आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्याकडे चित्रपटांची क्रेझ काही औरच असते. त्यातही जर रजनीकांतसारख्या सुपरहिरोचा चित्रपट असेल, तर त्याचा पहिला शो म्हणजे दक्षिण भारतात एक उत्सवच असतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही सिरीज चित्रपट देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात, उदाहरणार्थ केजीएफ सिरीज! हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्ल्याळम, इंग्रजी, भाषा कोणतीही असो, केजीएफ चित्रपट हिटच ठरतो.
चित्रपटांप्रमाणेच आपल्याकडे एकेकाळी रामानंद सागरचे रामायण आणि बी. आर. चोप्राचे महाभारत या आठवड्यातून एकदा लागणाऱ्या मालिकांची देखील प्रचंड क्रेझ होती. रविवारी सकाळी या मालिका लागल्यानंतर रस्ते सुमसान पडल्याचे तुम्ही आई-वडील किंवा आजी-आजोबांकडून ऐकलेही असेल.
लॉकडाऊनच्या काळातही रामानंद सागरच्या रामायणाने लोकांच्या मनाचा वेध घेऊन नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे रेकॉर्ड्स तोडले होते. चित्रपट आणि मालिकांबरोबरच नाटकेही आपल्याकडे प्रसिद्ध होती. पण चित्रपट, नाटक, किंवा मालिका यांसारख्या मनोरंजनाच्या साधनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?, निश्चितच नाही!
अमेरिकेत मात्र चित्रपट आणि त्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले होते. ‘स्टार वॉर्स’ म्हणजे हॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक. आजही तरुणांमध्ये ‘स्टार वॉर्स’ची क्रेझ आहे. पण याच ‘स्टार वॉर्स’मुळे अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले होते असे म्हटले तर?! कदाचित अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. पण १९९९ साली असं घडलं होतं, नेमकं काय होतं ते प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून.
बुधवार, २२ डिसेंबर १९९९ रोजी “स्टार वॉर्स: द फँटम मेनेस” रिलीज झाला आणि परिणामी अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रात २९.३ करोड डॉलर्सचे नुकसान झाले. बुधवारी झालेल्या फर्स्ट शोला देशभरातून तब्बल ५७ लाख लोक आले होते, त्यापैकी सुमारे २२ लाख लोक हे कोणत्या न कोणत्या कंपनीचे फुल-टाइम एम्प्लॉयी होते. त्यांनी आजारी असण्याच्या बहाण्याने ‘स्टार वॉर्स: द फँटम मेनेस’च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला हजेरी लावली होती.
१९९९ साली घडलेल्या या घटनेचा धक्का अमेरिकन अर्थव्यवस्थेत खोलवर जाणवला. “अटॅक ऑफ द क्लोन” गुरुवार दिनांक १६ मे, २००२ रोजी रिलीज होणार होता, तेव्हा ‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’या एम्प्लॉयमेंट फर्मने कंपन्यांना एक इशारा दिला. फर्मने कंपन्यांना त्यादिवशी अनेक लोक गैरहजर असणार आहेत हे सांगून तयार राहण्याचा सल्ला दिला होता. यालाच अमेरिकेत “स्टार वॉर्स सिकनेस” किंवा “डार्थ फ्लू” म्हणून संबोधले जात होते. डार्थ फ्लू म्हणजे ‘स्टार वॉर्स’ सिरीजमध्ये दाखवण्यात येणारा एक काल्पनिक रोग. हा रोग सर्व प्रजातींना बिनदिक्कतपणे होतो.
‘अटॅक ऑफ द क्लोन’च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला उपस्थित राहण्यासाठी सुमारे २६ लाख लोक आजारी असण्याचा बहाणा देऊन गैरहजर राहतील आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३१.९ करोड डॉलर्सचे नुकसान होईल असे भाकीत ‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’या एम्प्लॉयमेंट फर्मने केले. न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गैरहजेरीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता होती. कारण इथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या होत्या आणि त्यांच्यात काम करणारे कर्मचारी “सायन्स फिक्शन” असलेल्या “स्टार वॉर्स”चे ‘डाय-हार्ड’ फॅन्स होते.
१९९९ साली “स्टार वॉर्स: द फँटम मेनेस”च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला उपस्थित राहण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आजारी असण्याचा बहाणा केला असला तरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की काही कर्मचाऱ्यांना खरोखर आरोग्यसंबंधी किंवा इतर समस्या असू शकतात. तरीही “स्टार वॉर्स: द फँटम मेनेस”च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला उपस्थित असलेल्या डाय-हार्ड स्टार वॉर्स चाहत्यांच्या प्रचंड गैरहजेरीमुळे खरोखर रजेची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या. अगदी तसंच २००२ साली “अटॅक ऑफ द क्लोन” रिलीज झाला तेव्हा या अनुपस्थितीमुळे खरोखर रजेची गरज असलेले कर्मचारी आणि स्टार वॉर्सचे फॅन्स, दोघांसाठी अडचणी निर्माण झाल्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले ते वेगळेच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.