आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तंत्रज्ञानाची जशी प्रगती होत गेली तशी वाहतुकीच्या साधनांचा विकास होत गेला. आता तर सेल्फ-ड्रायविंग कार्स आल्याने या नाविन्यामध्ये आणखी एक भर घातली गेली आहे. जगात काही ठिकाणी फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरीसाठी ड्रोन्स वापरण्याचा देखील यशस्वी प्रयत्न झाला असून, ते तंत्रज्ञान वापरात आणल्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही.
गेली अनेक वर्षे हवेत चालणाऱ्या कार्सची देखील चर्चा होत आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी हवेत उडणाऱ्या कार्स स्वप्नवत होत्या, अनेक जण याची खिल्ली देखील उडवत असत. २००९ साली रिलीज झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय..!’ या चित्रपटात जागेच्या हव्यासापायी व्हिलन हिरोच्या पत्नीला गिफ्ट म्हणून खेळण्यातली गाडी देतो, “पाच वर्षांनंतर गाड्या हवेतून चालतील, हवेत वेगवेगळे स्तर असतील.. पाच वर्षांनंतर लागणारा शोध तुला आत्ता दाखवू?” असं म्हणत नायक ती खेळण्यातली गाडी फेकून देतो आणि म्हणतो, “ती बघ उडणारी गाडी..!”
म्हणजेच उडणारी गाडी ही त्या वेळी भविष्यात लागणारा शोध आहे असं मानलं जात होतं. आता त्या भविष्यकाळाचं पर्यावसन वर्तमानात झालंय असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. आजमितीस तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कळस गाठला असून आता फक्त सेल्फ ड्रायव्हिंग कार्सच नाहीत तर फ्लायिंग कार्सदेखील येणार आहेत.
अगदी दोन वर्षांच्या कालावधीत आपण इंग्लंडच्या आकाशात उडत्या टॅक्सी पाहू शकतो. इंग्लंडमधील सरकारने जाहीर केलेल्या योजनांनुसार या फ्लाइंग टॅक्सी २०२६ पर्यंत कार्यरत होऊ शकतात. याच फ्लाईंग टॅक्सींना एअर टॅक्सी किंवा फ्लायिंग कार म्हणूनही संबोधले जाईल. हे सगळं एखाद्या सायन्स फिक्शन मुव्हीसारखं भासेल, पण आता हे सगळं प्रत्यक्षात उतरणार आहे. फ्लाइंग टॅक्सी म्हणजे आकाराने लहान आणि विद्युत ऊर्जेवर चालणारी विमाने. ही विमाने हेलिकॉप्टरप्रमाणे उभ्या रेषेत टेकऑफ आणि लँडिंग करू शकतात.
शहरातल्या शहरात कमी अंतरावर जाण्यासाठी देखील त्यांचा वापर होऊ शकतो. कमी वेळेत जास्त अंतर पार करणे, आणि मुख्य म्हणजे ट्रॅफिक जॅमचा सामना करण्याच्या दृष्टीने हे प्रभावी तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात इंग्लंडच्या सरकारला एवढा रस असण्याचे कारण म्हणजे, फ्लाइंग टॅक्सी वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि शहरी भागातील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदतगार ठरू शकतात. सरकारच्या योजनेनुसार सर्व गोष्टी अंमलात आणल्या गेल्या तर २०२८ पर्यंत इंग्लंडच्या आकाशात फ्लायिंग टॅक्सी पाहणे काही नवल राहणार नाही.
इंग्लंडचे सरकार आणि काही एरोस्पेस कंपन्या मिळून या योजनेवर काम करीत आहेत. २०३० पर्यंत पहिली पायलटलेस फ्लाइंग टॅक्सी आकाशात झेपावेल हा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या फ्लायिंग टॅक्सी अधिक स्वयंचलित होतील अशी अनेकांची अपेक्षा आहे. हे सर्व जरी आज औत्सुक्याचं आणि नवलाईचं वाटत असलं तरी फ्लायिंग टॅक्सीमुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
फ्लायिंग टॅक्सीच्या मार्गात येणारे संभाव्य अडथळे
वाहतुकीच्या या नाविन्यपूर्ण पद्धतीसाठी इतर पायाभूत सुविधा विकसित करणे महत्त्वाचे आहे. फ्लायिंग टॅक्सी उतरवण्यासाठी लँडिंग पॅड किंवा व्हर्टीपोर्ट्स (सरळ रेषेत जमिनीवर उतरणारी विमानं किंवा ड्रोन्स) तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय आणखी एक मोठं आव्हान म्हणजे लोकांचा या तंत्रज्ञानावर विश्वास बसायला हवा. पायलटलेस म्हणजे फ्लायिंग कारचा कंट्रोल कोणत्याही माणसाकडे नाही, हे समजल्यावर लोक सुरुवातीला यामध्ये बसायला घाबरतील. तेव्हा या तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे देखील गरजेचे आहे.
फ्लायिंग टॅक्सी नेमकी कशी असेल असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. कोणत्या प्रकारचे मॉडेल फ्लायिंग टॅक्सी बनवण्यासाठी वापरात येईल याची चाचपणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने विविध कंपन्यांना संधी दिली होती. अनेक कंपन्यांनी आणि संशोधकांनी आपापले मॉडेल्स सादर केले, यापैकी अनेक बहुतांश मॉडेल्स हेलिकॉप्टर्ससारखेच दिसतात आणि यात पाच लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
सध्या ब्रिटनमध्ये ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असं असलं तरी देखील तिथे सरकारने ड्रोन्सच्या वापरावर अनेक निर्बंध लादलेले आहेत. सध्या ड्रोन्सच्या सहाय्याने वैद्यकीय सामग्रीची वाहतूक, ग्रामीण भागात पोस्टल सेवा देणे आणि गुन्हेगारांचा माग काढणे या गोष्टी केल्या जात आहेत. परंतु हवाई वाहतूक वाढवण्याच्या या योजनेत २०२७ पर्यंत ड्रोन्सचा वापर वाढवण्यावर देखील भर दिला जाईल.
याआधीही सांगितल्याप्रमाणे ब्रिटनमध्ये फ्लायिंग टॅक्सी आणि ड्रोन्सचा वापर करण्यासाठी लँडिंग पॅड किंवा व्हर्टीपोर्ट्स तयार करणे गरजेचे आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न २०२२ मध्ये अर्बन एअरपोर्ट्स नावाच्या कंपनीने केला होता. अर्बन एअरपोर्ट्सने प्रायोगिक तत्त्वावर सेंट्रल कॉव्हेंट्रीजवळील कार पार्कमध्ये तात्पुरता मिनी एअरपोर्ट उभारला होता. इंग्लंडची एरोस्पेस रेग्युलेटर संस्था, सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी, सध्या एरोड्रोम्सवर व्हर्टीपोर्ट्स तयार करण्याच्या प्रस्तावांवर सल्लामसलत करत आहे.
आता ही योजना कशी पुढे जाते आणि अंमलात आणली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.