आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज व्हाट्सॲप हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. गुड मॉर्निंग मेसेजेसच्या ते शाळा, कॉलेज, कार्यालये, संघटना इत्यादींच्या अधिकृत घोषणांपर्यंत, व्हाट्सॲप एक कॉमन संवादाचे माध्यम बनले आहे. आपण आज संवाद माध्यमांच्या संशोधनाच्या उत्क्रांतीच्या शिखरावर पोहोचलो आहोत. पण ही एका रात्रीत किंवा काही वर्षांत घडलेली क्रांती नाही तर यामागे कित्येक दशकांमध्ये संशोधकांनी केलेला अभ्यास आणि मेहनत आहे.
आजपर्यंत लागलेल्या शोधांमध्ये आपल्याला अनेक अवलियांची नावे घेता येतील, त्यातीलच एक आहे एडिसन. एडिसन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो लाईट बल्बचा शोध. अनेक अथक प्रयत्नांनंतर त्याने बल्बमध्ये कोणता गॅस भरल्याने तसेच कोणती फिलामेंट वापरल्याने दीर्घकाळ प्रकाश पडेल याचा शोध घेतला होता. परंतु आपण आज ज्या शोधाबद्दल बोलणार आहोत तो बल्बबद्दल नाही तर संवादाच्या साधनाबद्दल आहे.
सोळाव्या-सतराव्या शतकात संवादाची साधने उपलब्ध नव्हती, पण वैज्ञानिक प्रगतीबरोबरच माणसाचे भविष्य उज्ज्वल होत गेले आणि एकोणिसाव्या शतकात, १८७६ साली अलेक्सान्डर ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. टेलिफोनबरोबरच टेलिग्राफ, फॅक्स, रेडिओ आणि इतर विविध प्रकारची संवादाची साधने शोधण्यात आली. एखादा शोध लागल्यानंतर त्यावरच खुश होऊन थांबायचं हा मूळ मानवी स्वभाव नाही, त्याउलट उत्क्रांत होत जाणे हा मानवी स्वभाव आहे. या स्वभावानुसार, टेलिफोन तयार केल्यानंतर माणूस तिथेच थांबला नाही तर त्याने पुढची पावलं टाकली.
थॉमस एडिसनच्या मते, टेलिफोनची क्षमता ही तो संभाषण रेकॉर्ड करू शकतो की नाही यावर ठरते. हेच त्याचे मुख्य फिचर आहे. या फीचरशिवाय टेलिफोन म्हणजे निव्वळ गप्पा मारण्याचे साधन होऊन बसेल आणि व्यवसाय चालविण्यासाठी त्याचा पाहिजे तितका प्रभावीपणे वापर होऊ शकणार नाही, हाच विचार करून एडिसनने टेलिफोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फोनोग्राफ नावाचे एक यंत्र तयार केले.
फोनोग्राफ म्हणजे टेलिस्क्राइब या संशोधनाचा पाया. दूरध्वनीवरील संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी फोनोग्राफच्याच तांत्रिक तत्त्वांवर टेलिस्क्राइब तयार केले गेले. अशा प्रकारचे यंत्र बनविण्याचा प्रयत्न एडिसनने याआधीही केला होता. १८७८ साली, एडिसनने “कार्बन टेलिफोन” नावाचे एक यंत्र तयार केले होते. टेलिस्क्राइब तयार करण्याआधी त्याने सुमारे ३७ वर्षे प्रयत्न केले होते. टेलिस्क्राइब ही एक महत्त्वपूर्ण नवकल्पना होती.
ज्याप्रमाणे आजच्या काळातही आपले कॉल्स रेकॉर्ड केले जातात असा एक गैरसमज (?) आहे, तसाच जेव्हा टेलिफोन नवीन होता तेव्हाही हाच संशय व्यक्त केला जात होता. १९०० साली डॅनिश संशोधक व्लादिमिर पोल्सेन याने पातळ तांब्याच्या तारांच्या मोठ्या फिरक्यांवर टेलिफोनवरील कॉल्स रेकॉर्ड करणारे यंत्र शोधून काढले होते, पण ते यंत्र अपेक्षेप्रमाणे काम करीत नव्हते. जी कंपनी या यंत्राची अमेरिकेत विक्री करत होती ती अक्षरशः दिवाळखोर बनली.
एडिसनचे यंत्र मात्र वेगळे आणि कार्यक्षम होते. एडिसनने तयार केलेल्या यंत्रात दोन टेलिफोन रिसिव्हर्स होते. एक रिसिव्हर फोन आल्यानंतर फोनोग्राफमध्ये प्लग करण्यासाठी तर दुसरा रिसिव्हर माईकप्रमाणे होता, ज्याद्वारे आपण बोलू शकतो. एडिसनने असा अंदाज व्यक्त केला होता की एकदा रेकॉर्डिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेणाच्या सिलिंडर्सना रिप्ले करता येईल, ज्यावर ते टेलिफोनिक संभाषण रेकॉर्ड झाले आहे, आणि निश्चितच हा अंदाज बरोबर होता.
जेव्हा एखादा व्यक्ती टेलीस्क्राइब वापरून संदेश लिहित असे, तेव्हा कंडक्टिव्ह टीपने इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण होते ज्यामुळे ट्रान्समिशन यंत्रणा सक्रिय होते. त्यानंतर हा संदेश टेलीग्राफ लाइनवरून इच्छित स्थळी असलेल्या रिसीव्हिंग टेलिस्क्राइब युनिटला पाठवला जातो. संदेश प्राप्त करणाऱ्या युनिटने रिअल-टाइममध्ये संदेश कॉपी होतो, प्राप्तकर्त्यास लिखित सामग्री पाहण्याची आणि रेकॉर्ड करता येते.
जरी टेलीस्क्राइब हा संदेशवहन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती असली तरी, एडिसनच्या इतर काही संशोधनांप्रमाणे ते जास्त प्रमाणात वापरले गेले नाही. खर्च, गुंतागुंत आणि पर्यायी आधुनिक संवाद माध्यमांचा उदय यासारख्या घटकांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली नाही. आणि काही दिवसांतच या उत्पादनाने बाजाराला राम राम ठोकला.
असे असले तरी एका संशोधनातून पुढील संशोधनाचा पाया निर्माण होतो, किंवा एखादे संशोधन पुढील आधुनिक संशोधनांसाठी महत्त्वाचे घटक ठरतात. संदेशवहन तंत्रज्ञानातील या महत्त्वाच्या यंत्राचे संशोधन २४ मे १९१५ रोजी पूर्ण झाले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.