात सोने-चांदी येत असे. यामुळे भारतातील सम्राटांबरोबरच स्थानिक राजे महाराजे आणि व्यापाऱ्यांची चांदी होत असत. यांशिवाय भारतात सावकारीसारखे उद्योग प्रचंड प्रमाणात होते. भारतभरात असे अनेक सावकार होते, जे राजांना, सरदारांना कर्ज देत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेत असताना तेथील स्थानिक सावकारांकडून कर्ज घेतल्याचे आणि कालांतराने त्यांना हुंडी पाठवल्याचे उल्लेख आहेत.
मध्ययुगीन भारतात देखील असाच एक सावकार होऊन गेला, पण हा सावकार सामान्य नव्हता. तो खुद्द मुघल बादशहाला मोठ्या रकमेचे कर्ज देत असे, एवढेच नाही तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देखील तो मोठ्या प्रमाणात कर्ज देत असे. बंगाल प्रांताची तत्कालीन राजधानी मुर्शिदाबाद येथे आजही त्याचे निवासस्थान सुस्थितीत आहे, या निवासस्थानाचे रूपांतर आता महाकाय संग्रहालयात करण्यात आले आहे. या सावकाराला सर्वत्र ‘जगत सेठ’ नावाने ओळखत असत. तर बादशहाने त्याला ‘फतेह चंद’ ही पदवी दिली होती. याच ‘जगत सेठ’बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
जगत सेठ हा मुळात एक व्यापारी होता. व्यापाराबरोबरच तो सावकारी देखील करत असे. अठराव्या शतकात त्याच्याकडे सुमारे ८.३ लाखांची संपत्ती होती तर आजच्या किंमतीत सांगायचं झाल्यास त्याच्याकडे १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची (१ हजार करोड डॉलर्स) एकूण संपत्ती होती. मुघल बादशाह मुहम्मद शाह याने १७२३ साली ‘जगत सेठ’ला “फतेह चंद” ही पदवी बहाल केली. तो भारतातच नाही तर विदेशातही जगत सेठ नावाने प्रसिद्ध होता, याचाच शब्दशः अर्थ होतो जगाचा शेठ किंवा सावकार, म्हणजेच हे कुटुंब अठराव्या शतकात वर्ल्ड बँक होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
या घराण्याची स्थापना राजस्थानातील नागौर येथील हिरानंद शहा यांनी केली. ते १६५२ साली पाटणा येथे आले होते. हिरानंद शहाचे चिरंजीव आणि जगत सेठचे वडील माणिक चंद अठराव्या शतकाच्या सुरुवातीला व्यापार करण्यासाठी पटण्याहून ढाक्यात आले. माणिक चंद याने नावाबाचे मन जिंकले आणि राजधानी मुर्शिदाबादेत सावकार म्हणून तसेच नावाबाचा मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम सुरु केले.
तत्कालीन मुघल बादशाह फरुख सियर याने १७१२ साली माणिक चंदला “नगर सेठ” ही पदवी दिली. १७१४ साली माणिक चंदचा मृत्यू झाला आणि त्याने आपल्या पुतण्याकडे सगळा कारभार सोपवला. माणिक चंदने त्याला दत्तक घेतले होते. याच्या काळात माणिक चंदच्या कुटुंबात प्रचंड भरभराट झाली. कारण यावेळी या कुटुंबाने फक्त मुघल बादशहाच नाही तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देखील कर्ज पुरवठा केला. ब्रिटीश इतिहासकार रॉबर्ट ओर्मेच्या मते, “मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या या हिंदू व्यापारी कुटुंबाच्या प्रमुखाचा मुर्शिदाबादमधील सरकारवर प्रचंड पगडा होता, त्यांनी मुघलांना आणि ब्रिटिशांना देखील आर्थिक मदत केली.”
जगत सेठ आणि त्याचे कुटुंब जी सावकारी चालवत होते, त्याची तुलना अनेकांनी थेट इंग्लंडच्या बँकेशी केली आहे. बंगालच्या मुघल नावाबाच्या सरकारची अनेक प्रशासकीय कामे या घराण्याने केली, यामध्ये कर गोळा करणे, आर्थिक व्यवस्थापन करणे इत्यादींचा समावेश होता. विशेष म्हणजे या घराण्याने स्वतःची नाणी पाडली आणि त्यांनी अनेक विदेशी कंपन्यांनबरोबर व्यापार केला, यामुळे त्यांच्या संपत्तीत अठराव्या शतकात प्रचंड वाढ झाली. याशिवाय त्यांनी फ्रेंचांना आणि पोर्तुगीजांना स्थानिक भारतीय राजांबरोबर लढण्यासाठी कर्जपुरवठा केला, यामुळे देखील त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली.
एका अहवालानुसार, १७२० साली जगत सेठची संपत्ती ब्रिटिश साम्राज्यापेक्षा जास्त होती. तर काही ब्रिटीश प्रकाशनांनुसार, त्यांच्याकडे इंग्लंडच्या सर्व बँकांच्या एकत्रित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम होती. कलकत्ता, कासीम बाजार, ढाका, हुगळी, पाटणा अशा देशाच्या विविध भागात त्यांची कार्यालये होती, तिथून हे कुटुंब लोकांना कर्ज देत असे. शहरा-शहरांमध्ये व्यापार सुरळीत अंतर्गत संवादाची सुविधा देखील त्यांनी उभी केली होती.
जगत सेठचा बंगला हा राजाचा खजिना मानला जात होता. त्याने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथे आपले वर्चस्व इतके वेगाने वाढवले की त्याच्या कुटुंबाची तुलना युरोपमधील रॉथस्चाइल्ड्सशी होऊ लागली.
१७२२ साली एकदा मुघल साम्राज्यात चलन संकट आले. चांदीच्या नाण्यांच्या कमतरतेमुळे मानवनिर्मित दुष्काळ पडला आणि हजारो लोकांच्या जीवावर हे संकट बेतणार असे दिसत होते. तेव्हा फतेह चंदने बादशहाशी करार करून त्याच्या दिल्लीतील कार्यालयातून हुंडी वाटण्यास सुरुवात केली. जगत सेठने सही केलेल्या हुंडीचे मोल हे चांदीच्या नाण्यांइतकेच होते.
१७४१-४२ च्या सुमारास मराठ्यांनी बंगाल प्रांताच्या आसपास चौथ व सरदेशमुखीसाठी छापे मारायला सुरुवात केली. या मराठ्यांच्या स्वारीच्या वेळी त्यांनी तीन ते चार कोटी नाणी नेली. त्यावेळी ही किंमत सुमारे ३ ते ४ करोड इतकी होती. असे असून देखील बंगालमधील व्यापाऱ्यांना व सावकारांना आपले व्यवसाय करण्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
फतेह चन्दनंतर त्याचा वारसदार मेहताब चंद याने १७४४ साली संपूर्ण व्यवस्था बघायला सुरुवात केली. अलीवर्दी खानाच्या कारकिर्दीत मेहताब चंद आणि त्याचा नातेवाईक महाराज स्वरूप चंद यांच्याकडे प्रचंड ताकद होती. जेव्हा सिराजुद्दौलाने सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांनी शेवटी इंग्रजांशी हातमिळवणी करून त्याच्याविरुद्ध कट रचला. प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफरने नवाब म्हणून पदभार स्वीकारला. १७६३ साली त्याने जगत सेठसह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची ह*त्या घडवून आणली.
या सगळ्या गोंधळात जगत सेठच्या कुटुंबाने ब्रिटिश ईस्ट इंडियाला कर्ज दिले होते ते ईस्ट इंडिया कंपनीला फेडता आले नाही. ब्रिटिश ईस्ट इंडियाशी संपर्क आल्यापासून जगत सेठ कंपनीला दर वर्षी सुमारे ४ लाख रुपयांचे कर्ज देत असे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर तर कंपनीचे सरकारच बरखास्त झाले आणि बंगालसह अखिल हिंदुस्थानावर ब्रिटिश संसदेचा एकछत्री अंमल सुरु झाला.
१९०० च्या दशकापर्यंत, जगत सेठ लोकांच्या दृष्टीकोनातून नाहीसे झाले होते, मुघलांप्रमाणेच त्यांचे वंशज कुठे गेले, त्यांनी काय केलं याबद्दल कोणालाच माहिती नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.