आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज कोणतेही काम इंटरनेटशिवाय करणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे. टीव्हीपासून ते अगदी लहान मुलांच्या ऑनलाईन क्लासेसपर्यंत आणि गेमिंगपर्यंत सगळं काही इंटरनेटवर अवलंबून आहे. तेव्हा इंटरनेट सर्वांना उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असून यासाठीच ऑप्टिकल फायबरसारख्या अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
ऑप्टिकल फायबरबरोबरच आता सॅटेलाईट्सद्वारे इंटरनेट पुरवता येणे शक्य होईल की नाही यावरील संशोधन पूर्ण झाले असून स्पेस एक्स या कंपनीच्या स्टारलिंकने जगाच्या विविध भागांत सॅटेलाईटद्वारे इंटरनेटची सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. स्पेस एक्स बरोबरच आता ॲमॅझॉनने देखील असा प्रयोग केला असून त्यांनी गेल्या शुक्रवारी अर्थात ६ ऑक्टोबर रोजी पहिलीच इंटरनेट सॅटेलाईट लाँच केली आहे. या प्रोजेक्टला प्रोजेक्ट कुइपर असे नाव देण्यात आले.
प्रोजेक्ट कुइपरअंतर्गत स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी फ्लोरिडा येथून कुइपरसॅट-१ आणि कुइपरसॅट-२ या दोन सॅटेलाईट्स लाँच करण्यात आल्या. या सॅटेलाईट्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर लोवर अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवण्यात आल्या असून या दोन्ही सॅटेलाईट्स पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पुरवण्याचे काम करू शकतात. पृथ्वीच्या कक्षेतील एकूण ३२०० सॅटेलाईट्ससह इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. या सॅटेलाईट्स ॲमॅझॉनच्याच आहेत.
पृथ्वीवरील कोणत्याही जागेवरील टर्मिनलशी कनेक्ट होऊन अतिशय दुर्गम भागातही इंटरनेट पुरवण्याची क्षमता या दोन्ही सॅटेलाईट्समध्ये आहे. एलोन मस्कच्या स्टारलिंकसह अनेक कंपन्यांबरोबर ॲमॅझॉनची स्पर्धा असणार आहे. या सर्व कंपन्यांपैकी सध्या स्पेस एक्सची स्टारलिंक सर्वांत मोठी कंपनी असून सध्या त्यांच्या ४००० सॅटेलाईट्स पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. स्टारलिंक सध्या २० लाख युजर्सना अविरत इंटरनेट सेवा पुरवत आहे.
इतर सेवांपेक्षा सॅटेलाईट ब्रॉडबँड वेगळं का आहे?
आज आपण जे इंटरनेट वापरतो ते एकतर वायरलेस असतं किंवा लॅनने कनेक्टेड असतं. म्हणजेच इंटरनेट एकतर फायबर ऑप्टिक केबल किंवा रेडियो वेव्ह्जने कनेक्टेड आहे. या केबल्स शहराबाहेर दुर्गम भागात पोहोचवणे कठीण तर आहेच शिवाय त्यासाठी कंपन्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. याशिवाय जियो, एअरटेलसारख्या कंपन्या आपल्या टॉवर्सद्वारे अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेटची सेवा पुरवत असतात. तेव्हा जरी काही विकसित भागांमध्ये असे टॉवर्स उभारले गेले तरी अति दुर्गम भागांमध्ये त्यांची रेंज पोहोचत नाही.
या सर्व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे सॅटेलाईट ब्रॉडबँड सर्व्हिस. सॅटेलाईट ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये तुम्हाला एक अँटेना दिला जातो, तुम्ही तो अँटेना तुमच्या घरावर लावून इंटरनेट सेवा घेऊ शकता. याशिवाय स्टारलिंक कंपनीचा अँटेनातर पोर्टेबल आहे. म्हणजेच तो अँटेना तुम्ही कोठेही घेऊन जाऊ शकता, म्हणजेच जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकते. भारतात मात्र ही सुविधा येण्यात अजूनही काही सरकारी अडचणी आहेत.

सॅटेलाइट ब्रॉडबँड ही खरोखरच दूरसंचार उद्योग क्षेत्रात वेगाने वाढणारी बाजारपेठ असून अतिशय विश्वसनीय सेवा देखील आहे. अनेकदा पावसाळी हवामानात किंवा जोराचे वारे सुटल्यानंतर इंटरनेट कनेक्शन मध्येही अडचणी येतात, पण सॅटेलाईट्सवर आधारित असल्याने या प्रकारच्या इंटरनेट सेवांवर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय सॅटेलाईट ब्रॉडबँडद्वारे पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवणे शक्य झाले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.