आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२०२४ साली सुरु असलेल्या उन्हाळ्याने असंख्य प्रश्न उभे केले आहेत. जर आत्ताच तापमान ४० डिग्रीच्या पुढे जात असेल तर येणाऱ्या वर्षांत काय होईल याचा विचार आपण केला पाहिजे. गेली कित्येक वर्षे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलासाठी अनेक ठिकाणी सभा आणि कार्यक्रम होत आहेत, पण कोणतीही ठोस पावलं एकही देश अथवा कोणतंही सरकार उचलताना दिसत नाही.
या गोष्टीला अपवाद ठरलंय ते कोलंबिया या देशातील एक छोटेखानी गाव. या गावाचे नाव – पोर्तो नारिनो. पोर्तो नारिनो हे गाव शाश्वत विकासाचा एक आदर्श असून तिथे काही मोजक्याच गाड्या आपल्याला पाहायला मिळतील. असं असलं तरी या गावात अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. पोर्तो नारिनो नक्की काय आहे, जाणून घेऊया या लेखातून.
या गावी जाण्यासाठी मालेकॉन समुद्रकिनाऱ्यावरील एका छोट्या ऑफिसमधून तिकीट विकत घेता येते आणि ॲमेझॉन नदीत तरंगणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या रांगेत उभ्या असलेल्या लाकडी घरांच्या वस्त्यांमधून, बोटीने आपण मार्गक्रमण करतो या स्वच्छ-सुंदर गावाकडे. ही बोट तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडते, पुढचा प्रवास वेगळ्या बोटीने करावा लागतो.
इथे उतरण्यासाठी सिमेंट-विटांनी बनलेला घाट नाही, थेट निसरड्या वाळूवर पाय देऊन उतरावे लागते. दुसऱ्या बोटीत बसल्यावर तुम्ही निघता एका स्वर्गासम प्रवासाला. अमेझॉन नदीच्या विशाल पात्रातून हा प्रवास आहे. दोन्हीकडे निसर्ग सौंदर्याने नटलेले नदीचे तट आणि दुथडी भरून वाहणारी नदी. हे दृश्य अविस्मरणीय आणि अवर्णनीयच.
अमेझॉन नदीच्या तटापासून लेटिसिया आणि प्वेर्तो नारिनो या दोन नगरपालिका वसल्या आहेत. ही दोन्ही शहरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लेटिसिया हे इतर शहरांसारखंच एक गजबजलेलं सीमावर्ती शहर आहे. याउलट, प्वेर्तो नारिनो हा एक शांत, पर्यावरणपूरक विकास असलेलं शहर असून इथे मोटार वाहनांना बंदी आहे आणि रस्ते खूप स्वच्छ आहेत. जगभरातील अनेक मोठ्या शहरांसमोर आदर्श घालून देणारी ही पालिका अतिशय पर्यावरणपूरक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या सर्व उपाययोजना येथील स्थानिक जनता व प्रशासनाच्या संगनमताने अंमलात आणल्या गेल्या आहेत.
पोर्तो नारिनोला पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बोटीने, लेटिसियापासून ॲमेझॉन नदीच्या बाजूने दोन तासांचा निसर्गरम्य प्रवास करून आपण इथे पोहोचतो. जाताना एका बाजूला पेरू देश आणि दुसऱ्या बाजूला कोलंबिया. ऍमेझॉन आणि लोरेटोयाको नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्या बंदरावर पोहोचताच, हे लगेचच स्पष्ट होते की आपण घनदाट जंगलातील एका उल्लेखनीय चौक्यांपैकी एक असलेल्या चौकीवर पोहोचलो आहे.
स्थानिक पातळीवर “कोलंबियाच्या निसर्गाचा पाळणा” म्हणून ओळखले जाणारे प्वेर्तो नारिनो निसर्गाशी सुसंगत राहूनही प्रगती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण आहे. २०१२ साली कोलंबियाच्या वाणिज्य, उद्योग आणि पर्यटन मंत्रालयाने “शाश्वत पर्यटन स्थळ” म्हणून प्रमाणित केलेले ते देशातील पहिले शहर बनले. हवामान बदलाच्या चर्चेत सर्वांच्या तोंडी नाव असलेल्या, धोक्यात आलेल्या पर्जन्यवनांनी या शहराला वेढलेले आहे. इथल्या आजूबाजूचे वनक्षेत्र हवामानबदलामुळे धोक्यात आले आहे, त्यामुळे अनेक अभ्यासक या क्षेत्राला भेटी देत असतात.
झाडाझुडपांनी नटलेले, नीटनेटके टेराकोटाचे फुटपाथ, आकर्षक लाकडी घरे, विलक्षण भित्तीचित्रे आणि लक्षवेधी हस्तकलेने सजलेली घरे यांमुळे इथे स्थानिक अमेरिकन लोकसंख्या जास्त आहे हे प्रकर्षाने जाणवते. इथल्या ६ हजार रहिवाशांपैकी सुमारे ८०% रहिवासी टिकुना, कोकामा आणि यागुआ या वांशिक गटातील आहेत. इथे कार आणि मोटारसायकलवर बंदी असून गावात रस्ते देखील नाहीत. इथे फक्त दोन रजिस्टर्ड गाड्या पाहायला मिळतात, कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर आणि इमर्जन्सीसाठी एक रुग्णवाहिका. जवळजवळ प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर कचऱ्यासाठी डबे ठेवलेले आहेत.
१५ हजार कोलंबियन पेसो (३ युरोज) प्रवेश कर भरल्यानंतर, या शहरात प्रवेश मिळतो. परिसरातील इतर गावांप्रमाणे अस्वच्छ असं हे गाव अजिबात नाही. याउलट तेथे रंगीबेरंगी हस्तकला आणि कासव, गुलाबी डॉल्फिन, पोपट यांसारख्या स्थानिक वन्यजीवांच्या पुतळ्यांची विक्री करणारी दुकाने आहेत, त्या दुकानांसमोर योग्य प्रमाणात गवत वाढवलेले असते.
१९६१ साली स्थापन झालेल्या, प्वेर्तो नारिनोमध्ये प्रामुख्याने स्वदेशी लोक राहतात, ते या प्रदेशात शतकानुशतके वैशिष्ट्यपूर्ण लाँगहाऊसमध्ये राहत होते. इथल्या निसर्गरम्य आणि प्रदूषणविरहित वातावरणामुळे अनेक लोक येथे सुट्ट्यांसाठी येऊ लागले आणि याठिकाणी पर्यटनविकास होऊ लागला.
“१९८० आणि ९० च्या दशकापासून, शहरात अनेक पर्यटक येण्यास सुरुवात झाली, त्यावेळी ते अगदी नगण्य सुविधांसह असलेल्या लाकडी हॉटेल्समध्ये राहत असत, २००० च्या दशकाच्या सुरूवातीस पर्यटकांची संख्या वाढू लागली, 2004 मध्ये, तत्कालीन महापौर एडिलबर्टो सुआरेझ पिंटो यांनी शाश्वत विकासाचा एक नवा दृष्टिकोन अंमलात आणण्यास सुरुवात केली, त्यांनी हे क्षेत्र सुशोभित करण्यासाठी कठोर परिश्रम केले, स्थानिक लोकांमध्ये पर्यटनाबद्दल आणखी जागृती आणली आणि पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले.” असे नगरपालिकेतील पर्यटनाचे नेते लुझ जेनी टोरेस म्हणतात.
तेथील स्थानिकांना पर्यावरणाची अशी काळजी घेणे हे काही नवीन नाही. अगदी कोलंबसच्या आधीपासून या भागातील स्थानिक लोक अशा प्रकारची पर्यावरणपूरक शेती करत आहेत. ते जमिनीच्या लहान लहान भूखंडावर उगवणारी झाडे-झुडपे कापून जमीन साफ करतात आणि कोरड्या हंगामात पिके घेतात. अशाप्रकारे ही जमीन काही काळ वापरली जाते, परंतु नंतर रिकामी देखील ठेवली जाते, जेणेकरून मातीला आपली पोषक तत्त्वे परत मिळू शकतील.
येथील शेतकरी कुटुंबे स्वत:साठी पुरेसे अन्न पिकवतात आणि बाकीचं बाजारात विकतात. बाजारामध्ये तुम्हाला कसावा, मिरची, कांदा, स्क्वॅश, चिकोरी, केळी, पपई, आंबा यांसारखी फळे पाहायला मिळतील. विशेष म्हणजे जर तुम्ही या गावातील कोणत्याही हॉटेलमध्ये जेवण केले तर तुम्ही तिथलाच शेतमाल खाणार आहात. अगदी प्वेर्तो नारिनोचे सर्वात फॅन्सी हॉटेल – वैरा सेल्वा याच बाजारातून बहुतेक साहित्य खरेदी करते. येथे तुम्हाला ॲमेझॉन फिश देखील पाहायला मिळेल, जो या प्रदेशातील सर्वांत मोठा प्रोटीन सोर्स आहे. आजूबाजूच्या नद्यांमध्ये कॅटफिश, पिरान्हा आणि पिरारुकु या माशांसह ६८ प्रजाती आहेत.
शांततापूर्ण, ट्रॅफिक आणि रहदारीमुक्त प्वेर्तो नारिनो येथील रात्रीचा काळ ताजेतवाने करतो. लोकांच्या सहकार्याने चालणारे हे शहर जगातील सर्वात मोठ्या रेनफॉरेस्टच्या मध्यभागी असल्याने एक निरव शांतता तेथे अनुभवायला मिळते. हे एकटं पर्यावरणपूरक शहर कदाचित ॲमेझॉनला भेडसावणाऱ्या सर्व पर्यावरणीय समस्या सोडवू शकणार नाही, परंतु ही एक आशादायक सुरुवात आणि आदर्श योजना तर नक्कीच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.