आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एक मानवी आयुष्य किती वैविध्यपूर्ण असतं याचा प्रत्यय आपण जवळ जवळ रोजच घेतो. कोणाचं कर्तृत्व कोणाला कुठे, कधी आणि कसं घेऊन जाईल हे कोणालाच ठाऊक नसतं. अनेकदा राजाचा रंक होतो, रंकाचा राजा. पण काहींच्या बाबतीत प्रचंड अनपेक्षित गोष्टीही होऊन बसतात. अशीच एक गोष्ट घडली होती सुमारे शतकापूर्वी, अमेरिकेत. नव्याने स्थापन झालेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन अर्थात एफबीआयची ही सर्वांत पहिली अवघड केस.
यावर “कि*लर्स ऑफ द फ्लॉवर मून” हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. असं नेमकं काय झालं होतं या प्रकरणामध्ये जाणून घेऊया या लेखातून..
‘अंकल सॅम’ची राज्य व्यवस्था
अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ओसेज काऊंटी येथे ओसेज जमातीची वस्ती आहे. ओसेज हे येथील मूलनिवासी. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेचा संपूर्ण भूभाग फेडरल सरकारच्या अधीन होता. त्यावर वेगवेगळ्या राज्याची सरकारे जरी वेगवेगळी असली तरी सार्वभौमत्त्व अमेरिकेचं होतं.
अमेरिकेत एकूण ५० राज्ये आहेत. प्रत्येक राज्याचे वेगळे संविधान आणि ध्वज असला तरी अमेरिकेच्या ध्वजाला आणि संविधानाला मान्यता आहे. या सर्वांवर नियंत्रण असते ते शेवटी फेडरल सरकारचे आणि ते नियंत्रण केले जाते विविध संस्थांद्वारे. उदाहरणार्थ, आर्थिक नियंत्रण होते फेडरल रिजर्व्ह बँकेद्वारे, सुरक्षेचे नियंत्रण होते डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (डीएचएस) आणि इन्वेस्टीगेशनचे नियंत्रण होते फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनच्या (एफबीआय) माध्यमातून.
एका गुराख्यापासून ते गडगंज श्रीमंत होण्यापर्यंतचा प्रवास..
याच एफबीआयच्या सुरुवातीच्या काही केसेसपैकी एक किचकट केस होती ओसेज मर्डर्सची. ओक्लोहोमा काउंटीमधील या केसमध्ये कोणताही व्यक्ती आरोपीविरुद्ध जबाब नोंदवायला तयार नव्हता, एवढी त्याची दह*शत पसरली होती. या आरोपीचे नाव होते विल्यम किंग हेल.
विल्यम १९०२ साली ओसेज काउंटीमध्ये आला तेव्हा तो एका तंबूत राहत असे. पण दोन दशकांतच तो गर्भश्रीमंत झाला, इतका की त्याने मनात आणलं तर त्याला कोणाचाही जीव घेणे सहज शक्य होते. या वर्षांमध्ये तो ओसेज हिल्सचा जणू राजाच बनला होता. ओसेज ह*त्याकां*डातील मास्टरमाईंड म्हणून त्याला दोषी ठरवले गेले, एफबीआयच्या स्थापनेपासूनच्या इतिहासातील ही पहिलीच मोठी केस होती.
विल्यम हेलचा जन्म टेक्सास राज्यातील ग्रीनविले याठिकाणी १८७४ साली ख्रिसमसच्या दिवशी झाला. त्याचे कुटुंब श्रीमंत तर होतेच शिवाय समाजामध्ये देखील त्यांना मान होता. त्याचे वडील शेतकरी होते, काही जनावरे देखील ते पाळत असत. वयाच्या सोळाव्या वर्षी विल्यमने घरदार सोडले आणि एक गुराखी होण्यासाठी म्हणून बाहेर पडला. पुढची काही वर्षे त्याने जनावरांची खरेदी-विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवला. त्याचे व्यक्त्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली होते, तो अजिबात वेळ दवडत नसे.
ओसेज काउंटीच्या भूगर्भामध्ये १८९० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडले. या संशोधनानंतर पर कॅपिटा अर्थात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत नेटिव्ह अमेरिकन्स जगातील सर्वांत श्रीमंत लोक बनले होते. ही गोष्ट विल्यम हेलपर्यंत पोहोचली. त्यालाही अशाच श्रीमंतीचा उपभोग घ्यायचा होता, पण ओसेज जमातीचा भाग नसल्याने त्याला सहजासहजी ही गोष्ट मिळवता येणार नव्हती.
१९०२ साली ओसेज काउंटीमध्ये आल्यानंतर त्याने एका स्थानिक नुकत्याच शिक्षिका झालेल्या मुलीबरोबर लग्न करून आपला संसार थाटला. काही महिने ते दोघेही तंबूत राहत असत. काही कारणांनी त्याच्यावर १० हजार डॉलर्सचे कर्ज होते, त्याची आजची किंमत सुमारे साडे तीन लाख डॉलर्स इतकी आहे.
काही वर्षे गुराख्यांसाठी काम केल्यानंतर त्याने दोन स्थानिक बँकांबरोबर हातमिळवणी करून ओसेज काउंटीमधील जमिनी भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे सुमारे ५० हजार एकर जमिनीची मालकी होती. याशिवाय त्याचे एक जनरल स्टोअर आणि स्मशान भूमीही होती. पण विल्यमचे फक्त यावरच भागणार नव्हते. खरी संपत्ती ही ओसेजच्या जमिनी भाडेतत्त्वावर देऊन मिळणार नाहीत तर त्यांच्याखाली असलेली खनिज संपत्ती काढूनच मिळेल अशी खात्री विल्यमला होती. पण स्थानिक नसल्याने त्याला तसे हक्क (ऑइल राईट्स) मिळणे शक्य नव्हते.
तेव्हा सिधी उंगली से घी नहीं निकले तो उंगली तेढी करनी पडती है असा विचार त्याने केला.
ओसेज किलिंग्स: नेमकं घडलं काय?
ओसेज नेशन म्हणजेच ओसेज जमातीच्या लोकांनी हे ऑइल राईट्स आपापसांत समानतेने वाटून घेतले होते. यालाच हेड-राईट्स असेही म्हणत असत. ओक्लाहोमा हिस्टरिकल सोसायटीच्या मते, १९२६ सालापर्यंत एक ओसेज कुटुंब (ज्यामध्ये आई-वडील आणि तीन मुले यांचा समावेश होतो) ६५ हजारांपेक्षा जास्त कमाई करत होते. आज त्याची किंमत सुमारे ११ लाख डॉलर्स आहे.
योगायोग म्हणा किंवा त्याचे सुदैव, पण विल्यम हेलच्या एका पुतण्याने ओसेज जमातीतील मॉली बुरखार्ट नावाच्या मुलीशी लग्न केले. काही जणांच्या मते हेलनेच त्याला मॉलीबरोबर लग्न करायला सांगितले होते. त्यांच्या लग्नानंतर मॉलीचे वार्षिक उत्पन्न सुमारे २६०७ डॉलर्स होते, त्याचे आजचे मूल्य सुमारे ८२ हजार डॉलर्स इतके आहे. तिचे हे उत्पन्न फक्त कच्च्या तेलाच्या माध्यमातून येत असे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने आपल्या अनेक नातेवाईकांच्या मालमत्तांवर हक्क सांगण्याची तयारी सुरु केली. जर तिचे हे नातेवाईक तिच्या आधीच मरण पावले असते तर तिला त्या मालमत्ता निश्चितच मिळाल्या असत्या.
त्याचीही व्यवस्था विल्यम हेलने केली होती.
१९१८ नंतर मॉलीच्या कुटुंबावर अचानक एका मागून एक संकट येण्यास सुरुवात झाली. तिच्या जवळ जवळ संपूर्ण कुटुंबाची ह*त्या करण्यात येत होती. सर्वप्रथम मॉलीची लहान बहीण मिनी एका अनाकलनीय रोगामुळे मरण पावली. मे १९२१ मध्ये तिची दुसरी बहीण आना ब्राऊनला गोळी मारून ठा*र करण्यात आले. त्यानंतर जुलै महिन्यातच तिची आई लिझी काइलवर विष*प्रयोग करण्यात आला. जानेवारी १९२३ मध्ये मॉलीच्या हेनरी रॉन नावाच्या चुलत बहिणीला गोळ्या मारून ठा*र केले गेले. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर मार्च १९२३ मध्ये तिची आणखी एक सक्खी बहीण रिटा स्मिथ तिच्या पती आणि नोकरासह घरात झालेल्या बॉ*म्बस्फो*टामध्ये मरण पावले.
या सर्वांची ऑइल राईट्ससह संपत्ती मॉली आणि तिचा पती अर्नेस्ट यांच्याकडे वारसा हक्काने आली.
दह*शतीची अभेद्य भिंत:
घडत असलेल्या घटनांची दखल घेऊन १९२३ साली जमातीच्या वरिष्ठांनी फेडरल सरकारला पाचारण करून घडत असलेल्या प्रकारात हस्तक्षेप करायची विनंती केली. जस्टीस डिपार्टमेंटने ही केस नव्याने तयार झालेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनला सोपवली. एफबीआयचा तपास पुढील तीन वर्षे सुरु होता. याचे कारण होते विल्यमने पसरवलेली दह*शत.
डॉन व्हाईटहेड यांनी आपल्या “द एफबीआय स्टोरी” या १९५६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिले आहे. “लोक काहीही बोलायला घाबरत होते आणि ज्यांनी या प्रकरणात साक्ष दिली होती ते लोक अनेक दिवसांपासून गायब होते.” या गावाच्या परिसरातील किंवा गावातील अगदी पोलीस आणि डॉक्टरांसारखे सुशिक्षित लोक देखील काहीही बोलत नव्हते, कारण त्यांची विल्यमशी मिलीभगत होती. अखेरीस चार अंडरकव्हर ऑफिसर्सच्या मदतीने या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात आला. या अंडरकव्हर ऑफिसर्सनी अर्नेस्टला बोलते केले.
गुन्हेगार पकडला गेला, पण शिक्षेचं काय?
१९२६ साली विल्यम हेलला फेडरल ग्रँड ज्युरीने हेनरी रॉनच्या ह*त्येसाठी दोषी ठरवले. ही ह*त्या ओसेजच्या भूमीवर नाही तर फेडरल भूमीवर झाली होती, त्यामुळे फेडरल सरकारला यामध्ये हस्तक्षेप करता आला. जॉन रॅम्से नावाच्या गुराख्यावर देखील ह*त्येचाच गुन्हा दाखल करण्यात आला, पण अद्याप हेलच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले नव्हते.
सुमारे तीन खटले या ना त्या कारणाने स्थगित करण्यात आले. जानेवारी १९२९ मध्ये चौथा खटला चालवण्यात आला, ज्यामध्ये हेलच्या वकिलानेही युक्तिवाद केला, यानंतर मात्र हेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यावर न्यायालय ठाम होते.
विल्यमचे विचित्र व्यक्तिमत्त्व
एवढ्या खटल्यांच्या दरम्यान न्यायालयाने एक गोष्ट मात्र प्रकर्षाने नमूद केली, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विल्यम हेलच्या चेहऱ्यावरील एक रेषाही हलली नव्हती. तो शांत होता. “त्याला मृत्युदंड झाला असता तर त्याने जल्लादाला आपल्या गळ्यातील दोरखंड व्यवस्थित करण्यास मदत केली असती आणि तो हसत हसत फासावर गेला असता. त्याच्या चेहऱ्यावरील स्मित क्वचितच विरत असे.” असे ऑगस्ट १९२६ मध्ये एका पत्रकाराने लिहिले आहे.
“जेव्हा शेवटच्या खटल्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हाही तो अगदी प्रसन्न होता. तो दुसऱ्या दिवशीही आनंदी असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.” असे असोशिएटेड प्रेसने नमूद केले आहे.
विल्यमचे सुटकेनंतरचे आयुष्य
हेलने दोन दशके कॅन्ससच्या लीव्हनवर्थ येथे फेडरल तुरुंगात किंवा या तुरुंगाच्या आसपासच्या शेतांमध्ये काम करत घालवली. अनेकांच्या मते तो एक “आदर्श कैदी” होता. जुलै १९४७ मध्ये त्याला पेरोलवर सोडण्यात आले. पण हा ओसेजच्या लोकांसाठी एक धक्काच होता. “तुरुंगामध्ये तो कितीही चांगला वागला असला तरी त्याने जमातीतील अनेक लोकांची हत्या केली होती ही वस्तुस्थिती तर नाकारता येत नाही. त्याला या प्रकरणामध्ये मृत्युदंड व्हायला पाहिजे होता.” असे अनेकांचे मत आहे.
सुटकेनंतरही एफबीआयने त्याच्यावर कडवे लक्ष ठेवले होते. १९५६ साली जे. एडगर हूव्हर यांच्यासाठी लिहिल्या गेलेल्या एका मेमोमध्ये, तो मोन्टाना येथे राहत असून मोटर-रेस्टॉरंट-ड्राइव्ह-इन कॉम्बिनेशनमध्ये काम करत होता. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये त्याने गुराख्याकडे आणि डिशवॉशर म्हणून रेंज रायडर्स बार अँड कॅफे येथे काम केले आहे असे वर्णन आले.
अखेर ऑगस्ट १९६२ मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी विल्यमचा मृत्यू झाला, त्याला कॅन्सस येथे दफन करण्यात आले.
संपत्तीच्या मोहापायी विल्यमने सुरळीत सुरु असलेल्या आयुष्याला सुरुंग लावला. त्याच्या या कथेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.