आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“संडे हो या मंडे रोज खाओ अंडे” असं म्हणत लोकांना रोज अंडी खायला लावणाऱ्या ‘नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी’ला हे वाक्य नक्कीच लोकांच्या चहा आणि कॉफीच्या सेवनावरून सुचलं असेल. दिवसाला कमीत कमी दोन कप चहा किंवा कॉफी पिणारे भारतीय लोक आजचा दिवस कोणता आहे हे न पाहता चहा/कॉफी पितात. इथल्या उपवासांनादेखील चहा आणि कॉफी चालते हे नवलच. भारतीयांना चहाचं वेड लावलं ते ब्रिटिशांनी आणि कॉफीचं वेड लावलं ते अरब आणि इतर पाश्चिमात्त्य लोकांनी. बाबा बुदान नावाच्या मक्केला जाणाऱ्या एका भारतीय यात्रेकरूने १६७० साली कॉफीच्या बिया येमेनमधून भारतात आणल्या. त्यानंतर अगदी दुधात साखर मिसळावी तशी कॉफी भारतात मिसळली.
आजमात्र जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे सर्वच पिकं संकटात आली असून कॉफीच्या पिकांवरही याचा दूरगामी परिणाम होईल असे दिसते. जगप्रसिद्ध कॉफी चेन स्टारबक्सने यावर उपाय शोधून काढलाय. स्टारबक्सने अशा काही कॉफीच्या बिया तयार केल्या आहेत, ज्यांच्यावर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा काहीच परिणाम होणार नाही, निदान ते सध्या असा दावा करताहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..
स्टारबक्सने जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेल्या कॉफीच्या बियांचे सहा नवीन प्रकार सादर केले आहेत. आपण पीत असलेली बहुतेक कॉफी दोन प्रकारच्या बीन्समधून येते: अरेबिका आणि रोबस्टा.
अरेबिका बीन्सचा जागतिक कॉफी उत्पादनात तब्बल ७०% वाटा आहे. चव, सौम्य आंबटपणा आणि फ्रूटी नोट्ससाठी या बिया प्रसिद्ध आहेत. अरेबिका बीन्सचे उत्पादन प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेत होते. स्टारबक्सच्या जगभरातील सुमारे ३७ हजार स्टोअर्समध्ये याच बीन्सचा वापर होतो. परंतु या पिकावर तापमान वाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो, वाढत्या तापमानामुळे याचे पीक नष्ट देखील होऊ शकते.
रोबस्टा प्रकारच्या कॉफीच्या बिया उष्ण हवामानासाठी अधिक अनुकूल असतात, त्यामुळे त्यांची लागवड करणे सोपे असते. याउलट, अरेबिका बीन्स चवीला उत्तम असूनही ‘लीफ रस्ट’सारख्या रोगांना बळी पडतात. हे रोग प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात होतात. याशिवाय अरेबिका बीन्सची अनुवांशिक विविधता तुलनेने कमी असते, म्हणजेच अरेबिकाच्या वनस्पतींमध्ये भिन्न अनुवांशिक (जेनेटिक) वैशिष्ट्ये नसतात. यामुळे अरेबिका बीन्स रोगाला लवकर बळी पडतात.
हवामान बदल आणि वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी म्हणून स्टारबक्सला रोबस्टा प्रकारच्या कॉफी बीन्स वापरायचा पर्याय शिल्लक होता. पण स्टारबक्सने तसं न करता वाढते तापमान आणि हवामान बदल यांचा सामना करत अरेबिका बीन्स वापरायचे ठरवले आहे. या समस्यांवर उपाय शोधून काढण्यासाठी कॉफी बीन्सवर संशोधन करून नवीन प्रकारच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.
स्टारबक्सने ‘लीफ रस्ट’सारख्या रोगांना प्रतिकार करू शकतील अशा प्रकारचे अरेबिका बियाणे विकसित केले आहे. याशिवाय या नवीन प्रकारच्या बीन्स कमी वेळेत अधिक कॉफी तयार करतात हे देखील सिद्ध झाले आहे. स्टारबक्समधील शास्त्रज्ञांच्या टीमने विविध बियाणांच्या जाती आणि हायब्रीड झाडे एकत्र लावली होती, त्यांनी या पिकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि ते कशा प्रकारे पोषक तत्त्वे शोषून घेताहेत याचे तब्बल १२ वर्षे निरीक्षण केले.
स्टारबक्स हवामान बदल किंवा तापमानवाढीचा परिणाम न होऊ शकणाऱ्या ६ प्रकारच्या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांनी यातून येणारे उत्पन्न स्टारबक्सलाच विकावे असेही बंधन त्यांच्यावर नाही. स्टारबक्स कंपनी ३० देशांमधून, सुमारे ४ लाख शेतकऱ्यांकडून कॉफी खरेदी करते आणि मागील काही वर्षे इतर संस्थांनी विकसित केलेली हवामान बदल किंवा तापमानवाढीचा परिणाम न होऊ देणारी सुमारे तीस लाख बियाणी दरवर्षी शेतकऱ्यांना देत आहे. कोस्टा रिका, होन्डूरस, पेरू, मेक्सिको, चीन, इंडोनेशिया, ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना स्टारबक्स हे सुधारित बियाणे पुरवते.
हवामान बदल आणि तापमानवाढीचा धोका लक्षात घेता ज्या कंपन्या शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेतात त्यांनी स्टारबक्सकडून या संशोधनाचा आदर्श घ्यावा, तसेच विविध देशांतील सरकारांनीही येऊ घातलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे हाच इशारा या घटनांतून मिळत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.