आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रशिया-युक्रेन यु*द्धाला दोन वर्षं होत आहेत. याआधीही २०१४ साली रशियाने युक्रेनवर आक्र*मण करून युक्रेनच्या प्रमुख प्रदेशांपैकी एक, क्रिमियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०२१ साली युक्रेन ‘नाटो’ या पाश्चिमात्त्य देशांच्या राजकीय आणि लष्करी संघटनेत सहभागी होणार अशा चर्चा सुरु असताना रशियाने आपल्या सैन्याची तैनाती युक्रेनच्या बॉर्डरवर करायला सुरुवात केली. अनेक यु*द्धाभ्यास होऊ लागले आणि अखेरीस २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर ह*ल्ला केला आणि जगात एकच गोंधळ उडाला.
नुकतंच कोविडच्या संकटातून बाहेर आलेल्या जगाला सुटकेचा निःश्वास सोडायला वेळ मिळतो न मिळतो इतक्यात हे यु*द्ध सुरु झालं. अमेरिकेने नेहमीप्रमाणे आपल्या शत्रूवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यास सुरूवात केली, पण रशियावर याचा काडीचाही परिणाम झाला नाही, याउलट बाजारभावाच्या निम्म्या किमतीत रशिया भारताला कच्च तेल देण्यास तयार झालं. तसं पाहिलं तर अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांनी आपापलं वर्चस्व जगावर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले, जे आजही चालू आहेत, पण याची किंमत अनेक सैनिकांच्या आणि सामान्यांच्या रक्ताने मोजावी लागत आहे हे मात्र निश्चित.
एक कणखर राजकीय नेतृत्व – व्लादिमिर पुतिन
या सर्व घडामोडींमागे फक्त कोणा एकाच व्यक्तीचा हात नसून दोन्हीकडे समान प्रमाणात दोषी आहेत. पण रशियाचं नेतृत्व करणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांच्यावर संपूर्ण जगातून टीका होत आहे. पुतीन यांच्यावर जगभरातून टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेक माध्यमांतून त्यांच्यावर विविध प्रकारे टीका झाल्या आहेत. असं असलं तरी ८०% पेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येणारा हा रशियन राष्ट्राध्यक्ष रशियामध्ये आकर्षणाचा विषय राहिला असल्याचे दिसून येते.
२०१२ पासून एकही निवडणूक न हारता त्यांनी राष्ट्राध्यक्षपद राखून ठेवलंय. १९९९ ते २००० या काळात देशाचे पंतप्रधानपद सांभाळण्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु होते. त्यानंतर २००० ते २००८ सालापर्यंत त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर २००८ ते २०१२ या काळात ते पुन्हा देशाचे पंतप्रधान बनले.
राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी पुतिन यांनी सुमारे १६ वर्षे केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेमध्ये इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून काम केले. १९९१ साली केजीबीमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यादरम्यान सेंट पीटर्सबर्ग येथे त्यांनी काही प्रशासकीय भूमिका बजावल्या. सेंट पीटर्सबर्ग शहराचे महापौर अनातोली सोबचक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने राजकारणात जलद गतीने प्रगती करण्यास वाट मोकळी झाली. काही शे शब्दांच्या या लेखात पुतिन आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले सर्वच कारनामे सांगता येतीलच असे नाही, पण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नक्कीच प्रकाशझोत टाकण्यात येईल.
पुतिन यांची सुरुवातीची कारकीर्द – केजीबी एजन्ट
व्लादिमिर व्लादीमिरोवीच पुतिनचा जन्म सध्या सेंट पिटर्सबर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेनिनग्राड शहरात ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. त्याची आई एका कारखान्यात कामगार होती तर वडील सोव्हिएत रशियाच्या नौदलात कार्यरत होते. १९७५ साली कायद्याच्या क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर त्याने केजीबीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
१९८४ साली विशेष प्रशिक्षणासाठी मॉस्को येथील ‘युरी एंड्रोपोव्ह रेड बॅनर इन्स्टिट्यूट’मध्ये (सध्या अकॅडेमी ऑफ फॉरेन इंटेलिजन्स नावाने ओळखले जाते) पुतिनची भरती झाली. त्यानंतर त्याने पूर्व जर्मनीतील ड्रेस्डेन येथे अनुवादक म्हणून काम केले. वर वर जरी तो अनुवादक वाटत असला तरी तो केजीबीच्या एजंटचेच काम करीत होता.
१९८९ साली ड्रेस्डेनमध्येच एक निदर्शन सुरु होते, या निदर्शनात काही केजीबीचे आणि स्टेसीचे (ईस्ट जर्मनी अर्थात जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकची सिक्रेट पोलिस एजन्सी) एजंट्सदेखील होते. पुतिन यांनी त्यावेळी सोव्हिएत कल्चरल सेंटर आणि केजीबी व्हिलामधील महत्त्वाची कागदपत्रे निदर्शकांच्या हाती लागण्यापासून वाचवले. असं असलं तरी काही कागदपत्रे तिथेच राहिली. बर्स्ट फर्नेसमुळे काही कागदपत्रे जर्मनीत राहिली, परंतु केजीबी व्हिलामधील अनेक कागदपत्रे मॉस्कोला पाठवण्यात आली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
१९९० नंतर मिखाईल गोर्बाचेव्हच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत रशियाचे पतन होऊ लागले. १९९१ साली मिखाईल गोर्बाचेव्हच्या विरोधात झालेल्या सशस्त्र बंडानंतर पुतिन यांनी केजीबीचा राजीनामा दिला. त्यांना रशियाच्या नवीन प्रशासनात गुप्तहेर संस्थेत काम करण्याची इच्छा राहिली नव्हती. या राजीनाम्यानंतर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
व्लादिमिर व्लादीमिरोवीच पुतिन – एक प्रभावशाली, कणखर राजकीय नेता
१९९४ साली, पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग सरकारचे प्रथम उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, मे १९९५ मध्ये त्यांनी “अवर होम – रशिया” या राजकीय पक्षाच्या सेंट पीटर्सबर्ग शाखेचे काम सुरु केले. जून १९९७ पर्यंत पुतिन ‘अवर होम – रशिया’च्या सेंट पीटर्सबर्ग शाखेचे अध्यक्ष होते.
१९९९ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पुतिन यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आणि पुतिन यांच्या राजकीय कारकिर्दीने निर्णायक वळण घेतले. एका वर्षाच्या आत येल्तसिन यांनी राजीनामा दिला आणि पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले. खंबीरपणा, व्यावहारिकता आणि अशा नेतृत्व गुणांनी भारलेल्या त्यांच्या नेतृत्व शैलीचे उद्दिष्ट अनेक वर्षं अशांत असलेल्या रशियाला स्थिर करणे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ न देणे हे होते.
पुतिन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात रशियाने सलग आठ वर्षे आर्थिक विकास अनुभवला. यामध्ये अनेक घटकांचे योगदान होते, कच्च्या तेलाच्या आणि गॅसेसच्या वाढलेल्या किमतींमुळे रशियाला चांगलाच फायदा झाला. शिवाय, साम्यवादानंतरची मंदी आणि आर्थिक संकट, परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ आणि विवेकपूर्ण आर्थिक आणि वित्तीय धोरणांच्या अंमलबजावणीचा देशाला फायदा झाला. परंतु, मीडियावरील नियंत्रण आणि राजकीय विरोध पूर्णपणे दडपण्यासह पुतिन यांच्या अन्य धोरणांवर सुरुवातीपासूनच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने टीका होत आहे.
मार्च २००४ मध्ये व्लादिमीर पुतिन दुसऱ्यांदा रशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. २००७ च्या संसदीय निवडणुकांदरम्यान, पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाने ६४.२४ टक्के मते मिळवून लक्षणीय बहुमत मिळवले. पण, तत्कालीन रशियन राज्यघटनेनुसार, एक व्यक्ती केवळ सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत होता. पुतिन यांनी आधीच दोन टर्म पूर्ण केले असल्याने, त्यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी उभे राहण्यास मनाई करण्यात आली.
यावर उपाय म्हणून आणि रशियन राजकारणात आपला दबदबा कायम राहावा म्हणून पुतिन यांनी एक योजना आखली आखली. प्रथम उपपंतप्रधान आणि युनायटेड रशिया पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले दिमित्री मेदवेदेव २००८ च्या निवडणुकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मेदवेदेव यांच्या अध्यक्षतेखाली पुतिन पंतप्रधान झाले.
मेदवेदेव यांनी २००८ ते २०१२ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. सप्टेंबर २०११ मध्ये, तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी आगामी २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी व्लादिमीर पुतिन यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित करण्यासाठी सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाकडे शिफारस केली. मेदवेदेव पुन्हा निवडणूक लढवतील की पुतिन अध्यक्षपदावर परततील अशा प्रश्नांना राष्ट्राध्यक्षांची ही भूमिका हे एक खणखणीत उत्तर होते.
मेदवेदेवच्या अध्यक्षपदाच्या काळात, त्यांच्या आणि पुतिन यांच्यातील संबंधांबद्दल अनुमान लावले जात होते. अनेकांच्या मते, राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्या कार्यकाळात पुतिन यांनी पडद्यामागून सगळी सूत्रे हलवली. २०१२ साली पुतिन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकले, त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर परत येण्याची परवानगी दिली गेली.
व्लादिमिर व्लादीमिरोवीच पुतिन, रशियन राष्ट्राध्यक्ष
मतदानात घोटाळे केल्याचे आरोप असूनही, पुतिन यांनी २०१२ च्या रशियन अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी लढा दिला, तेव्हा पुतिन यांनी ७६ टक्क्यांहून अधिक मते जिंकली आणि २०२० साली त्यांनी अनेक प्रभावशाली घटनात्मक सुधारणा आणल्या आणि आपली राजकीय ताकद, अधिकार वाढवून घेतले.
२०२० मध्ये, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०३६ पर्यंत सत्तेत राहण्यासाठी देशाच्या राज्यघटनेत अनेक बदल केले आहेत. यामुळे पुतिन यांची रशियन राजकारणावर दीर्घकाळ नियंत्रण ठेवण्याची योजना दिसून येते. लोकशाही आणि मानवी हक्कांसमोरील आव्हानांसारख्या विस्तारित पुतिन राजवटीच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दलही अनेक चर्चा होताना दिसतात.
रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणून पुतिन यांचा कार्यकाळ दुसरे चेचन यु*द्ध, २०१४ साली क्रिमियावर ह*ल्ला करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करणे आणि सीरियामधील लष्करी हस्तक्षेप यासह अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी भरला आहे. पुतिन राजवटीतील सर्वांत महत्त्वाचा क्षण म्हणजे फेब्रुवारी २०२२. याच काळात रशियाने युक्रेनवर ह*ल्ला केला. यानंतर पाश्चिमात्त्य देशांनी रशियाने युक्रेनवर आक्र*मण केले म्हणून रशिया आणि रशियाच्या राजकीय नेतृत्वामधील अनेकांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले. पण अद्याप रशिया आपले सैन्य मागे घ्यायला तयार नाही.
याउलट दोन दिवसांपूर्वी मॉस्कोजवळील एका कॉन्सर्टच्या ठिकाणावर झालेल्या द*हश*तवादी ह*ल्ल्यात रशियाच्या १०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा जीव गेला, यामुळे चवताळून उठलेलं रशिया काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.