आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हल्ली एआय, मशीन लर्निंग वगैरे शब्द फारच परवलीचे झाले आहेत. बाहेरच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकाच्या मुखात हे शब्द असतातच. कधी एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने, कधी उत्सुकतेपोटी, तर कधी उत्स्फुर्त जिज्ञासेपोटी. आजवर अनेकांनी एआय हा शब्द ऐकलेलाच आहे.
चॅट-जीपीटी आल्यानंतर तर क्वचितच कॉलेजचे विद्यार्थी असे असतील ज्यांना याबद्दल माहिती नाही. याच चॅट-जीपीटीची कंपनी ओपनएआयमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले, या घटनाक्रमामुळे सबंध जगात अनेक चर्चाना उधाण आलं होतं. नेमकं काय होतं ते प्रकरण आणि ओपन एआयच्या सीईओ सॅम अल्टमनला काढून टाकण्यामागे नक्की काय भूमिका होती याचा आढावा घेणारा हा लेख..
१७ नोव्हेंबर रोजी ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन आणि ग्रेग ब्रोकमन यांना संचालक मंडळाने काढून टाकले. व्हिडीओ कॉलवर त्यांना संचालक मंडळापासून काही गोष्टी लपवल्याच्या आरोपाखाली थेट सोडचिठ्ठी देण्यात आली. पुढच्याच दिवशी म्हणजे शनिवारी मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयच्या गुंतवणूकदारांनी संचालक मंडळाशी चर्चा करून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यायचा प्रयत्न झाला.
रविवारी ओपनएआयच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने त्यांना पुन्हा कंपनीत घेतले. सोमवारी देखील ओपनएआयकडून या गोष्टीची कोणतीही विशेष दखल न घेतल्याने ७७० कर्मचाऱ्यांपैकी ५०० कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळानेच राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली. अखेरीस मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सॅम अल्टमन पुन्हा ओपनएआयचे सीईओ म्हणून रुजू झाले. पण हे सगळं नाट्य घडण्यामागे नेमकं कारण काय होतं?
ओपनएआय नेमकं आहे काय?
जुलै २०१५ मध्ये इलॉन मस्क आणि इलिया सतस्किव्हर यांची भेट झाली. ही काही साधारण भेट नव्हती. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांनी केवळ संपत्तीच्या जोरावर आपली एकाधिकारशाही गाजवू नये या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
उपाययोजनांमध्ये ठरल्याप्रमाणे एआयच्या संशोधनासाठी २०१५ साली ओपनएआय हे एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून सुरु करण्यात आलं. इलॉन मस्कसारखा मोठा आणि यशस्वी उद्योगपती एखाद्या संघटनेची शिफारस करतो म्हटल्यावर कोणता गुंतवणूकदार तिथे पैसे गुंतवणार नाही? गुंतवणूकदारांच्या गुंतवणुका आणि देणग्यांच्या माध्यमातून ओपनएआय ही संस्था मानवतेच्या कल्याणासाठी एआयच्या संशोधनाचे कार्य करणार होती. खरंतर ही भेट घडवून आणली होती सॅम अल्टमनने.
सॅम अल्टमन त्यावेळी वाय-कॉम्बिनेटर या कंपनीचा सर्वेसर्वा होता. वाय-कॉम्बिनेटर विविध प्रकारच्या कंपन्या सुरु करण्यासाठी आर्थिक मदतीसह मार्गदर्शन देखील पुरवत असे. २०१५ पूर्वी वाय-कॉम्बिनेटरने काही उच्चस्तरीय शास्त्रज्ञांची निवड केली होती. या शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्याचे नियमन करण्याची जबाबदारी त्यांनी ग्रेग ब्रोकमनला दिली, ग्रेग ब्रोकमन या पूर्वी स्ट्राइप या पेमेन्टच्या प्लॅटफॉर्म कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होते.
२०१५ साली ओपनएआय स्थापन झाल्यानंतर इलॉन मस्कने लिंक्ड-इनचे सर्वेसर्वा आणि संस्थापक रॅन रॉसलान्स्की, पेपालचे सर्वेसर्वा डॅन स्कुलमॅन, ऍमेझॉन वेब सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा अँडी जॅटी आणि इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांना ओपनएआय काय आहे याबद्दल सांगून त्यासाठी योगदान देण्यासाठी प्रवृत्त केले. स्पेसएक्स आणि टेसलासारख्या आपल्या इतर कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इलॉन मस्कने २०१८ साली ओपनएआय सोडले.
२०१९ हे वर्ष ओपनएआयसाठी फार महत्त्वाचे होते. २०१९ सालीच ओपनएआयने जीपीटी-२ लाँच केले. याचवर्षी नॉन-प्रॉफिट असलेल्या या कंपनीचे रूपांतर फॉर-प्रॉफीटमध्ये झाले. २०१९ च्याच जुलै महिन्यात ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्ट सर्वांत मोठा गुंतवणूकदार बनला होता. मायक्रोसॉफ्टने ओपनएआयमध्ये सुमारे १०० कोटींची गुंतवणूक केली होती.
मायक्रोसॉफ्टने ओपनएआयसाठी एक सुपरकम्प्युटर तयार केला होता. ते सुमारे १०० जीपियुंवर चालणारे ‘२ लाख ८५ हजार कोर’चे मशीन होते. आपण वापरत असलेले कम्प्युटर्स ड्युअल कोर (दोन कोर असलेले) किंवा जास्तीत जास्त ऑक्टा-कोर (आठ कोर असलेले) असतात. यावरूनच सुपरकम्प्युटरची क्षमता लक्षात येऊ शकते. हा सुपरकम्प्युटर एका सेकंदात सुमारे ४०० गिगाबाईट्स डेटावर प्रोसेसिंग करू शकतो. या सुपरकम्प्युटरमुळेच आपण आज चॅट-जीपीटी वापरत आहोत.
२०२१ साली ओपनएआयने DALL-E नावाचे इमेज जनरेशन टूल तयार केले. यातून आपण विविध प्रकारचे फोटोज तयार करू शकतो. एकूणच ओपनएआयची सुरुवात ही एका नॉन-प्रॉफिट संशोधन संस्थेपासून सुरु झाली होती, पण टप्प्याटप्प्याने तीच नॉन-प्रॉफिट संस्था एक फॉर-प्रॉफिट कंपनी बनली.
कंपनीतील सदस्यांमध्ये विशेष बदल झाले नाहीत. जे सदस्य ती एक ‘नॉन-प्रॉफिट संस्था’ म्हणून तयार होताना डायरेक्टर्स होते तेच सदस्य ‘फॉर-प्रॉफिट कंपनी’ बनल्यानंतरही डायरेक्टर्स होते. कंपनीचे ४९% शेअर्स मायक्रोसॉफ्टकडे आहेत, तर बाकीचे ४९% अँडरसन हॉरोविट्झ, पीटर थेईल, सिक्योआ कॅपिटल आणि खोसला व्हेंचर्स यांच्याकडे आहेत. उर्वरित २% शेअर्स ओपनएआय फाउंडेशन आणि कर्मचाऱ्यांकडे आहेत. सॅम अल्टमनकडे मात्र कंपनीचे शेअर्स नव्हते.
मतभेद नक्की कुठे झाले?
याआधीही सांगितल्याप्रमाणे सॅम अल्टमनला संचालक मंडळाने आपल्यापासून काही लपवल्याच्या आरोपाखाली सीइओपदावरून काढून टाकले होते. तो करत असलेले संशोधन संचालक मंडळापासून लपवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आज आपण चॅट-जीपीटीच्या स्वरूपात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो स्तर अनुभवत आहोत तो स्तर चौथ्या आणि पाचव्या स्तरांमधील आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एकूण सात स्तर आहेत, पुढीलप्रमाणे त्यांची विभागणी करता येते..
१. नियमांवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स: एखाद्या विषयाचे आजवर झालेले संशोधन मशीनमध्ये स्टोअर केले आणि मशीनला त्या विषयासंबंधी माहिती विचारली तर ते मशीन स्टोअर्ड असलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तरे देऊ शकतं किंवा गणित सोडवण्याची एखादी पद्धत त्या मशीनमध्ये डेटाच्या स्वरूपात स्टोअर केली असेल तर त्याच पद्धतीने मशीन गणित सोडवतं यालाच नियमांवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात.
२. कॉन्टेक्स्ट अवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स: जर तेच गणित सतत एआयच्या या स्तराला देत राहिलो तर सर्वांत आधी जी पद्धत मशीनने वापरली त्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न ते मशीन करेल. याचाच अर्थ आपण पहिल्या स्तराच्या थोडं पुढे आलो. आता मशीन फक्त असलेल्या माहितीवर नाही तर स्वतःच्या सामर्थ्यावर देखील गणितं सोडवू शकतं.
३. डोमेन स्पेसिफिक मास्टरी: एखाद्या विशिष्ट क्षेत्राबद्दल माहिती ठेवणाऱ्या, त्या माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला डोमेन स्पेसिफिक मास्टरी म्हणतात.
४. थिंकिंग अँड रिजनिंग एआय: चॅट-जीपीटीसारखे प्रोग्रॅम्स म्हणजेच थिंकिंग अँड रिजनिंग एआय.
५. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स: यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाच्या विचार क्षमतेपेक्षा अधिक विकसित असतो. या प्रकारचा एआय फक्त उपलब्ध माहितीवर प्रक्रिया करत नाही तर नवी माहिती आणि नवे ज्ञानदेखील तयार करू शकतो. उदाहरणारच घ्यायचं झालं तर संगीताच्या सात स्वरांनी एक गाणं तयार होतं. एजीआयला तुम्ही सात स्वर दिले तर ते फक्त अनेक गाणीच नाही तर आठवा स्वर देखील तयार करू शकते.
६. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स: यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्षमता मानवापेक्षा कैक पटींनी अधिक वाढते.
७. एआय सिंग्युलॅरिटी: हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगावर प्रभुत्व गाजवण्याइतपत सामर्थ्यवान आहे. याशिवाय युअल नोहा हरारी या इस्रायली लेखकाने आपल्या अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टुमारो या पुस्तकात म्हटले आहे, “एकदा आपण एआय सिंग्युलॅरिटी विकसित केल्यावर सर्व जबाबदारी AI वर सोपवली पाहिजे. कारण माणूस माणसावर राज्य करण्यास लायक नाहीत. आपल्याला (एआयसारख्याच) व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागेल. या प्रकारच्या एआयला सरकारने कसे काम करावे, कोणत्या देशांना युनायटेड नेशन्सच्या मदतीची आवश्यकता आहे, लोकसंख्या किती असावी हे उत्तम प्रकारे समजेल.
सॅम अल्टमन संचालक मंडळाला कळू न देता आपले संशोधन मोठ्या स्तरावर नेत असून ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे असा अंदाज लावण्यात आला आहे. म्हणूनच त्यांनी याबद्दल संचालक मंडळाला पत्ता लागू दिला नाही. शिवाय सर्व संचालक सुरुवातीला ठरल्याप्रमाणे मानवतेला उपयुक्त ठरणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत, कारण हे संचालक ओपनएआय ‘नॉन-प्रॉफिट’ संस्था असल्यापासून कार्यरत होते.
आता या डायरेक्टर्सपैकी हेलन टोनर, इलिया सतस्किव्हर, ताशा मॅककॉली यांना काढून टाकण्यात आले आहे. आधीच्या संचालक मंडळापैकी ॲडम डी’एंजेलो, ब्रेट टेलर, आणि लॅरी समर्स हे संचालक मंडळात नव्याने असतील. ओपनएआय संचालक मंडळामध्ये एकूण नऊ जणांचा समावेश करण्याची शक्यता आहे.
जगभरातून एआयच्या विकसनाप्रती चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संशोधनात आणखी भर पडल्यास अनेक नोकऱ्या जातील याचे भय सर्वांना सतावते आहे. या परिस्थितीत चॅट-जीपीटीसारखे टूल्स वापरून आपण करत असलेल्या कामामध्ये त्यांचा कशा प्रकारे पूर्ण क्षमतेने वापर करता येईल हे बघितले पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.