आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. असाच प्रकार एकेकाळी इन्वेस्टमेन्टच्या क्षेत्रात घडला होता. तेव्हा कोणत्याही क्षेत्रात उतावीळ होऊन सगळं एकदम खायचा प्रयत्न करण्यापेक्षा धैर्यशीलता महत्त्वाची ठरते.
वॉरेन बफे हे नाव माहिती नाही असा युवक सापडणे आज कठीण आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेला वॉरेन बफे आपल्या श्रीमंतीबरोबरच केलेल्या इन्वेस्ट्मेन्ट स्ट्रॅटेजीसाठीही प्रसिद्ध आहे. आज वॉरेन बफेच्या पावलावर पाऊल टाकत अनेक तरुण-तरुणी स्टॉक मार्केट आणि इन्वेस्टमेन्टच्या दिशेने जात आहेत.
चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे आज बर्कशायर हॅथवे कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. खरंतर ही कंपनी त्यांच्याआधीही अस्तित्वात होती. पण चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे यांनी या कंपनीला ॲक्वायर करून एक नवी दिशा देण्याचं काम केलं. कंपनीच्या पार्टनर्समध्ये चार्ली मुंगेर आणि वॉरेन बफे यांच्यासह अजून एक व्यक्ती होती. मधल्या काळात त्या व्यक्तीची आर्थिक वाताहात झाल्याने आज क्वचित जणांनाच त्यांच्याबद्दल माहिती आहे. रिक गेरीन असं त्याचं नाव. ‘सुपरइन्वेस्टर ऑफ ग्रॅमे अँड डॉडसविले’ या लेखामध्ये वॉरेन बफे यांनी रिकचा उल्लेख केल्याचे आढळून येते.
वॉरेन बफेच्या समवयस्क असलेला रिक चार्ली मुंगेरपेक्षा सहा वर्षांनी लहान होता. त्याने आपले बालपण वडिलांसोबत घालवले आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून गणितामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रिकने कोणत्याही प्रकारचे व्यवसाय-संबंधी शिक्षण घेतले नसले तरी त्याने या क्षेत्रत उल्लेखनीय कामगिरी केली होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिकने अमेरिकन वायु दलात प्रवेश घेतला आणि आपले प्रशिक्षण पूर्ण केले. पण काही कारणास्तव त्याने वायु दलालाही रामराम ठोकला.
यानंतर रिकने पुढील ३ वर्षे आयबीएम या प्रतिष्ठित कंपनीत सेल्समन म्हणून काम केले. त्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षं त्याने कॅलिफोर्नियाच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये स्टॉक ब्रोकर म्हणून काम केले. या पाच ते सहा वर्षांच्या काळात रिकचे मोठ-मोठ्या लोकांसोबत उठणे-बसणे होत असत. यामध्ये हॉलिवूडच्या कलाकारांपासून अनेक उद्योगपतींचाही समावेश होता. एकदातर रिकने चार्लटन हेस्टन नावाच्या हॉलिवूडच्या कलाकाराला ते स्टॉक एक्सचेंज दाखवण्यासाठी आणले होते.
कॅलिफोर्नियन स्टॉक एक्सचेंजने रिकच्या आयुष्याला एक वेगळे वळण देण्याचे काम केले होते. या स्टॉक एक्सचेंजमध्येच त्याची भेट उद्योगपती आणि इन्व्हेस्टर चार्ली मुंगेरशी झाली. पुढील घटनाक्रम जाणून घेण्याआधी आपल्याला चार्ली मुंगेरच्या भूतकाळात डोकवावं लागेल. वडिलांच्या मृत्यूनंतर चार्ली मुंगेर ओमाहाला गेला होता, तेथेच त्याची आणि वॉरेन बफेची भेट झाली.
काही वर्षांनी चार्ली मुंगेर कॅलिफोर्नियाला परतला. कॅलिफोर्नियाला परत आल्यानंतर चार्लीने त्याचा मित्र जॅक व्हीलरला ‘व्हॅल्यू इन्वेस्टींग’बद्दल सांगितले आणि त्याला त्याची ट्रेडिंग कंपनी विकून या क्षेत्रात यायचे फायदे पटवून दिले. जॅक व्हीलरला व्हॅल्यू इन्वेस्टींगची कल्पना पटली होती आणि ती व्यवहार्य देखील होती. म्हणूनच त्याने आपली ट्रेडिंग कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आणि ती कंपनी १९६२ साली रिक गेरीनला विकली.
रिककडे त्यावेळी फक्त ४० हजार डॉलर्स होते. ते देखील त्याने ही कंपनी विकत घेण्यात वाया घालवले होते. या आर्थिक तोट्यातून बाहेर यायला रिकला तब्बल तीन वर्षे लागली. पण या तीन वर्षांमध्ये रिक सतत चार्ली मुंगेरच्या संपर्कात राहून त्याच्याकडून इन्व्हेस्टमेंट आणि आर्थिक व्यवहारांबद्दल बरंच काही शिकत होता. याच काळात तिकडे ओमाहामध्ये वॉरेन बफेने बर्कशायर हॅथवे कंपनीचे स्टॉक्स विकत घेण्यास सुरुवात केली होती.
आर्थिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर १९६५ साली रिकने “पॅसिफिक पार्टनर्स लिमिटेड” या नावाने कंपनी सुरु केली. काही काळाने रिककडे ‘ब्लू चिप स्टॅम्प्स’ नावाच्या कंपनीची माहिती आली. त्याने लगेचच त्या कंपनीबद्दल चार्ली मुंगेरला सांगितले आणि चार्ली मुंगेरने ही माहिती वॉरेन बफेपर्यंत पोहोचवली. तिघांचे एकमत झाले आणि तिघांनी मिळून या कंपनीतील शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले. पुढे याच कंपनीच्या मदतीने त्यांनी बास्को फायनॅन्शियल, बफेलो न्यूज आणि सी’ज कँडी या मोठ्या कंपन्या खरेदी केल्या. सी’ज कँडी कंपनीत चांगले रिटर्न्स देणारी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर वॉरेन बफेने आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बदलली.
पुढे १९७७ साली रिक आणि चार्ली या दोघांनी मिळून डेली जर्नल कॉर्पोरेशन ॲक्वायर केले. चार्ली मुंगेर आजही डेली जर्नल कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत. १९८३ साली रिकने पॅसिफिक पार्टनर्स लिमिटेड कंपनी बंद केली. पॅसिफिक पार्टनर्स लिमिटेडची सर्वांत जास्त रिटर्न्स देणारी कंपनी म्हणून नोंद आहे. सुपरइन्वेस्टर ऑफ ग्रॅमे अँड डॉडसविलेमध्ये या कंपनीने सलग १९ वर्षे ३३% रिटर्न्स दिल्याची नोंद असून वॉरेन बफे पार्टनरशिपनेही सलग १३ वर्षे २९% रिटर्न्स दिले होते. म्हणजेच रिक गेरीनची कंपनी एकेकाळी वॉरेन बफेच्या कंपनीपेक्षा जास्त रिटर्न्स देत होती.
१९८६ साली रिक गेरीनने ‘टॅपेस्ट्री फिल्म्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. यासाठी तो केवळ २०% वेळच देत असे.
“द धंदो इन्व्हेस्टर” या पुस्तकाचे लेखक मनीष पाबराई जेव्हा वॉरेन बफे यांना भेटले तेव्हा त्यांनी वॉरेनला रिकबद्दल विचारल्याचे सांगितले जाते. ‘मला आणि चार्लीला खात्री होती की आम्ही एक ना एक दिवस श्रीमंत होणार, पण आम्ही धीर धरला होता, त्याउलट रिक श्रीमंत होण्यासाठी उतावीळ झाला होता’ असे उद्गार वॉरेन यांनी काढले होते.
खरंतर हीच रिकची चूक मानली जाते. त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज काढून गुंतवणूक केली होती. १९७३-७४ साली जेव्हा आर्थिक मंदीची परिस्थिती आली तेव्हा त्याला त्या सर्व कर्जाची परतफेड करणं गरजेचं होतं, म्हणूनच त्याने त्याच्याकडे असलेले बर्कशायर हॅथवे कंपनीचे सगळेच्या सगळे स्टॉक्स ४० डॉलर्स / शेअर या किमतीने वॉरेन बफेला विकून टाकले. आज त्याच स्टॉक्सची किंमत सुमारे ३ लाख डॉलर्स / शेअर इतकी आहे.
असं असलं तरी रिक पूर्णतः बरबाद झाला असं मुळीच नाही. अनेक लेखांमध्ये किंवा व्हिडीओजमध्ये आपल्याला “रिक १९७३-७४ च्या आर्थिक मंदीनंतर बरबाद झाला” या आशयाचा कन्टेन्ट दिसतो, पण तो साफ चुकीचा आहे. वर नमूद केल्याप्रमाणे १९८३ पर्यंत रिकच्या कंपनीने सलग १९ वर्षे ३३% रिटर्न्स दिले होते. याशिवाय १९८६ साली रिक गेरीनने ‘टॅपेस्ट्री फिल्म्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले. जानेवारी २०२० मध्ये रिकची नेट वर्थ सुमारे साडे चार कोटी डॉलर्स एवढी होती.
रिकच्या या कथेतून विशेषतः युवा गुंतवणूकदारांना बरंच काही शिकण्यासारखं आहे.
१. रिकची शैक्षणिक पार्श्वभूमी व्यावसायिक अथवा अर्थशास्त्राची नव्हती, तरीही अनुभव आणि प्रत्यक्ष कामातून शिकून त्याने यशस्वीरित्या गुंतवणूक केली.
२. गुंतवणूक करताना आपल्या अंगी धैर्य असले पाहिजे हे रिकच्या उदाहरणातून प्रकर्षाने जाणवते.
३. याशिवाय कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून गुंतवणूक केल्यास ते धोकादायक ठरू शकतं. जर रिकवर बर्कशायर हॅथवे कंपनीचे शेअर्स विकण्याची वेळ आली नसती तर तोही आज वॉरेन बफे आणि चार्ली मुंगेरबरोबर असता..!
आणि लास्ट बट नॉट लीस्ट अशी शिकवण म्हणजे:
४. “इट्स नेव्हर टू लेट..!” रिकने आपली पॅसिफिक पार्टनर्स लिमिटेड कंपनी वयाच्या ३५व्या वर्षी सुरु केली होती.
रिकची ही कथा नवउद्योजकांना, गुंतवणूकदारांना नक्कीच बरंच काही देऊन जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.