आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९७५ पासून दर चार वर्षांनी खेळल्या जाणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या या वर्षी होणाऱ्या सामन्यांची सुरुवात आज पासून प्रचंड उत्साहाने होत आहे. हे सामने अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असून वर्ल्ड कपच्या इव्हेंटला अनेक नव्या गोष्टींची नवलाई आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वर्ल्ड कपचे सामने भारतात होणार असल्याने गणेशोत्सव संपल्यानंतर दसरा आणि दिवाळीचे दिवस सुरू होण्यापूर्वीच “क्रिकेट वर्ल्ड कप” नावाचा उत्सव सुरु होत आहे. या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये कोणते नवनवीन इव्हेंट्स, गोष्टी होत आहेत किंवा होणार आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत..
तंत्रज्ञानाची प्रगती:
वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये वर्षानुवर्षे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतच चालला आहे. गेल्या दशकभरात वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरल्याचे लक्षात येत असेल. या वर्षीच्या सामन्यांमध्येही आपल्याला अशाच काही नवीन तंत्रज्ञानांची तोंडओळख होणार आहे.
नवीन तंत्रज्ञानामध्ये नव्या पद्धतीच्या बॉल ट्रॅकिंग सिस्टीमसह नव्या पद्धतीची डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमसुद्धा असणार आहे. या सिस्टीम्समुळे आऊट, नॉट-आऊट, वाईड बॉल आहे की नाही, एलबीडब्लू आहे अथवा नाही, पॉवरप्ले कधी घ्यायचा, अशा प्रकारचे निर्णय घेण्यात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम अम्पायर्सना मदतगार ठरते.
त्याशिवाय या स्पर्धांची मजा ऑगमेंटेड रिऍलिटीमध्ये (AR) घेता यावी यासाठी आयसीसी गुगलबरोबर काम करीत आहे.
नवे नियम:
या वर्षीचे वर्ल्ड कपचे सामने भारतात होणार असून आयसीसीने विशेष नियम तयार केले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील काही मैदानांवर चौकार (फोर्स) आणि षटकार (सिक्सर्स) अतिशय सहजतेने मारता येतात. बाउंड्री ७० मीटरपेक्षा कमी नसावी, ७० मीटरपेक्षा जास्त असल्यास चालू शकते असा एक नियम आयसीसीने घालून दिला आहे.
याशिवाय आयसीसीने सॉफ्ट सिग्नल नियम संपुष्टात आणला असून हा नियम खेळाडूंपेक्षा अम्पायर्ससाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी महत्त्वाचा आहे. या नियमानुसार मैदानावरील अम्पायर थर्ड अम्पायरबरोबर कोणतीही चर्चा किंवा संवाद न करताच निर्णय घेऊ शकत होता. आधीच्या नियमांनुसार जर थर्ड अम्पायरला आपल्या निर्णयाचा कोणताही पुरावा सादर करता नाही आला तर मैदानावरील अम्पायरचा निर्णय मानला जात असे. या नियमामुळे अनेकदा वादांना तोंड फुटले असून या वर्षीच जूनमध्ये हा नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष फुटेजच्या आधारे घेतल्या गेलेल्या थर्ड अम्पायरचा निर्णय सर्वमान्य असेल.
सॉफ्ट सिग्नल नियमाबरोबरच आयसीसीने या वर्षी बाउंड्री काउंट नियमसुद्धा रद्दपात्र ठरवला आहे. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मॅच टाय झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या सुपर ओव्हरमुळे हा नियम चर्चेत आला होता. या नियमानुसार मॅच टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जात असे. पण सुपर ओव्हरमध्येही मॅच टाय झाल्यास सर्वांत जास्त षटकार आणि चौकार मारणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येते. हा नियम आता राहणार नाही तर जो पर्यंत मॅच एक निर्णायक टप्पा येत नाही तो पर्यंत सुपर ओव्हर्स खेळल्या जातील.
नवी मैदाने:
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा सोल होस्ट होण्याची संधी मिळाली आहे.
याआधी १९८७ साली भारताने पाकिस्तानसोबत मिळून वर्ल्ड कप होस्ट केला होता. त्याच वर्षी पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडबाहेर खेळवला गेला. त्यावर्षी धीरूभाई अंबानींनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे हे शक्य होऊ शकलं. १९८७ नंतर १९९६ साली भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत वर्ल्ड कप सामने को-होस्ट केले होते. २०११ साली झालेला वर्ल्ड कप पाकिस्तान होस्ट करणार होतं, पण २००९ साली श्रीलंकन क्रिकेट प्लेयर्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांनी ही संधी गमावली. तेव्हा भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशने वर्ल्ड कप होस्ट केला होता.
या वर्षीचा क्रिकेट वर्ल्ड कपचा एकमेव यजमान (सोल होस्ट) भारत असून भारतातील १० वेगवेगळ्या स्टेडियम्समध्ये हे सामने रंगणार आहेत. या स्टेडियम्समधील अनेक स्टेडियम्स नवीन असून त्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या नवीन स्टेडियम्सचा समावेश आहे.
वर्ल्ड कप ट्रॉफीचे उद्घाटन:
गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगाने अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून खाजगी कंपन्याही यात मागे नाहीत. खाजगी कंपन्यांपैकी एलोन मस्कची स्पेस एक्स असेल किंवा जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन असेल, या कंपन्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप होस्ट भारतानेही चांद्रयान-३ आणि आदित्य-एल१ या मोहिमांद्वारे अंतराळ संशोधन क्षेत्रात आपले नाव मोठे केले आहे.
तेव्हा या वर्षीच्या वर्ल्ड कप ट्रॉफीचे उद्घाटन कसे करावे असा प्रश्न समोर आल्यावर त्याला एकच उत्तर होतं, ते म्हणजे अंतराळातून! एप्रिल २०२३ मध्ये ॲमेझॉनचे एक्झेक्युटिव्ह चेअरमन आणि संस्थापक जेफ बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन या कंपनीतर्फे वर्ल्ड कप ट्रॉफी सबऑर्बिटल फ्लाइटवर ठेवण्यात आली होती. वर्ल्ड कप ट्रॉफी पृथ्वीपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर नेऊन परत पृथ्वीवर सुरक्षितपणे आणली गेली. याद्वारे वर्ल्ड कप सामन्यांचा आवाका आणि त्यांच्यासाठी असलेला उत्साह दर्शविण्यात आला.
वर्ल्ड कप ट्रॉफी टूर:
नाविन्यपूर्ण पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफी सर्व १० सहभागी देशांमध्ये नेण्यात आली. यावेळी सर्व क्रिकेट फॅन्सना ट्रॉफी प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यासोबत फोटो घेण्याची संधी दिली गेली.
एकंदरीत, २०२३ चा क्रिकेट वर्ल्ड कप खरोखरच एक जागतिक सामना म्हणून उदयास येत आहे. यामधून प्रत्येकाला काही न काही घेण्यासारखे आणि एन्जॉय करण्यासारखे आहेच. आजपासून सुरु होणारे हे सामने सर्वजण एन्जॉय करतीलच!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.