आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हल्ली परीक्षा, झोपण्याची वेळ, कार्यालयीन कामकाजाची वेळ, अशा निवडक वेळा सोडल्यास प्रत्येक जण फावल्या वेळात हमखास मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला दिसतो. अगदी हॉटेल किंवा चहाच्या टपरीवर देखील आपण दिलेली ऑर्डर येईपर्यंत अनेक लोक मोबाईलमध्ये व्यस्त राहणं पसंत करतात. मोबाइलमध्येही काही विशेष, उपयोगाच्या गोष्टी नाही तर निव्वळ मनोरंजनासाठी रिल्स स्क्रोल केल्या जातात. याशिवाय क्वचितच काम मोबाईलमध्ये असतं.
भारतात गलोगल्ली असलेल्या चहाच्या दुकानांवर, टपऱ्यांवर, हॉटेल्समध्ये असं चित्र पाहायला मिळण्यात काहीच नवल नाही. चहा तयार होईपर्यंत किंवा आपला नंबर येईपर्यंत प्रत्येक जण मोबाईल वापरत असतो, हीच गोष्ट नाशिकमधील एका आज्जीने मनावर घेतली. सुमारे ७० वर्षे वय असलेल्या जोंधळे आज्जी मुंबई-आग्रा महामार्गालगत चहाचे दुकान चालवून उदरनिर्वाह करायच्या. त्यांच्या दुकानावर चहा प्यायला येणारे लोक चहा तयार होईपर्यंत मोबाईल बघत वेळ व्यतीत करत असत. या आज्जींना लहानपणापासूनच वाचनाची फार आवड, त्यामुळे लोक असे मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले त्यांना अजिबात रुचत नसे, यावर त्यांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला आणि यातूनच २०१५ साली तयार झालं – आज्जीच्या पुस्तकांचं हॉटेल.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ – मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या या आज्जीच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये चांगली रेलचेल असते, चविष्ट जेवणाबरोबरच इथे तुम्हाला हजारो पुस्तकं बघायला मिळतील. ७४ वर्षीय जोंधळे आज्जींनी सुरु केलेल्या या हॉटेलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांची सुमारे ५ हजार पुस्तके उपलब्ध आहेत.
पण इथपर्यंत पोहचणं सोपं नव्हतं, यासाठी त्यांनी अनेक संघर्षाचे दिवस पहिले. नेमका कसा होता हा प्रवास जाणून घेऊया..
सहावी इयत्तेत असताना त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्यांना वाचनाची आणि विशेषतः अभ्यासाची आवड होती, पण तरीही लग्न झाल्यामुळे त्यांना पुढे शिकता आलं नाही. त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्यातही अनेक संकटं होती, घरी सुमारे २० एकर जमीन असली तरी नवऱ्याने दारूसाठी सुमारे १८ एकर जमीन विकून खाल्ली. उरलेल्या दोन एकरच्या जमिनीवर कष्ट-मशागत करून जोंधळे आज्जींनी संसाराचा गाडा हाकला.
संघर्षाच्या काळात त्या अगदी एकट्या पडल्या होत्या, पण मुलावरचे प्रेम आणि संसाराची जबाबदारी या दोन गोष्टींनी त्यांना सतत कार्यरत राहण्यास ऊर्जा दिली. त्यांचा मुलगा प्रवीण शिकून मोठा होत होता. प्रवीणच्या मनात आपल्या आईबद्दल प्रचंड आदर आहे, आपली आई एकाच वेळी शेतातील कामेही करत असे व घरही सांभाळत असे याचे त्याला अप्रूप वाटते. सगळं काही सुरळीत सुरु असताना एक दिवस या माय-लेकांच्या आयुष्यात आणखी एका संकटाने भर घातली.
जोंधळेंच्या वावराजवळच एक कारखाना सुरू झाला. या कारखान्यातील रसायने वावरात पसरू लागल्याने त्यांच्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला. त्यावेळी आज्जींनी स्थानिक पंचायत प्रशासनाकडे आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीप्रमाणे “काळ्या इंग्रजांच्या” या प्रशासनाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण आज्जींनी हार मानली नाही. जितकं उत्पादन पदरात होतं, ते आणि सगळी जमीन विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि याच पैशांतून महामार्गालगत चहाचे दुकान सुरु केले. यावरून त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी टोम्बणे मारले, पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
आज्जींचा मुलगा प्रवीण. त्याला शिक्षणासाठी वडिलांचा पाठिंबा नव्हता आणि दहावी झाल्यानंतर वडिलांनी त्याला शिक्षण सोडण्याचा आग्रह केला. तरीही, त्याच्या आईनेच त्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. घरात आर्थिक अडचणी असल्याने प्रवीणने शिक्षणासाठी तसेच घरी मदत करण्यासाठी वर्तमानपत्र विकण्याचे काम हाती घेतले.
कालांतराने प्रवीण यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि स्थानिक वृत्तपत्र संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी नोकरी सोडून एक छोटे पब्लिशिंग हाऊस सुरू केले. आता, हे पब्लिशिंग हाऊस चालवण्याव्यतिरिक्त, ते आईला हॉटेल चालवण्यात देखील मदत करतात.
हॉटेलची सुरुवात फक्त ५० पुस्तकांनी झाली होती पण आता पुस्तकांची संख्या ५,००० पेक्षा जास्त आहे. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठी पुस्तके ठेवली होती पण या उपक्रमाचे यश पाहून त्यांनी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकेही ठेवण्यास सुरुवात केली. आधी त्यांनी या उपक्रमासाठी स्वतःची पुस्तके वापरली पण नंतर लोकही पुस्तकं दान देऊ लागले. हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर लागणाऱ्या वेळेत ते लोकांना पुस्तकं वाचण्यास प्रेरित करतात. त्यांच्या या उपक्रमाचा परिणाम असा झाला की, या हॉटेलला दररोज सुमारे १०० लोक भेट देतात आणि त्यापैकी बहुतेक लोक त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत असताना पुस्तके वाचतात.
जागतिक महिला दिवस, गणतंत्र दिवस अशा निवडक प्रसंगी ते पुस्तकं मोफतही देतात. त्यांनी रुग्णालयांना देखील मोफत पुस्तकांचे वाटप सुरू केले आहे.
“माझ्या तरुणपणी किंवा लहानपणी मला फारसा अभ्यास करता आला नाही, पण जेव्हा लोक हॉटेलमध्ये येतात आणि पुस्तके वाचतात तेव्हा मला खूप आनंद होतो..” असं जोंधळे आज्जी अगदी हसतमुखाने सांगतात. कधी नाशिकला गेलात तर या आज्जींच्या पुस्तकांच्या हॉटेलला नक्की भेट द्या. तुम्ही येथे पार्टी सेलिब्रेशन, कॉर्पोरेट मिटींग्स, टॉक शो असे अनेकविध उपक्रम देखील आयोजित करू शकता.
हॉटेलचा पत्ता : टेंथ माईल, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, ओझर (मिग), नाशिक – ४२२००६
संपर्क क्रमांक : 7588195577
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.