आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपण अनेकदा जहाज गायब होण्याच्या कथा ऐकल्या आहेत. त्यापैकीच एक कथा म्हणजे फ्लायिंग डचमॅन जहाजाची. पण ही कथा काही वर्षे जुनी असल्याने त्याची सत्यासत्यता पडताळून पाहणे अवघड आहे. अनेकदा अशा रहस्यमयी घटना घडलेल्या आपण ऐकल्या असतील. अशीच एक रहस्यमयी घटना घडली एका विमानाच्या बाबतीत. हे विमान गायब झालं आणि काही वर्षांनी परतलंही. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून..
२ जुलै १९५५ रोजी न्यू यॉर्क शहरातून पॅन अमेरिका फ्लाईट – 914 ने उड्डाण केले. या फ्लाईटमध्ये ५७ प्रवाशांसह ६ क्रू-मेम्बर्स होते. असे एकूण ६१ लोक न्यू यॉर्क शहरातून फ्लोरिडा येथील मायामी शहरात जाणार होते. सुट्टीचा काळ असल्याने अनेक प्रवासी त्याठिकाणी हॉलिडेज साजरे करण्यासाठी जात होते. फ्लाईट साधारणतः तीन तासांमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. पण मायामी येथे ते विमान लँड झालंच नाही.
बराच वेळ जाऊनही विमानाचं लँडिंग नाही झालं म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी प्लेन क्रॅश होण्याची शक्यता होती अशा सर्व ठिकाणी सरकारने शोध मोहीम राबवली. पण कोणत्याही ठिकाणी, जमिनीवर किंवा समुद्रात या विमानाचे अवशेष अथवा त्यातील प्रवाशांचा थांगपत्ता लागू शकला नाही. या घटनेनंतर अमेरिकेने या विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट केले होते.
१९८५ साली मात्र या स्टोरीमध्ये ट्विस्ट आला..!
९ मार्च १९८५ साली वेनेंझुएलाची राजधानी असलेल्या कारकस येथील एअरपोर्टच्या रडारवर अचानक एक अज्ञात विमान दिसू लागलं. त्या दिवशी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ज्या अधिकाऱ्याने ते विमान पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण ते विमान पूर्णतः जुन्या बनावटीचं होतं. त्यात आधुनिक टर्बाइन्सऐवजी प्रोपेलर्स वापरले गेले होते, जे त्यावेळी संपूर्णतः कालबाह्य होते.
कारकस येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी फ्लाईटमधील क्रू बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “आम्हांला मायामीला जायचे आहे” असे त्यांनी सांगितले. पण हे ठिकाण मायामीपासून सुमारे ११०० मैल लांबीवर होतं. “तुम्ही तुमच्या फ्लाईटबद्दल अधिक माहिती देऊ शकाल काय?” असं विचारल्यावर पायलटने “आमच्या फ्लाईटमध्ये ५७ प्रवासी असून २ जुलै १९५५ रोजी आम्ही न्यू यॉर्क शहरातून उड्डाण केले आहे…” असे उद्गार पायलटने काढले.
एअर ट्रॅफिक कंट्रोलने लँडिंग करायला सांगितल्यानंतर ही फ्लाईट लँड झाली आणि ती दुसरी तिसरी कोणतीही फ्लाईट नसून पॅन अमेरिका फ्लाईट – 914 होती! एअर ट्रॅफिक कंट्रोलने सुरक्षा रक्षकांना पाचारण केल्याचे कळताच पायलटने विमानाला एअरपोर्टच्या गेटकडे नेले. विमानतळावर उपस्थित ग्राउंड हँडलर्सनी विमानातील अनेक प्रवाशांना किंचाळताना आणि आश्चर्याने बाहेर पाहताना पाहिल्याचे सांगितले जाते. याचवेळी पायलटने खिडकीतून एक कॅलेंडर टाकले आणि विमानाला पुन्हा रनवेकडे नेले. जसं हे विमान अचानक कारकस येथील एअरपोर्टवर आलं तसंच पुन्हा टेक ऑफ करून गायबही झालं.
या घटनेनंतर अमेरिकन आणि वेनेंझुएलाच्या सरकारने कारकस एअरपोर्टवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलची रेकॉर्डिंग्स आणि पायलटने टाकलेले कॅलेण्डर जप्त केले असून एवढ्या दशकांमध्ये आजपर्यंत या घटनेवर भाष्य करण्यास नकार देत आले आहे. नेमकं काय घडलं पॅन अमेरिका फ्लाईट – 914 या विमानाबरोबर?
काहींच्या मते वेनेंझुएला याठिकाणी घडलेली ही घटना २१ डिसेंबर १९९२ रोजी घडली होती. खरंतर १९८५ साली घडलेली ही घटना वीकली वर्ल्ड न्यूज नावाच्या एका वृत्तपत्राने समोर आणली होती. हे वृत्तपत्र त्यावेळी अशाच प्रकारचे साय-फाय स्टोरीज आणि कॉन्स्पिरसी थिअरीज प्रकाशित करीत असे. १९९० च्या दशकातही याच वृत्तपत्राने हीच स्टोरी पुन्हा एकदा आणली आणि यावेळी विमान २१ डिसेंबर १९९२ रोजी लँड झाले असे दाखवण्यात आले.
ही स्टोरी गेली अनेक दशके इंटरनेटवर वायरल होत आहे. यूएफओ, टाइम-ट्रॅव्हल, सरकारी प्रयोग असे अनेक कंगोरे या कथेला दिले जातात. त्यांमध्ये सर्वांत लोकप्रिय कॉन्स्पिरसी थेअरी म्हणजे या फ्लाईटने चुकून टाइम पोर्टल किंवा वॉर्महोलमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी मायामीमध्ये उतरण्याऐवजी ती फ्लाईट ३० वर्षे भविष्यात, वेनेंझुएला येथे पोहोचली. त्यानंतर पुन्हा त्या विमानाने अशाच वॉर्महोल किंवा टाइम पोर्टलमध्ये प्रवेश केला. परंतु या कॉन्स्पिरसी थिअरीजना कोणत्याही ठोस पुराव्यांचा आधार नाही.
असं असलं तरी पॅन अमेरिका फ्लाईट – 914 चे प्रकरण हे एव्हिएशन क्षेत्रातील सर्वांत मोठं कोड्यात टाकणारं प्रकरण आहे. शेकडो कॉन्स्पिरसी थिअरीज असल्या तरी १९५५ साली बेपत्ता झालेल्या त्या विमानाबद्दल आणि त्यातील जवळपास ६० प्रवाशांबद्दल कोणतेही ठोस पुरावे आजमितीस उपलब्ध नाहीत. पॅन अमेरिका फ्लाईट – 914 चे प्रकरण २ जुलै १९५५ रोजी त्याच्या टेक-ऑफ बरोबर सुरु होत नाही तर वीकली वर्ल्ड न्यूजमधील बातमीने त्याची सुरुवात होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
एव्हिएशन क्षेत्रातील हे सर्वांत मोठं रहस्य मात्र येणाऱ्या अनेक पिढ्यांना विचार करण्यास भाग पाडेल हे निश्चित..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.