आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पवनऊर्जा. ऊर्जेचा एक पर्यावरणपूरक व अक्षय्य स्रोत. एकविसाव्या शतकात मानवाची सर्वांगीण प्रगती होत असतानाच पर्यावरणाकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. विशेषतः तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर दळणवळणाची साधने वाढली, फक्त वाढलीच नाहीत तर सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या दळणवळणाच्या साधनांमध्ये आमूलाग्र आधुनिक बदल घडू लागले.
१९०८ च्या सुमारास वाहतुकीसाठी पेट्रोल-डिझेलचा वापर होऊ लागला. विमान, गाड्या, काही काळाने अगदी ट्रेन्समध्ये देखील डिझेलचा वापर होऊ लागला. जहाजांमध्येही अशाच प्रकारच्या तेलांचा वापर होत असल्याने समुद्रात पसरणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समुद्री जीव समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडल्याच्या बातम्या येत आहेत, त्यापैकी बहुतांश समुद्री जीव हे समुद्रात पसरणाऱ्या या प्रदूषणामुळेच मृत्युमुखी पडतात. यावर उपाय शोधणे आता काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून काही लोकांनी आणि कंपन्यांनी यावर उपाय शोधण्याचा पर्यावरणपूरक प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे शहरात प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रीक गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे, तसाच हा देखील एक पर्यावरणपूर्वक पर्याय आहे.
या कंपनीने इंधनाची बचत व्हावी या दृष्टीने नवकल्पना अंमलात आणायचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पायक्सिस ओशन (Pyxis Ocean) नावाच्या मालवाहू जहाजावर विशाल, मजबूत शिडं उभं केलं. शिड्याच्या जहाजावर ज्याप्रमाणे शिडं असतात, त्यापेक्षा हे शिडं वेगळं आहे. पवनचक्कीतील विंड टर्बाइन्सप्रमाणेच याची निर्मिती केली गेली आहे, विंड टर्बाइन्सचीच सामग्री या शिड्यांसाठी देखील वापरली गेली आहे. जोपर्यंत जहाज बंदरात होते तोपर्यंत ही शिडं जहाजावर दुमडली गेली होती, पण जसं जहाज समुद्रात आलं तसं ही १२३ फूट उंच शिडं उघडली गेली.
हे जहाज हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागरात सुमारे सहा महिने प्रवास करीत होतं. या काळात, त्यांनी पूर्वीच्या तुलनेत कमी इंधन वापरले. या जहाजाची मालकी असलेल्या कारगिल कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी दररोज सुमारे तीन टन कमी इंधन वापरले. म्हणजेच त्यांचा कार्बन फूटप्रिंट तुलनेने खूप कमी होता. त्या प्रचंड मोठ्या शिड्यांमुळे ही जहाजे चालवण्यासाठी पवन ऊर्जेचा यशस्वीरीत्या वापर करण्यात आला.
ज्या परिस्थितीमध्ये फक्त बदलच नाही तर क्रांती घडवून आणायची आहे, त्याचा हा फक्त एक छोटासा भाग. शिपिंग हा एक मोठा उद्योग आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दरवर्षी, समुद्रात फिरणारी जहाजे सुमारे ८३.६ करोड टन कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित करतात, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे, या एकाच जहाजाने इंधन आणि उत्सर्जनाची बचत केली असली तरी, या व्यापक समस्येचे निराकरण करण्यासाठी ते पुरेसे नाही.
हा प्रयोग करणारी कंपनी कारगिल, कार्बन डायॉक्साईड रहित शिपिंग इंडस्ट्रीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जहाजांमधून कमी प्रदूषण व्हावे यासाठी पवन उर्जा वापरणे हा सर्वोत्तम आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे असे त्यांना वाटते. जगातील सर्व महत्त्वाच्या बंदरांमध्ये या मोठ्या शिडांची जहाजे कशा प्रकरे सुरक्षितरित्या डॉक करता येतील यासाठी ते जगभरातील २५०हून अधिक बंदरांच्या प्रशासनांशी बोलत आहेत. ही भलीमोठी शिडं तयार करणारी कंपनी, बार टेक्नॉलॉजीज (BAR Technologies) देखील याबाबतीत आशावादी आहे.
बार टेक्नॉलॉजीजला भविष्यात ही शिडं आणखी जहाजांवर लावायची आहेत. प्रत्येक जहाजावर अशा प्रकारची शिडं कशी वापरता येतील यावर त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. लाखो जहाजांपैकी काहीच जहाजांवर या प्रकारची पवन-ऊर्जा संचयित करण्यासाठी शिडं लावण्यात आली आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा लवकरात लवकर वापर सुरु करणे आज काळाची गरज बनली आहे, कारण हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे आहे. जहाजांमध्ये कमीत कमी जीवाश्म इंधन वापरणे हा त्यातील एक मोठा भाग.
हवामान बदलाचा सामना करण्यात अशा प्रकारचे तंत्रज्ञान हातभार लावू शकते, पण अधिकाधिक कंपन्यांनी याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. याशिवाय इतर लोक आणि कंपन्या देखील जहाजांसाठी इंधनाचा वापर कसा कमी करता येईल यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यांपैकी एक कल्पना म्हणजे फ्लेटनर रोटर्स. हे तंत्रज्ञान अनेक वर्षांपूर्वी विकसित झाले होते, पण ते आता उपयोगी ठरू शकते.
आधुनिकतेचा कळस गाठलेल्या या जगाला कदाचित जहाजांवर शिडं लावणं जुन्या पद्धतीचे वाटू शकते, परंतु हवामानबदल आणि प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हे प्रभावी तंत्र आहे. प्रयोगातून असे दिसून आले की यामुळे इंधनाची मोठी बचत होऊ शकते. पण ही फक्त सुरुवात आहे. वास्तविक बदल घडवून आणण्यासाठी अधिकाधिक जहाजांनी या संकल्पनेचा वापर केला पाहिजे, कारण आपला सांभाळ करणारी पृथ्वी सुरक्षित ठेवणे हे सर्व जीवसृष्टीचे आद्य कर्तव्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.