आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजमितीस स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान राहिले आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक पदांवर आरूढ असलेल्या महिलांनी अनेक दर्जेदार कामे करून राष्ट्र कार्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
देशात राजकारण, समाजकारण आणि इतर व्यवसायांमधील महिलांच्या भागीदारीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही अनेक महिला प्रचंड मोठे योगदान देत आहेत. यावर्षी झालेल्या एशियाड स्पर्धा याचं उत्तम उदाहरण असून भारताने जिंकलेल्या १०७ पदकांपैकी ४६ पदके महिलांच्या संघाने जिंकल्या आहेत. याशिवाय भारतीय महिलांची क्रिकेट टीमसुद्धा उत्तम कामगिरी करीत आहेत.
हॉकीवाली सरपंच
हीच परंपरा पुढे सुरु ठेवत राजस्थानमधील एका महिला सरपंचांनी महिला हॉकी टीमसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. हरियाणामध्ये पालनपोषण झालेली निरू यादव नावाची एक मुलगी. निरुला हॉकी खेळण्यात जास्त रस होता. परंतु इतर सर्व सामान्य भारतीय कुटुंबातील मुलींप्रमाणेच तिच्याही या निर्णयाला विरोध झाला आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पण नशिबाने तिची साथ सोडली नाही.
काही वर्षांनी सुदैवाने आणि योगायोगाने याच निरू यादवची ओळख “हॉकीवाली सरपंच” म्हणून झाली. निरू यादव राजस्थानमधील झुनझुनु जिल्ह्यातील लांबी अहिर या गावची सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर तिने हॉकी खेळणाऱ्या आणि तशी इच्छा बाळगणाऱ्या काही युवतींसह एक हॉकी टीम बनवली. स्वतः निरूसुद्धा या मुलींबरोबर हॉकी खेळताना दिसतात, त्या मैदानावर असताना सर्व खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.
या सर्व मुली समाजाने त्यांच्यावर लादलेली बंधने झुगारून देत हॉकीच्या मैदानात उतरून दिवसागणिक यशस्वी होताहेत. १०-२० मुलींपैकी अनेक मुलींची निवड जिल्हा तसेच राज्य स्तरावर खेळण्यासाठीही झाली आहे. या सर्व गोष्टींचं श्रेय जातं ते लांबी अहिर गावच्या हॉकीवाल्या सरपंच निरू यादव यांना.
पण हे सगळं सुरू कसं झालं..?
ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी या गावच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली. गावच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला सरपंच. गावातील काही मुलींना हॉकी खेळण्यात रस असून त्यांना पुढे जाऊन देशासाठी हॉकी खेळायची आहे असं त्यांना सरपंच बनल्यानंतर कळालं. निरू यादव यांना आधीपासूनच हॉकीमध्ये रस होता, तेव्हा आपल्याला जे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते निदान या मुलींना तरी करता यावं म्हणून त्यांनी गावातील हॉकी खेळणाऱ्या आणि खेळू इच्छिणाऱ्या मुलींच्या पालकांची भेट घेतली. त्यांना आपल्या मुलींच्या हॉकी प्रशिक्षणासाठी तयार केलं आणि सुरु झाला त्यांची “हॉकीवाली सरपंच” म्हणून ओळख तयार होण्याचा प्रवास.
सुरूवात झाली तेव्हा गावामध्ये या हॉकीचा सराव करण्यासाठी या मुलींना मैदानही उपलब्ध नव्हतं, तेव्हा त्या सर्व जवळच असलेल्या एका विद्यापीठाच्या मैदानावर हॉकीचा सराव करीत असत. सुरुवातीला आर्थिक अडचण असताना निरू यादव यांनी स्वतःच्या पगारातून मदत करत टीम तयार केली आणि त्यांच्यासाठी एका कोचचीही व्यवस्था करून दिली. काही दिवसांनी गावामध्ये त्यांना मैदानही मिळाले.
इतकंच नाही तर हॉकीवाल्या सरपंचांनी इतर अनेक कामगिरी फत्ते केल्या आहेत..!
बी.एड. आणि एम.एड. सह गणितामध्ये मास्टर्स डिग्री मिळवणाऱ्या निरू यादव सध्या पीएचडी करत असून त्या लांबी अहिरी गावामधील एक साधारण गृहिणी होत्या. पण गावातील सरपंचांची जागा महिलांसाठी आरक्षित केली गेली आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. राजकारण आणि राज्यशास्त्राबद्दल कोणतंही ज्ञान नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ही निवडणूक जिंकण्यामागे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न, सामाजिक कार्यात असलेला रस आणि ‘आपल्यावरही समाजाचं काही ऋण आहे’ ही भावना असल्याचे सांगितले जाते.
निवडून आल्यावर त्यांनी पाहिलं काम केलं ते फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनची स्थापना. या संस्थेद्वारे शेतकऱ्याचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे. शेतीच्या विविध पद्धती शिकवण्यासाठी, उत्तम किमतीसाठी व्यापाऱ्यांबरोबर केल्या जाणाऱ्या वाटाघाटी तसेच फक्त जिल्हा किंवा तालुक्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्यासाठी इतर मोठ्या बाजारपेठा खुल्या करून द्याव्या अशी अनेक उद्दिष्टे या संस्थेची आहेत.
याशिवाय त्यांनी गावामध्ये विशेषतः महिला आणि मुलींसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाही आणली, ज्याद्वारे आज गावातील अनेक महिला जयपूर येथे विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’बरोबर मिळून त्यांनी गावातील महिलांना सुकन्या समृद्धी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांची माहिती देण्याशिवाय त्यांना युपीआय अँप्लिकेशन्स कसे वापरायचे याचे प्रशिक्षणही दिले आहे.
आपल्याकडील विवाह सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकपासून बनवलेली भांडी वापरली जातात. यामुळे कचरा निर्माण होऊन प्रदूषण होतेच शिवाय खर्चही वाढतो. यावर उपाययोजना म्हणून हॉकीवाल्या सरपंचांनी गावामध्ये “युटेन्सिल बँक” स्थापन केली आहे. याद्वारे विवाह सोहळ्यासारख्या इतर कार्यक्रमांसाठी “सरकारी” स्टीलची भांडी उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय त्यांनी अनेक प्रकल्पांसाठी महिला बचत गटांचीही स्थापना केली आहे.
त्यांच्या मते स्थानिक प्रशासनात महिलांसाठीचे आरक्षण हे सरकारने योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. कारण स्त्रिया टाइम मॅनेजमेंटबरोबरच मल्टी-टास्किंग करण्यात सक्षम असतात आणि त्यांच्यात भावनाप्रधानता असल्याने त्या नेत्या आणि विविध क्षेत्रात लीडरही बनू शकतात. अधिकाधिक महिला ग्रामसभांना उपस्थित राहून आपापली मते मांडत आहेत याचे त्यांना समाधान वाटते.
एवढं घवघवीत यश मिळवूनही आणि एवढ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा असूनही त्यांची राहणी अगदी सामान्य महिलेसारखी आहे हे विशेष.
हॉकीवाल्या सरपंचांची स्वप्ने
काही दिवसांपूर्वी निरू यादव कौन बनेगा करोडपतीमध्येही येऊन गेल्या. त्यांनी या खेळात ६ लाख रुपये जिंकले, शिवाय आपली आणि लांबी अहिर गावची कथा सांगितली. याठिकाणी जिंकलेली रक्कम त्या मुलींच्या स्पोर्ट्ससाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वापरणार आहेत. लांबी अहिर गावात हॉकीचं स्टेडियम उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे. याशिवाय त्यांना गावातील महिलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येईल असे ग्रंथालय देखील उभारायचे आहे.
निरू यादव यांनी सरपंच म्हणून खऱ्या अर्थाने समाजोपोयोगी आणि प्रशंसनीय कामे केली आहेत. त्यांच्या या कामांची दखल नक्कीच घेतली जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.