आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इस्रायल. आखाती देशांच्या कुशीत वसलेलं एक लहानसं यहुदी (ज्यू) लोकांचं राष्ट्र. दुसऱ्या महायु*द्धानंतर अमेरिकेच्या पाठिंब्याने ज्यूंसाठी हे राष्ट्र तयार करण्यात आलं. निर्वासित आणि ना*झी जर्मनीने केलेले अत्याचार सहन करून शेकडो ज्यू इस्रायलमध्ये स्थायिक झाले. खरंतर ज्यू, इस्लाम आणि ख्रिश्चन तिन्ही धर्मांचं मूळ एकच असून त्यांना ‘अब्राहमीक धर्म’ म्हटले जाते. या धर्मांच्या उगमाचे ठिकाण युरोप आणि त्याच्या आजूबाजूची काही ठिकाणे असल्याने या तिन्ही धर्मांची पवित्र ठिकाणे याच परिसरात आहेत.
एकाच ठिकाणी तीनही धर्मांची पवित्र ठिकाणे असल्याने मिडल ईस्ट आणि युरोपच्या काही भागात काही वर्षांपासून इस्लाम विरुद्ध ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम विरुद्ध यहुदी असे संघर्ष पाहायला मिळतात. शनिवार दिनांक ७ ऑक्टोबरपासून उसळलेले इस्रायलमधील यु*द्ध देखील याचाच एक परिणाम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.
पार्श्वभूमी:
आज ज्याठिकाणी इस्रायल आहे त्याठिकाणचीच ही गोष्ट. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी अब्राहाम (किंवा इब्राहिम) या प्रेषिताच्या कुळातील १२ मुलांनी येरुसलेममध्ये (किंवा जेरुसलेम) १२ वेगवेगळे यहुदी कबिले तयार केले होते. इब्राहिमचा नातू जॅकोब (किंवा याकुब) याची ही १२ मुले. तिथेच यहुदी लोकांनी ‘टेम्पल माउंट’ची स्थापना केली. हेच स्थान यहुदी लोकांचे सर्वांत पवित्र ठिकाण मानले जात होते.
कालांतराने म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन लोकांनी येरुसलेम शहरावर ह*ल्ला केला आणि यामुळेच अनेक यहुदी लोक विस्थापित झाले. या घटनेनंतरच यहुदी लोकांनी जगातील विविध भागांमध्ये स्थलांतर केले होते. या यु*द्धामध्येच रोमन लोकांनी ‘टेम्पल माउंट’ उद्ध्वस्त केले. पण त्याचीच एक भिंत आजतागायत उभी आहे, त्या भिंतीलाच ‘वेस्टर्न वॉल’ नावाने ओळखले जाते. याच येरुसलेम शहरात रोमन म्हणजेच ख्रिश्चन धर्मीय लोकांचेही पवित्र स्थान असून याच ठिकाणी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्याचे सांगितले जाते.
कालांतराने यरुसलेम शहरावर इस्लामी आक्र*मण झाले. त्यांनी याच शहरात मक्का आणि मदिनेनंतर सर्वांत जास्त पूजनीय असलेली मस्जिद उभारली. त्या मस्जिदीचे नाव अल-अक्सा मस्जिद. या आक्रमणानंतर या शहरात साहजिकच मुस्लिम लोकसंख्या राहू आणि वाढू लागली.
जगभर पसरलेल्या यहुदी लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच होते. यालाच अँटी-सीमॅटीजम म्हणतात. वाढत्या अत्याचाराने आणि ठिकठिकाणी “निर्वासित” किंवा “अल्पसंख्यांक” असलेल्या यहुदी समाजाला एका स्वतंत्र यहुदी राष्ट्राची गरज भासू लागली. पहिल्या महायु*द्धादरम्यान ब्रिटिशांनी ‘बॅल्फोर डिक्लेरेशन’ नावाचा एक ठराव संमत केला. ब्रिटिश यु*द्ध जिंकल्यास यहुदी समाजाला त्यांचा एक स्वतंत्र देश तयार करण्याचे आश्वासन ब्रिटिशांनी या ठरावाद्वारे त्यांना दिले. या ठरावानंतर जगभरातील यहुदी आपल्या मूळ देशाकडे परतत होते.
पण नेहमीप्रमाणे ब्रिटिशांनी दिलेला शब्द पाळला नाही, यहुदी राष्ट्र हे स्वप्नच बनून राहिले. पहिल्या महायु*ध्दानंतर काहीच वर्षांनी दुसरे महायु*द्ध सुरु झाले. याकाळात तर यहुदींचे भरपूर हाल झाले. ना*झी राजसत्ता आणि हिट*लरने जवळजवळ ६० लाख यहुदी लोकांना ठा*र केले होते. या हिंसाचारामुळे जगभरामध्ये यहुदी समाजाबद्दल एक सहानुभूती तयार झाली आणि त्याचे पडसाद संयुक्त राष्ट्र संघातही उमटले.
यहुदी समाजाप्रती असलेली जागतिक सहानुभूती आणि त्यांनी केलेला संघर्ष पाहून संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेन्स्टाईन नावाने प्रसिद्ध असलेल्या एका अरब प्रदेशात यहुदी समाजासाठी एक देश तयार करण्याचे मान्य केले. याच देशाला इस्रायल नाव देण्यात आले. हा प्रदेश जॉर्डनच्या पश्चिमेस, भूमध्य सागराच्या पूर्वेस आणि इजिप्तच्या उत्तरेला होता. म्हणजे मुस्लिमबहुल अरब देशांमध्ये लहानशा यहुदी देशाची निर्मिती करण्यात आली होती. या प्रदेशातील जेरुसलेम (किंवा येरुसलेम) हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर मात्र आंतरराष्ट्रीय शहर म्हणून घोषित करण्यात आले.
वर्तमान परिस्थिती:
इथूनच समस्येची सुरुवात होते. या प्रदेशात अनेक वर्षांपासून मुस्लिम लोक राहत आले आहेत. या प्रदेशालाच पॅलेन्स्टाईन म्हटले जात होते. तेव्हा स्थानिक मुस्लिमांच्या मते, त्यांच्यात आणि यहुदी समाजात कोणतंही शत्रुत्व नव्हतं, यहुदी समाजाला सर्वांत जास्त त्रास झाला तो युरोपीय देशांमध्ये, तेव्हा युरोप खंडातच त्यांना देश तयार करून द्यायला हवा. पण स्थानिकांचा विचार झालाच नाही. संयुक्त राष्ट्र संघाने १९४८ साली इस्रायल याच प्रदेशात तयार करण्यास मान्यता दिली आणि एका संघर्षाची ठिणगी पडली, ज्याचा पुढे वणवा पेटला. याच संघर्षाला इस्रायल विरुद्ध पॅलेन्स्टाईन संघर्ष संबोधले जाते.
पेटत गेलेला वणवा:
१९४८ साली तयार झालेल्या इस्रायलमध्ये साडे सहा लाख यहुदी लोक वास्तव्यास आले होते. पण पॅलेन्स्टाईनमधील लोकांना हे अतिक्रमण मान्य नव्हते. तेव्हा त्यांनी याच वर्षी इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाबरोबर मिळून इस्रायलवर आक्र*मण केले. यावेळी इराकनेही या आक्रमणाला पाठिंबा दिला होता. पण चार देशांविरुद्ध लढणाऱ्या लहानशा आणि नुकत्याच जन्म घेतलेल्या इस्रायलचा पराभव होऊ शकला नाही. त्याउलट येरुसलेम शहराच्या काही भागावर इस्रायलने ताबा मिळवला. या यु*द्धामुळे सुमारे ७ लाख निर्वासित लोकांना स्थलांतर करून युरोप आणि इतर अरब देशांमध्ये जावे लागले. १९५० साली इस्रायलने जेरुसलेम शहराला आपली राजधानी घोषित केली.
या यु*द्धानंतर १९६७ साली जगप्रसिद्ध सिक्स-डे वॉर हे युद्ध झाले. यामध्ये इस्रायलवर एकाच वेळी सहा अरब देशांनी ह*ल्ला केला होता. त्यांमध्ये इजिप्त, सीरिया, जॉर्डन, इराक, सौदी अरेबिया आणि कुवेत या देशांचा सहभाग होता, तर या देशांना बाहेरून, छुपा पाठिंबा होता तो पाकिस्तान आणि लेबननचा. पण एवढ्या भीषण आक्र*मणालाही इस्रायलने तोंड दिले आणि अवघ्या सहा दिवसांत हे यु*द्ध जिंकले. या यु*द्धानंतर मात्र पॅलेन्स्टाईन होती नव्हती तेवढी पूर्ण जमीन गमावून बसला. यामध्ये वेस्ट बँक आणि गाझा या प्रदेशांचा समावेश होता.
या प्रचंड यु*द्धानंतर मात्र इस्रायलमध्ये अंतर्गत यु*द्ध सुरु झाले ते पॅलेन्स्टाईन लोक विरुद्ध यहुदी/इस्रायली लोकांचे. नव्वदच्या दशकात त्यांच्यात संवाद झाला, ज्यामध्ये गाझा आणि वेस्ट बँक या ठिकाणांना स्वातंत्र्य बहाल करून त्यांना पॅलेन्स्टाईन असे संबोधले जाईल, त्या बदल्यात पॅलेन्स्टानियन लोकांना इस्रायल देशाला मान्यता द्यावी लागणार नव्हती, यावर एकमत न झाल्याने हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे.
पॅलेन्स्टाईन हा देश अस्तित्वात नसला तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात हिं*साचार होत आला आहे. पॅलेन्स्टाईन देशाची बाजू जगासमोर मांडण्यासाठी आणि इस्रायलबरोबर संवाद सुरु ठेवण्यासाठी वेस्ट बँक येथे एका संघटनेची उभारणी करण्यात आली. त्या संघटनेचे नाव ‘पॅलेन्स्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’. इकडे गाझा भागातही १९८७ साली एका संघटनेची स्थापना करण्यात आली, पण ही संघटना द*हशत*वादासाठी तयार करण्यात आली होती, ज्याचे नाव आहे ‘हमास’.! हमासने इस्रायलचे नामोनिशाण संपवायची जणू शपथच घेतली आहे.
गाझामध्ये २००७ साली एका निर्वासित पॅलेन्स्टाईन सरकारची स्थापना करण्यात आली. हेच सरकार आजतागायत तेथे आहे. गाझामध्ये बहुतांशी पॅलेन्स्टानियन लोक राहतात. हमासचे द*हशत*वादीही याच ठिकाणी तळ ठोकून आहेत. काही वर्षांपूर्वी गाझामध्ये तीन इस्रायली विद्यार्थ्यांची ह*त्या झाली. या ह*त्या हमास द*हशत*वादी संघटनेनंच घडवून आणल्या आहेत असा इस्रायलचा दावा होता, त्यामुळे त्यांनी गाझावर ह*ल्ला केला आणि हमासने प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर ४० रॉकेट्सचा मारा केला. तेव्हापासून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड:
या घटनेनंतर अनेक लहान मोठ्या चकमकी, रॉकेट ह*ल्ले इस्रायलवर होत आले आहेत. परंतु शनिवारी पहाटे इस्रायलवर जो ह*ल्ला झाला तो अतिशय भीषण तर होताच शिवाय अमानवीय होता. हमासच्या द*हशत*वाद्यांनी निष्पाप नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांना आणि स्त्रियांनाही टार्गेट केले. कित्येक बला*त्कार झाले, इतकंच नाही तर इस्रायली मृ*तदे*हांची देखील विटंबना करण्यात आली. इस्रायलमधील मशिदी-मशिदींमधून देशाविरोधात जि*हाद लढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्वाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गाझामध्ये जाणारे पाणी आणि विद्युत प्रवाहावर बंदी आणली असून गाझामध्ये प्रचंड प्रमाणात एअर स्ट्राईक्स होत आहेत. इस्रायलींबरोबरच हमासचे अनेक द*हशत*वादी आणि त्यांना समर्थन करणारे नागरिकही मारले जाताहेत.
इस्रायलने सुरुवातीला “स्टेट ऑफ वॉर” डिक्लेर केले. स्टेट ऑफ वॉर म्हणजेच कोणत्याही देशाने युद्धाची घोषणा केली असली किंवा नसली तरी देशात आंतरराष्ट्रीय सशस्त्र संघर्षाची स्थिती घोषित करणे होय. यावेळी युद्धासंबंधी आंतरराष्ट्रीय कायदे लागू केले जाऊ शकतात. यानंतर शनिवारीच काही वेळाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी “वी आर ॲट वॉर” म्हणत जवळ जवळ यु*द्धच घोषित केले आहे.
ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म:
हमास द*हशत*वादी संघटनेने शनिवारी पहाटे इस्रायलवर सरप्राईज अटॅक केला. या मागे अल-अक्सा मस्जिद स्वतंत्र करणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. पण हा ह*ल्ला द*हशत*वाद्यांनी केलेले अत्याचार पाहता प्रचंड अमानवीय आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काही दिवसांपूर्वी इराणला ६०० कोटी डॉलर्सचे अनुदान दिले होते, त्यातूनच हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याला इजिप्त आणि लेबननसह अनेक अरब देशांचा पाठिंबा आहे.
या सगळ्यांत काही काळं-बेरं तर नाही?:
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने पाहता, भारतात नुकत्याच झालेल्या G-20 परिषदेत इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली होती. या कॉरिडॉरचा प्रमुख भाग अरब देश आणि इस्रायलमधून जातो. शिवाय, या कॉरिडॉरमुळे भारतात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्यमशीलतेला वाव मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. हेच डोळ्यासमोर ठेऊन या यु*द्धाच्या निमित्ताने प्रोजेक्टमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशी शंका येऊन जाते.
याशिवाय अरब देश विशेषतः सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील सुधारत चाललेले संबंध अनेक अरब देशांच्या डोळ्यात खुपत होते, ते संबंध सुधारू नयेत यासाठी तर हा डाव रचला गेला आहे का, हे येणारी वेळच सांगेल.
एकूणच हा संघर्ष दिवसागणिक वाढत जाईल अशीच चिन्हं दिसताहेत, यामुळे जगभरातील व्यापारावर आणि अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होण्याआधीच संयुक्त राष्ट्र संघाने या संघर्षात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचे आपले कर्तव्य पूर्ण करावे हीच माफक अपेक्षा..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.