आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेटला जेंटलमन्स गेम असं म्हणतात, याचा शब्दशः अर्थ होतो, सभ्य लोकांचा खेळ.पण कित्येक मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांमुळे या नावावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. पाकिस्तान तर अनेकदा मॅच फिक्सिंगच्या प्रकरणांमध्ये अडकलं आहे, तसं पाहायला गेलं तर पाकिस्तानची क्रिकेट टीम कधीही खिलाडू वृत्तीने मैदानात उतरत नाही.
भारतात मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाबतीत खूप कमी वेळा फ़िक्सिन्गची प्रकरणं समोर आली आहेत. काही अपवाद असतीलही, तरी प्रमाण मात्र कमी आहे. ऑस्ट्रलिया क्रिकेट टीम तर २०१८ साली बॉल टेम्पेरिंगच्या मुद्द्यावरून चांगलीच चर्चेत आली होती. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये केला होता. काय होतं नेमकं ते प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून..
२००८ साली ऑस्ट्रलियातील सिडनी येथे भारत-ऑस्ट्रेलियाच्या तीन मॅचेसच्या सिरीजमधली दुसरी मॅच सुरु होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. भज्जी बॉलिंग करत होता, तर धोनी नेहमीप्रमाणे विकेट किपर. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराची पहिलीच विकेट पडली शून्यावर पडली. रिकी पॉईंटिंग १७ रन्सवर खेळत होता. सौरव गांगुली बॉलिंग करत होते. रिकीच्या बॅटला बॉल लागून थेट धोनीच्या हातात गेल्याचे स्पष्ट दिसत होते, पण तरीही अम्पायरने नॉट आउट दिला.
अशा परिस्थितीतही १३४ रन्स देऊन भारताने ऑस्ट्रेलियाचे ६ विकेट्स घेतले होते. यानंतर काही वेळाने आला अँड्र्यू सायमंड्स. सायमंड्सचे ३० रन्स झाल्यानंतर इशांत शर्माच्या बॉलवरसुद्धा सायमंड्सच्या बॅटला बॉल लागून थेट धोनीच्या हातात गेल्याचे स्पष्ट दिसले, इतकंच नाही तर यावेळी तसा आवाजही झाल्याने सगळ्या खेळाडूंनी जल्लोष केला. पण यावेळीही बहुधा अम्पायरला आवाज ऐकू न गेल्याने नॉट आउट देण्यात आला.
काही वेळाने पुन्हा कुंबळेच्या बॉलवर धोनीने स्टंपिंग केलं आणि यावेळी निर्णय थर्ड अम्पायरला विचारण्यात आला. पण यावेळीही थर्ड अम्पायरने सायमंड्सचे पाय हवेत असलेले स्पष्ट दिसत असूनही नॉट आउट दिला. यानंतर पुन्हा एकदा भज्जीच्या बॉलवर धोनीच्या हातून सायमंड्सचं स्टंपिंग झालं पण यावेळी तर अम्पायरला थर्ड अम्पायरकडे देखील जाण्याची गरज वाटली नाही आणि त्याने नॉट आउट दिला. एक दोनदा नाही तर तीन वेळा आउट असूनही सायमंड्सला नॉट आउट देण्यात आलं होतं. सायमंड्सने याच मॅचमध्ये १६२ रन्स केले. ऑस्ट्रेलियाने ४६३ रन्सपर्यंत मजल मारली.
पुढच्या इनिंगमध्येही असेच ऑस्ट्रेलियासाठी अनुकूल निर्णय घेण्यात आले. वसिम जाफर ३ रन्सवर क्लीन बोल्ड झाला, पण ब्रेट ली ने टाकलेला तो चेंडू “नो बॉल” होता हे स्पष्ट दिसत होतं. तरीही अंपायरने आऊट दिला. एवढं होऊनही व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरने सेंच्युरी ठोकत मॅच पुढे नेली.
राहुल द्रविड मॅच ड्रॉ करण्याच्या प्रयत्नांत होते. पण स्टंपिंगसाठी अपील झाली आणि बॉल बॅटपासून सुमारे फूटभर अंतरावरून गेला असतानाही अम्पायर स्टीव्ह बकनरने आउट दिला. सौरव गांगुली खेळायला उतरल्यानंतर तर कहरच झाला. ब्रेट ली ने टाकलेल्या बॉलवर सौरवने चौकार मारायचा प्रयत्न केला, पण क्लार्कने कॅच घेतला, वास्तविक तो बॉल जमिनीला लागून क्लार्कच्या हातात पडला होता, आपल्याला स्क्रीनवर तसं स्पष्ट दिसतंही.. यावेळी आउट दिल्यानंतर मात्र सौरव पिचवरुन हटायला तयार नव्हते. यावेळी थर्ड अम्पायरला निर्णय विचारण्याऐवजी अम्पायरने ऑस्ट्रेलियन कॅप्टनला निर्णय विचारला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेयरने आउटचा इशारा करताच अंतिम निर्णय देण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच प्लेयर्सच अम्पयार बनले होते..
कदाचित “ठरल्याप्रमाणे” भारत मॅच हरलाही, पण भारतीय संघाला आपल्या पराभवापेक्षाही खिलाडूवृत्तीच्या पराभवाचे जास्त दुःख होते.
मॅचनंतरही सायमंडने भज्जीविरोधात तक्रार दिली. “हरभजनने आपल्याला ‘मंकी’ म्हणून वर्णभेदी कमेंट्स केल्या आहेत” असे त्याचे मत होते. पण हरभजनने हे आरोप फेटाळून लावले. तरीही भज्जीवर खटला भरला गेला आणि त्याच्यावर पुढच्या तीन मॅचेससाठी बंदी घालण्यात आली.
भारतीय क्रिकेट संघाला तिथून पुढच्या मॅचसाठी जायचे होते, त्यासाठी तयारी करून ते बसमध्ये बसलेही, पण अचानक सगळे भारतीय खेळाडू बसमधून उतरले आणि त्यांनी बीसीसीआयला फोन करून ‘आमच्यावर अन्याय होत असून आता आम्ही सिरींजमधल्या पुढच्या मॅचेस खेळू शकत नाही’ असे स्पष्ट सांगून टाकले. हे ऐकून संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. यानंतर मात्र हरभजन सिंग यांना क्लीन चिट देण्यात आली.
मुद्दा कोणताही असो, मग तो मॅच फ़िक्सिन्ग असो किंवा दोन्ही संघांतील खेळाडूंमधील एकमेकांच्या सन्मानाचा. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम त्या वर्षी दोन्हीकडे सपशेल हरली होती. त्यादिवशी तर ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली होती. पण, खिलाडूवृत्तीला चितपट करून जिंकलेल्या या मॅचचा “कलंक” ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमवर कायमचा राहणार हे निश्चित. अनेकांच्या मते, या मॅचनंतरच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला उतरती कळा लागली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.