आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखादी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? खेळ खेळण्यासाठी भरपूर जागा, खेळाचे साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक अशा काही गोष्टी तुमच्या डोक्यात येतील. मात्र, जर तुम्हाला सांगितलं, की स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासाठी केवळ एका आयडियाची गरज आहे, तर?
एबीसी स्पोर्ट्स अकॅडमी ही एक पेपरलेस, ऑफिसलेस अशी स्पोर्ट्स अकॅडमी आहे. स्वतःची जागा नसली, तरी या अकॅडमीमध्ये अगदी स्विमिंगपासून ते बास्केटबॉलपर्यंत सर्व प्रकारचे खेळ शिकवले जातात. हे सगळं ऐकायला अगदी वेगळं वाटत असलं, तरी एबीसी स्पोर्ट्स अकॅडमी ही सध्या एक प्रस्थापित अकॅडमी म्हणून ओळखली जाते. जिल्हा स्तरावरील कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये एक खेळाडू तरी या अकॅडमीचा असतोच असतो. राज्यातील सुमारे 3 हजार विद्यार्थी सध्या या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतात. हे सगळं सुरू झालं एका आयडियामुळे.
अनिरुद्ध पोले हा तिशीतील मुलगा या अकॅडमीचा सर्वेसर्वा आहे. अनिरुद्धने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असलं, तरी खेळच त्याची पहिली आवड होती. त्यामुळे इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याने काही महिने आयटीमध्ये नोकरी केली. मात्र त्याचं पॅशन त्याला शांत बसू देत नव्हतं. अखेर त्याने आयटीमधील नोकरी सोडून पवार पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम केले.
त्यानंतर आपल्या लहान भावासोबत मिळून त्याने एबीसी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली. त्याचा लहान भाऊ पुढे जाऊन एअर फोर्समध्ये भरती झाला. सध्या अनिरुद्ध आणि त्याचा चुलत भाऊ मिळून ही अकॅडमी चालवतात.
२०१६ साली अनिरुद्धने ही अकॅडमी सुरू केली. सध्या त्यांचा बिझनेस अगदी जोमात असून, एबीसी अकॅडमी वर्षाला तीन कोटींची उलाढाल करते. अगदी कोरोना काळातही त्यांची ही स्पोर्ट्स अकॅडमी चांगल्या प्रकारे कार्यरत होती. कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय ही अकॅडमी कशी चालते?
आपल्याला माहिती आहे, की सध्या कित्येक नवीन सोसायटींमध्ये भरपूर ॲमेनिटीज दिल्या जातात. यामध्ये स्पोर्ट्स कॉम्पलेक्सचा सहभाग असतोच असतो. सोबतच जिम, स्विमिंग पूल या गोष्टीही दिल्या जातात. मात्र, यांपैकी कोणत्याच ठिकाणी सोसायटीकडून प्रशिक्षक नेमलेले नसतात. त्यामुळे या जागांवर भरपूर चांगले इन्फ्रास्ट्रक्चर असूनही त्यांचा वापर होत नाही.
यासोबतच, शाळांमध्ये देखील अशी खेळाची जागा असते. शाळा सुटल्यानंतर ती जागा देखील सोसायटींच्या स्पोर्ट्स सेंटरप्रमाणे पडून राहते. एबीसी स्पोर्ट्स अकॅडमी याच जागेचा आणि साहित्याचा वापर करून घेते. या जागा ते भाडे तत्वावर घेतात आणि याठिकाणी आपले प्रशिक्षक नेमतात. अशा रितीने त्या स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चचरचा योग्य उपयोग होतो.
एबीसी अकॅडमीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एकूण 85 प्रशिक्षक आहेत. तसेच, त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी कित्येकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, या अकॅडमीमध्ये अगदी लहान मुलांपासून ते 30-32 वर्षे वयोगटातील विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.
एबीसी स्पोर्ट्स अकॅडमीचे वैशिष्ट म्हणजे, त्यांच्या सर्व टूर्नामेंट ते प्रोफेशनली लाईव्ह रेकॉर्ड करतात. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील तयारीसाठी देखील होतो. सोबतच, भारतातील सर्वात मोठी प्रोफेशनल बास्केटबॉल टूर्नामेंट (मुलांसाठी) एबीसी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात येते.
२०१६ मध्ये जेव्हा अनिरुद्धने ही कंपनी सुरू केली, तेव्हा सुरुवातीला त्यांना म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. असं काही पूर्वी कधीच ऐकलं नसल्यामुळे सोसायटी आणि शाळा त्यांची जागा अनिरुद्धला द्यायला तयार होत नव्हत्या. मात्र हळूहळू लोकांना याचा फायदा कळू लागला. सोसायटींना प्रशिक्षक आणि जागेचं भाडं मिळू लागलं. तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांना देखील पार्ट-टाईम प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी एबीसीने उपलब्ध करून दिली.
आयटीमधील जॉब सोडल्यामुळे ओळखीच्या कित्येक लोकांनी त्याला हे असं काही न करण्याचा सल्ला दिला होता. अगदी त्याच्या घरचेही त्याला दुसरा कोणताही बिझनेस कर, पण हा नको असं सांगत होते. सर्वात आधी अनिरुद्धला आपल्या घरच्यांचं मन वळवावं लागलं.
त्यानंतर त्याने आयटीमधील नोकरी सोडून क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम केलं. यावेळी त्याने या बिझनेसमधील बारकावे हेरून ठेवले. त्यानंतर हळूहळू त्याने शाळांना आणि सोसायटींना संपर्क साधून आपली संकल्पना सांगण्यास सुरुवात केली. सध्या एबीसीकडे सुमारे २५०हून अधिक सोसायटींचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरण्याची परवानगी आहे.
कोविड काळात जवळपास सर्व शाळा बंद होत्या. तसेच बऱ्याच सोसायटी देखील कन्टेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आल्या होत्या. स्विमिंग पूल आणि इनडोअर क्रीडागृहे देखील बंद होत्या. या सगळ्यातही एबीसी स्पोर्ट्स अकॅडमीचं काम सुरूच होतं. त्यांनी लोकांना ऑनलाईन कोचिंग, फिटनेस आणि हेल्थ टिप्स द्यायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्स आणि झूम तसेच गुगल मीट अशा साधनांचा वापर केला. या गोष्टींनाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
यामुळे केवळ आधी जॉईन झालेले लोक टिकले नाहीत, तर नवीन लोकही अकॅडमीचा भाग झाले. यासोबतच, अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच सोसायटीमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे सोसायटींचाही त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला.
अनिरुद्धने ही अकॅडमी सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे केवळ तीन विद्यार्थी होते. मात्र, उत्तम प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यामुळे अकॅडमीची चांगली ग्रोथ होते आहे. आज या अकॅडमीमध्ये ८५ सर्टिफाईड प्रशिक्षक आणि तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत.
आज अनिरुद्धच्या अकॅडमीचं मोठं नाव झालं आहे तरीही आपली पार्श्वभूमी अनिरुद्ध विसरला नाही. आज त्याच्या अकॅडेमीमार्फत व सुरेंद्र पठारे फौंडेशनच्या मदतीने तो ३०० हुन अधिक गरीब घरातील विद्यार्थ्यांना मोफत खेळाचं प्रशिक्षण देतोय. त्यासोबतच खेळाचं साहित्य आणि लागणाऱ्या इतरत्रही गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातायत.
एक चांगली आयडिया, आणि त्याचे उत्तम इम्प्लिमेंटेशन यामुळे आज एबीसी स्पोर्ट्स अकॅडमी राज्यातील टॉपच्या क्रीडा अकॅडमींपैकी एक आहे. इतर स्पोर्ट्स अकॅडमी आणि एबीसीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे, याठिकाणी ठराविकच खेळ शिकवले जातील असं बंधन नाही. अगदी कोणत्याही खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे काम एबीसी करते. एकूणच, एबीसी हे खेळाडू आणि खेळाची आवड असणाऱ्या सर्वांसाठीच एक वन स्टॉप सोल्यूशन आहे. तसंच आपल्या आयडियावर आपला स्वतःचा विश्वास असेल आणि ती सत्यात उतरवण्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर आपण नक्कीच यशाला गवसणी घालू शकतो हा विश्वास देखील मराठी तरुणांना आज अनिरुद्धकडे पाहून मिळतोय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.