आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२००७ नंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्स वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बाजारात शेकडो स्मार्टफोन ब्रॅण्ड्स येऊ लागले. यात चिनी कंपन्या आघाडीवर होत्या. आजही भारतीय स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेत चीनचाच दबदबा असल्याचं दिसून येतं. ओप्पो, विवो, रेडमी अशा विविध कंपन्यांच्या नावावर चीन भारतामध्ये स्मार्टफोन्स विकत आहे.
२००७ मध्ये तैवानी कंपनी एचटीसीने सर्वप्रथम आपला ‘एचटीसी टच’ नावाचा स्मार्टफोन बाजारात आणला. त्याबरोबरच मायक्रोमॅक्स, लाईफ, लावा, कार्बन अशा अनेक भारतीय कंपन्यांनी देखील भारतीय बाजारपेठेत आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला..
अनेक भारतीय कंपन्यांना मागे टाकून दक्षिण कोरियाच्या सॅमसंग आणि चीनच्या ऑनर, हवाई, वन प्लस, ओप्पो, रिअलमी, विवो, शाओमी आणि अशा अनेक कंपन्यांनी भारतीय स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेवर वर्चस्व स्थापन केलं आहे. बाजारपेठेच्या या स्पर्धेत कंपन्यांची रँकिंग वर-खाली होत राहते.
काही स्मार्टफोन ब्रॅण्ड्स काही काळासाठी बाजारात धुमाकूळ घालतात आणि अचानक गायबही होतात. पॅनासॉनिक, एलजी, स्पाईस, एचटीसी, इनफोकस, ब्लॅकबेरी आणि सोनी हे असे काही मोबाईलचे ब्रॅण्ड्स आहेत जे एकेकाळी भारतीय बाजारपेठेत अतिशय प्रसिद्ध होते. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचं अस्तित्व पूर्णतः संपून गेलं.
भारतीय बाजारपेठेतून अशा प्रकारे गायब झालेल्या मोबाईल ब्रँड्सच्या या यादीमध्ये आणखी एक नाव जोडता येईल ते म्हणजे जिओनी मोबाईल्स. जिओनी ही चिनी कंपनी भारतामध्ये २०१३ साली सुरु झाली. जिओनीने अनेक वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल्स लाँच केले होते, त्यातीलच एक म्हणजे इ-लाईफ एस-५. इ-लाईफ एस-५ हा त्यावेळी जगातील सर्वांत लहान मोबाईल होता.
भारतात उद्योग सुरु केल्यानंतर अल्पावधीतच हा ब्रँड भारतातील सर्वोत्कृष्ट १० स्मार्टफोन ब्रॅंड्सपैकी एक बनला. यामुळे भारतातील नोकिया आणि सॅमसंगचे मार्केट धोक्यात आले होते. जिओनीची सुरुवात २००२ साली चीनमध्ये शेंन्झेन येथे झाली होती. चीनबरोबरच भारतासह अन्य देशांतही या कंपनीच्या अनेक शाखा आणि उद्योग होते.
जिओनीने पहिला ‘मेड इन इंडिया’ फोन १ सप्टेंबर २०१५ रोजी विशाखापट्टणममध्ये लॉन्च केला होता. त्याचे नाव होते F103. या फोनची निर्मिती आंध्र प्रदेशातील श्री सिटीमधील फॉक्सकॉनमध्ये करण्यात आली होती. सगळं काही आलबेल सुरु असताना अचानक असं काय झालं की या कंपनीला संपूर्ण व्यवसाय बंद करावा लागत आहे, जाणून घेऊया..
२०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत जिओनी ब्रॅण्डने भारतीय बाजपरपेठेत चांगलाच धुमाकूळ घातला होता. २०१६ साली तर या कंपनीने ४ करोड फोन्सची विक्री केली होती. २०१८ साली जिओनीची गाडी रुळावरून घसरू लागली.
२०१७ च्या पहिल्या तीन महिन्यांत जिओनीचा भारतामध्ये सुमारे ५% मार्केट शेअर होता, शिवाय २०१७ पर्यंत सेल्फी-फोन्सच्या प्रकारातील ब्रॅण्ड्समध्ये जिओनी सर्वांत मोठ्या ब्रॅंड्सपैकी एक होता. पण २०१८ च्या मार्च आणि जुलैनंतर मात्र जिओनीच्या मार्केट शेअरमध्ये प्रचंड घसरण होऊ लागली. याचं कारण विचित्र आहे.
जिओनी कंपनीचा चेअरमन लिऊ लॉरान्गला जुगार खेळण्याची सवय होती. हॉन्गकॉन्गमधील कसिनोमध्ये या पठ्ठ्याने एका दिवसात १४४ मिलियन अर्थात १४.४ करोड डॉलर्सचा जुगार खेळला आणि हरला. यामुळे कंपनीला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्याने हे पैसे वैयक्तिक खात्यातून खर्च केल्याचा दावा केला असला तरी त्यात काही तथ्य नसल्याचे समोर आले आहेत. कंपनीवर २.४ बिलियन अर्थात २४० करोड डॉलर्सचे कर्ज होते. पण झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे कंपनीला ही रक्कम भरता आली नाही आणि कंपनी दिवाळखोर बनली. लिऊ लॉरान्ग सध्या कुठे आहे याची कोणालाच माहिती नाही.
लिऊ लॉरान्गच्या जुगाराच्या सवयीमुळे मात्र अनेक डीलर्स, सप्लायर्स आणि ग्राहकांची वाताहत झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.