आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बिर्याणी किंवा नॉन-व्हेजसारखे खाद्यपदार्थ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आपसूकच नाव येतं ते हैद्राबाद शहराचं. इथली हैद्राबादी बिर्याणी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, इतकंच नाही तर देशातील अनेक ठिकाणी गल्लोगल्ली ‘हैद्राबादी दम बिर्याणी’ची हॉटेल्स थाटलेले दिसतील. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही सुमारे एक वर्ष निझामाच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात आणि तत्कालीन संस्थानात फक्त बिर्याणी किंवा नॉन-व्हेज पदार्थच नाहीत तर इतर अनेक गोष्टी देखील प्रसिद्ध होते.
या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे मोती आणि मोत्यांचे दागिने. हैद्राबादी मोत्यांमुळे आज या शहराला ‘सिटी ऑफ पर्ल्स’ म्हणूनही ओळखले जाते. तत्पूर्वी आपण हैद्राबादच्या इतिहासावर एक नजर टाकूया.
सध्याच्या हैद्राबाद प्रदेशावर इसवी सन ६२४ ते १०७५ पर्यंत चालुक्यांचे राज्य होते, इसवी ११५८ नंतर इथे काकतीयांचे राज्य आले. आज गोवळकोंडा म्हणून प्रसिद्ध असलेला किल्ला काकतीय राजवंशातील राजा गणपतीदेवने बांधला. १३१० साली काकतीय राजघराणे अलाउद्दीन खिलजीचे मांडलिक बनले आणि १३२१ साली मलिक काफूर या खिलजीच्या सेनापतीने त्यांच्यावर विजय मिळवला. यावेळी कोहिनूर हिरा दिल्लीला नेण्यात आला. हा हिरा गोवळकोंड्याजवळील एका खाणीतून मिळाला असल्याचे सांगितले जाते.
१३२५ साली तुघलक वंशातील मुहम्मद बिन तुघलकाने या प्रदेशावर ताबा मिळवला. त्याने मलिक मकबुल तिलंगानी याची आपला प्रातिनिधिक शासक म्हणून नियुक्ती केली. तुघलकांविरुद्ध बंड करून उठलेल्या मुसनुरींनी १३३६ साली वारंगळ (सध्याचा तेलंगणाचा प्रदेश) ताब्यात घेतले आणि त्याला आपली राजधानी घोषित केली.
मुसनुरींनी १३६४-६५ साली गोवळकोंडा किल्ला बहमनी सुलतानला दिला. सुलतान कुलीने १५१८ साली बंड करून कुतुबशाही राजघराण्याची स्थापना केली. कुतुबशाही बराच काळ चालली. कुतुबशहाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील चांगले संबंध होते. १६८१ मध्ये औरंगजेब आपल्या संपूर्ण सैन्य आणि खजिन्यानीशी दख्खनेत उतरला. १६८७ साली तब्बल एका वर्षाच्या यु*द्धानंतर त्याने गोवळकोंडा ताब्यात घेतला आणि हा प्रदेश मुघल साम्राज्यात समाविष्ट झाला.
१७१३ साली मुघल शासक फरुखसियरने मुबारीझ खानला हैद्राबादचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. त्याच्याच कार्यकाळात १७१४ साली फरुखसियरने ‘आसफ जाह १’ला निजाम-उल-मुल्क (राज्याचा प्रशासक) ही पदवी देऊन संपूर्ण दख्खनेचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. १७२१ साली त्याची मुघल साम्राज्याचा वजीर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण दरबारात त्याचे कोणाशीही पटत नव्हते, म्हणूनच त्याने १७२३ मध्ये सर्व जबाबदाऱ्यांवर पाणी सोडले आणि दख्खनेत निघून आला.
दरबारींच्या प्रभावाखाली मुघल शासक मुहम्मद शाहने मुबारीझ खानला असफ जाहला थांबवण्याचे फर्मान जारी केले आणि १७२४ साली साखरखेर्ड्याची लढाई झाली. या लढाईत आसफ जाहने मुबारीझ खानचा पराभव करून विजापूर, हैद्राबाद, वऱ्हाड, औरंगाबाद, बिदर, व खानदेश या सुभ्यांवर स्वायत्त सत्ता प्रस्थापित केली आणि त्याचे नाव ठेवले ‘हैद्राबाद’. असफ जाहचा राजवंश पुढे त्याच्याच पदवीवरून निजाम म्हणून ओळखला जाऊ लागला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन ‘पोलो’द्वारे हैद्राबाद स्वतंत्र भारतात विलीन झाले.
आज जरी राजेशाही संपुष्टात आली असली तरी शहराचं वैभव अबाधित आहे. याच वैभवांपैकी एक म्हणजे मोती. हैद्राबाद जगभरामध्ये मोत्यांचं शहर किंवा ‘सिटी ऑफ पर्ल्स’ म्हणूनही प्रसिद्ध आहे हे आपल्यापैकी काहीच जणांना माहिती असेल.
निजाम राजवंशाच्या मोत्यांवर असलेल्या प्रेमामुळे आज हैद्राबादला “मोत्यांचे शहर” म्हटले जाते. राजवंशातील राण्यांचे तसेच राजांचे मोत्यांवरील प्रेम आणि समृद्ध जीवनशैली चांगलीच प्रसिद्ध होती. त्यामुळे जगाच्या विविध भागांतील कारागिर हैद्राबादमध्ये दाखल होऊ लागले. निजामांनी राजघराण्यातील बेगमांना भेट देण्यासाठी म्हणून सर्व प्रकारचे मोती आणण्याचा प्रयत्न केला. मोत्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे जगभरातील व्यापारी, प्रामुख्याने अरबी व्यापारी आणि कारागिर हैद्राबादमध्ये येऊ लागले.
अरबी आखातात दुर्मिळ मोती मोठ्या प्रमाणावर आढळतात, हेच मोती निजामाच्या दरबारी येऊ लागले. असेच मोती मुबलक प्रमाणात भारतात आणावेत, अशी निजामांची मागणी होती. त्यांच्या कारकिर्दीत हैद्राबादमधील बाजारांत मोठ्या प्रमाणात दुर्मिळ आणि सुंदर मोती तसेच मोत्यांपासून तयार झालेले दागिने येऊ लागले.
हैद्राबादजवळच असलेल्या चांदापेट या गावात अनेक वर्षांपासून मोत्यांचे उत्पादन होत आहे. आवश्यक आकारानुसार त्यांच्यावर काम केले जाते. येथील क्लासिक पांढरे मोती प्रचंड लोकप्रिय आहेत. तर काळे आणि गुलाबी मोती देखील दुर्मिळ पण महाग आहेत. बांगड्या, कुंदन सेट, सतलदास (मौल्यवान खड्यांनी तयार झालेला सात मोत्यांचा सेट), लच्छा, चांदबाली (चंद्राच्या आकाराची कानातील आभूषण), चोकर, रस्सी (साखळी सेट), हात फुल (बोटे आणि मनगटासाठी), वदेनम (कमरपट्टा), तनमणी, आणि यांसारखेच विविध प्रकारचे हैद्राबादी दागिने आजही मोत्यापासून बनवले जातात.
हैद्राबादमध्ये चारमिनार बाजार, काचीगुडा, लाड बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणात मोत्यांचा व्यापार केला जातो. पुन्हा कधी हैद्राबादला गेलात तर तिथल्या बिर्याणीसारख्या खाद्यपदार्थांबरोबरच या मोत्यांची देखील शॉपिंग करायला विसरू नका.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.