आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे भारतासाठी एक पर्वणीच असते. सुरुवातीला क्रिकेट वर्ल्ड कप फक्त इंग्लंडमध्येच होत असे. पण ही वैश्विक स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर काढण्याचं काम केलं ते भारताने. त्यावेळी तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे वर्ल्ड कप होस्ट करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. धीरूभाई अंबानी धावून आले नाहीतर वर्ल्ड कप होस्ट करणे भारतासाठी अवघड होऊन बसले असते.
१९८३ साली भारतात झालेल्या वर्ल्ड कपच्या अशा अनेक रंजक गोष्टी आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआयला अशाच एका आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. यावेळी बीसीसीआयच्या मदतीला धावून आल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर.
ज्याप्रमाणे आज क्रिकेटर्सवर प्रचंड पैसा खर्च केला जातो, तशी परिस्थिती ८० च्या दशकात नव्हती. प्रत्येक खेळाडूला कसाबसा २० पौंड म्हणजेच फारतर ४०० रुपये डेली अलाउन्स मिळत असे. वर्ल्ड कपच्या वेळी तर बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना डेली अलाउन्ससुद्धा देता येत नव्हते. इतकंच काय तर विश्वविजेत्या भारताच्या क्रिकेट टीमला देण्याइतपत पैसेही त्यावेळी बीसीसीआयकडे नव्हते.
८० च्या दशकात प्रवास आणि बाकी सगळे खर्च करून खेळाडूंकडे कसेबसे ६० हजार रुपयेच राहत असत. काही लोकांनी विश्व विजेत्या भारतीय संघाला प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवलीही, पण ते टीममध्ये कोणालाही मान्य नव्हते. कदाचित बीसीसीआयलाही. पण आता काहीतरी करणे गरजेचे होते, अन्यथा बीसीसीआयला केवळ भारतातच नाही तर जगात मान खाली घालण्याची वेळ आली असती. पण सुदैवाने तसे झाले नाही.
बीसीसीआयने बराच विचार करून एक निर्णय घेतला. म्युझिक कॉन्सर्ट घेण्याचा. म्युझिक आणि क्रिकेट वर्ल्ड कप यांचा परस्परांशी थेट संबंध जरी नसला तरी बीसीसीआयने म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करून लाखो रुपयांची कमाई केली. कारण हे म्युझिक कॉन्सर्ट साधेसुधे नव्हते तर गानसम्राज्ञी लता दीदींचे होते. बीसीसीआयने त्यांना तशी विनंतीही केली. लता दीदींनीही कोणताही संकोच न करता या विनंतीला मान देऊन गायचे मान्य केले.
या कार्यक्रमाची सगळी तिकिटे विकली गेली. तिकिटांची विक्री आणि जाहिराती इत्यादींमधून बीसीसीआयला सुमारे २० लाखांचे उत्पन्न मिळाले. या कार्यक्रमामध्ये हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या “भारत विश्व विजेता” या गाण्याचा समावेश होता. विशेष म्हणजे हे गाणं त्यावेळी लता दीदींबरोबर सर्व “विश्व विजेत्या” भारतीय खेळाडूंनी सूर धरला होता.
या कार्यक्रमामधून बीसीसीआयला झालेल्या कमाईपैकी प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये देण्यात आले. क्रिकेट फॅन असलेल्या लता दीदींनी मात्र यातून एकही रुपया मानधन म्हणून घेतले नाही. इथेच लतादीदींचा उदारपणा आणि देशभक्ती सिद्ध होते. त्यानंतर बीसीसीआयनेही कृतज्ञता म्हणून यानंतर होणाऱ्या प्रत्येक मॅचमध्ये लतादीदींसाठी २ सीट्स रिझर्व्ह ठेवल्या होत्या. लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर कितीही व्यस्त असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ते नेहमीच मुंबईच्या बेबोर्न स्टेडियमवर जात असत.
आजमितीस बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सुमारे ५ हजार करोडोंची उलाढाल केवळ मीडिया राईट्सवरच करते. आज बीसीसीआय जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. पण या क्रिकेट मंडळाने एकेकाळी असेही दिवस पहिले होते. जर ऐन वेळी लता दीदी धावून आल्या नसत्या तर भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसते किंवा मिळाले तरी खूपच कमी रक्कम स्वीकारावी लागणार होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.