आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काश्मीरच्या संघर्षाबद्दल माहिती नाही असा एखादाच भारतीय असेल. दशकभरापूर्वी किंवा त्याच्याही आधी, सोशल मीडिया नसल्याने जास्त लोकांना या संघर्षाबद्दल माहिती नव्हती. पण आज सर्व गोष्टी माध्यमांमध्ये आहेत. शिवाय पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
१९४७ -४८ साली, काश्मीर नरेशाने विलीनीकरणाच्या पत्रावर सही केल्यानंतरच काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनले आहे. तोपर्यंत उशीर झाला असला तरी काश्मीरचं रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्यावर होती. २७ ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याने श्रीनगरपर्यंत मजल मारली होती.
श्रीनगरला जाण्याचा रस्ता मुझफ्फराबाद-उरी-बारामुल्ला-श्रीनगर असा वायव्येकडून होता. पण ही तिन्ही ठिकाणं पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होती. इकडे दक्षिणेकडून असलेला पठाणकोटपासूनचा रस्ता हा खडतर होता. त्यामुळे भारतातून श्रीनगरला जायचं म्हटल्यास फक्त विमानाचा पर्याय उपलब्ध होता. श्रीनगरच्या एअरफील्डचे महत्त्व ओळखून, श्रीनगर आणि संपूर्ण काश्मीर खोऱ्यावर ताबा मिळवण्यापूर्वी ह*ल्लेखोरांनी ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तसं झालं नाही. यात सर्वांत मोठं योगदान होतं ते मेजर सोमनाथ शर्मा यांचं.
मेजर सोमनाथ शर्मा यांनी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. ३१ जानेवारी १९२३ रोजी जन्मलेले सोमनाथ शर्मा प्रतिष्ठित मेजर जनरल अमरंथ शर्मा यांचे सुपुत्र होते. स्वतंत्र भारतातील सैन्याचा सर्वोच्च सन्मान – परमवीर चक्र मिळवणारे ते पहिले सैन्याधिकारी. २२ फेब्रुवारी १९४२ रोजी त्यांची १९व्या हैदराबाद रेजिमेंटच्या ८व्या बटालियनमध्ये (कालांतराने हीच कुमाऊँ रेजिमेंटची चौथी बटालियन) नियुक्ती झाली.
मेजर सोमनाथ शर्मा – आपल्या कर्तव्याप्रती कसे समर्पण असावे – याचे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी दुसऱ्या महायु*द्धात जपानविरुद्धच्या बर्मा मोहिमेत हेच दाखवून दिले होते. या यु*द्धात त्यांचा एक सैनिक – बहाद्दूर जखमी झाला होता. त्याला चालताही येत नव्हते. सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांकडून त्याला सोडण्याचे आदेश असूनही, मेजर शर्मा यांनी ठामपणे उत्तर दिले, “मी त्याला सोडणार नाही.” त्यांनी बहाद्दूरला आपल्या खांद्यावर घेतले आणि शेवटी त्याचा जीव वाचवला. यातून आपल्याला भारतीय सैन्यावर होत असलेले संस्कार दिसून येतात, कोणत्याही परिस्थितीत आपल्या साथीदाराला सोडायचे नाही!
२२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने ऑपरेशन गुलमर्गद्वारे जम्मू-काश्मीरवर स्थानिक टोळीवाल्यांच्याकरवी आक्र*मण सुरू केले. काश्मीर खोरे बळजबरीने बळकावण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. या लढाईत देखील मेजर सोमनाथ शर्मा यांनी अतुलनीय पराक्रम दाखवला आणि काश्मीर वाचवला, त्याचीच ही कथा.
जम्मू-काश्मीर राज्यात घुसलेल्या ह*ल्लेखोरांना अटकाव करण्यासाठी, भारतीय सैन्याच्या तुकड्या २७ ऑक्टोबर १९४७ रोजी श्रीनगरला ६ डकोटा विमानांनी रवाना झाल्या. भारतीय सैन्याची पहिली तुकडी २७ ऑक्टोबरच्या सकाळी श्रीनगरच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी अगदी वेळेवर पोहोचली.
मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 4 कुमाऊं रेजिमेंटच्या डी कंपनीला ३१ ऑक्टोबर रोजी श्रीनगरला विमानाने नेण्यात आले. हात फ्रॅक्चर झालेला असूनही आणि ऑफिशियली “यु*द्ध करणं शक्य” नसतानाही त्यांनी आपल्या तुकडीसह श्रीनगरला रवाना होण्याचा आग्रह धरला होता. “मी माझ्या (तुकडीतील) सैनिकांना चांगलं ओळखतो, माझ्यापेक्षा चांगलं त्यांना कोणीही ओळखत नाही आणि जर ते युद्धात सहभागी होणारच असतील तर ते माझ्याशिवाय जाणार नाहीत!” असं त्यांचं मत होतं. शेवटी अधिकाऱ्यांनाही त्यांचं ऐकावं लागलं आणि ते श्रीनगरला रवाना झाले.
श्रीनगर एअरफील्डपासून फक्त ५ किमी अंतरावर, बडगाम गावाच्या सभोवताली उंच टेकड्या आहेत. यांवरून एअरफील्डकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांचे रक्षण होत असे. एअरफील्डवर उतरणारे सैनिक आणि रसद सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने या भागावर नियंत्रण राखणे महत्त्वाचे होते. बडगामच्या दिशेने ह*ल्लेखोरांच्या हालचालींच्या अफवा पसरल्या होत्या, तिथली परिस्थिती नाजूक होती. आपली हालचाल भारतीय सैन्याला कळू नये या उद्देशाने ह*ल्लेखोर लहान-लहान गटांमध्ये विभाजित होऊन बडगाममध्ये पोहोचले होते. त्यांनी बडगामवर ह*ल्ला करण्याची आणि तिथून श्रीनगर एअरफील्ड ताब्यात घ्यायची योजना आखली होती. ह*ल्लेखोरांची संख्या सुमारे १ हजार होती.
कॅप्टन रॉनी वुड यांच्या नेतृत्वाखाली 4 कुमाऊच्या अल्फा आणि डेल्टा या दोन तुकड्यांनी बनलेले एक दल ३ नोव्हेंबरच्या पहाटे बडगामला पाठवण्यात आले. कॅप्टन रॉनी वुड यांना त्यांच्या तुकडीला या भागात न्यायचे, तो भाग ताब्यात घेऊन एअरफील्डवर परत जाण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, बडगाम येथे तैनात असलेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांचे सैन्य कमी करण्याचे आदेश मिळाले. या आदेशांन्वये, दुपारी दोनच्या सुमारास मेजर सोमनाथ शर्मा यांनी अल्फा कंपनीला बडगामहून पुन्हा एअरफील्डवर पाठवले. पण त्यांना पुढच्या एक तासासाठी त्यांनी नुकताच जिंकलेला भाग डिफेन्ड करायचा होता.
अल्फा कंपनी बडगाम येथून निघून गेल्यावर जवळच्या कोरड्या पडलेल्या नदीपात्रात तयार केलेल्या खंदकातून जमलेले स्थानिक गावकरी निघून जाऊ लागले. सुरुवातीला मेजर सोमनाथ शर्मा आणि त्यांच्या इतर साथीदारांना वाटले की हे गावकरी आपल्या घरी परतत आहेत. पण तसं नव्हतं. त्यांनी कोणालाही कळू न देता या तुकडीच्या भोवती घेराव घातला होता. यामुळे मेजर सोमनाथ शर्मा आणि त्यांच्या तुकडीतील सैनिकांवर मोठं संकट निर्माण झालं.
तिकडे पाकिस्तानी मेजरने दुपारपर्यंत थांबायचे नाही असे ठरवले होते आणि त्याच्याकडे सुमारे ७०० ह*ल्लेखोर जमताच त्याने ह*ल्ला सुरु केला. मेजर सोमनाथ शर्मा यांच्यासह त्यांच्या तुकडीत सुमारे ९० जणं होते, ह*ल्लेखोरांची संख्या सातपटीने जास्त होती. सात पटीने. अचानक ह*ल्ल्याची सुरुवात मोर्टार आणि हलक्या मशीन गनच्या गोळीबाराने झाली. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या तुकडीने गोळीबाराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करताच, शत्रूच्या मोठ्या सैन्याने दुसऱ्या बाजूने ह*ल्ला केला. मेजर सोमनाथ शर्मा यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं, या ह*ल्ल्याने श्रीनगर शहर आणि एअरफील्ड दोन्हीला धोका निर्माण झाला होता.
मेजर सोमनाथ शर्मा यांची तुकडी ह*ल्ल्याची पहिली लाट थोपवण्यात यशस्वी झाले होते. पण शत्रूची संख्या वाढतच होती. मेजर सोमनाथ शर्मा यांच्या जवानांनी काही फॉरवर्ड पोझिशन्सवरील नियंत्रण गमावले होते, पण त्यांनी आपली पोजिशन सोडली नाही. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी श्रीनगर शहर आणि एअरफील्डचे संरक्षण करण्याचा निर्धार केला होता.
अतिरिक्त सैन्य यायला उशीर होत असल्याने, मेजर शर्मा यांनी जवळ आलेल्या शत्रूंवर हवाई ह*ल्ले करण्यास सांगितले. अफाट शौर्य दाखवत, त्यांनी स्वतः पुढे जाऊन विमानांना अचूकपणे ह*ल्ले करता यावेत यासाठी जमिनीवर फलक लावले. हवाई ह*ल्ला प्रभावी होता, पण यामुळेही शत्रूच्या ह*ल्ल्याचा वेग काही कमी झाला नाही. ही लढाई सुरू असतानाच भारतीय सैनिकांचा दारूगोळा संपू लागला. मेजर शर्मा यांनी ब्रिगेड मुख्यालयाला याची माहिती दिली तेव्हा त्यांनी मेजर शर्मा यांना माघार घेण्याचा सल्ला दिला. पण माघार घेईल ते भारतीय सैन्य कसलं! मेजर शर्मा यांनी स्पष्ट नकार दिला.
मेजर शर्मा ब्रेन गनरच्या शेजारी एका खंदकात होते, त्याला गन लोड करण्यास मदत करत असताना, एक मोर्टार शेल त्यांच्या जवळच असलेल्या उघड्या दारूगोळ्याच्या बॉक्सवर आदळला. प्रचंड स्फोट झाला. हा स्फो*ट कान बधिर करणारा होता, या स्फो*टामुळे मेजर सोमनाथ शर्मा, त्यांचा सहाय्यक, मशीन गनर आणि जवळच उभा असलेला एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) यांचा तात्काळ जीव गेला.
शत्रूची प्रचंड संख्या असूनही, मेजर सोमनाथ शर्मा यांच्या शौर्याने प्रेरित झालेल्या त्यांच्या जवानांना शत्रूंनी जवळून वेढलेले असतानाही सहा तासांहून अधिक काळ त्यांनी पोजिशन मेंटेन्ड ठेवली. पुढे अतिरिक्त सैन्य आलं, पण तो पर्यंत शत्रू मेजर शर्मा यांच्या पोजिशनपर्यंत जवळपास पोहोचलेच होते. आलेल्या अतिरिक्त सैन्याने या ह*ल्लेखोरांचा पराभव केला. मेजर सोमनाथ शर्मा यांचे बलिदान श्रीनगरचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आणि हाच यु*द्धात एक टर्निंग पॉइंट ठरला.
मेजर सोमनाथ शर्मा यांना जरी वीरमरण प्राप्त झालेलं असलं तरी त्यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी शत्रूचं मोठं नुकसान केलं होतं. त्यांनी तीनशेहून अधिक ह*ल्लेखोरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांचा वेग देखील मंदावला. त्यांचा वेग मंदावल्यामुळे अतिरिक्त सैन्याला दिल्ली किंवा भारताच्या इतर भागातून श्रीनगर एअरफील्डवर येण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. मेजर सोमनाथ शर्मा यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांनी भारताला काश्मीर मिळवून दिले.
या विलक्षण शौर्यासाठी, त्यांना स्वतंत्र भारतातील पहिलेच परमवीर चक्र आणि त्यांच्या 4 कुमाऊं बटालियनला ‘श्रीनगर बॅटल ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. आजही श्रीनगर विमानतळावरून बाहेर पडल्यापडल्या नजरेत भरतं ते दिवंगत परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा यांचं स्मारक!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.