आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पुण्यात किंबहुना भारतात राहणारा प्रत्येक माणूस चौकाचौकात असलेल्या सिग्नलला वैतागतो. छोटे रस्ते, प्रचंड ऊन असो वा पाऊस, चौकातले सिग्नल्स मात्र चालूच असतात. तेव्हा आपल्याही मनात अनेकदा हे सिग्नल्स आले तरी कुठून असा प्रश्न नक्कीच आला असेल. हा प्रश्न खऱ्या अर्थाने व्हॅलिड आहे. सिग्नलला देखील एक इतिहास आहे. तो इतिहास नक्की काय हे जाणून घेण्यासाठी हा प्रपंच..
युरोपात औद्योगिक क्रांतीनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. अनेक गोष्टींची गरज भासू लागली, या गरजांमुळे अनेकविध शोध लागू लागले, त्यातच जन्म झाला आगगाडीचा. रस्त्या-रस्त्यावरून जाणारे बग्गी आणि टांगे देखील वाढले. अन् अगदी बग्गी आणि टांग्यांच्या जमान्यापासून सिग्नलची गरज भासू लागली. त्यावेळी एखाद्या भरभक्कम माणसाने हे पहिले वहिले ‘ट्रॅफिक’ कंट्रोल करणे अपरिहार्य होते, त्यामुळे शहराचं पोलीस डिपार्टमेंटच यामध्ये लक्ष घालू लागलं.
पहिल्या सिग्नलची निर्मिती झाली १८६८ साली. रेलरोड इंजिनिअर जे. पी. नाईट यांनी या सिस्टीमची निर्मिती केली होती. ही सिस्टीम दोन फळ्या (तराफा) असलेल्या सेमाफोर नावाच्या यंत्राच्या मदतीने चालत असे. सिग्नल सिस्टीम चालवण्यासाठी एक पोलीस नियुक्त केला जात. जर पोलिसाने एक फळी आडवी दाखवली तर “थांबा” असा इशारा असे. जर फळी ४५ अंशाच्या कोनात, तिरकी असेल तर तो पादचारी आणि चालकांसाठी सावधानतेचा इशारा असे. रात्रीच्या वेळी मात्र ही सिस्टीम काम करत नसे, मग त्या जागी गॅस लाईट्सचा वापर होत असे.

जे. पी. नाईट यांनी तयार केलेली ही सिस्टीम सर्वप्रथम लंडन येथे पार्लमेंटजवळ जॉर्ज आणि ब्रिज स्ट्रीटच्या चौकात बसवण्यात आले होते. पण तिथे ही व्यवस्था फार काळ टिकली नाही. जानेवारी १८६९ साली गॅस लाईट्सचा स्फोट झाला आणि ते हाताळणारा व्यक्ती जखमी झाला. येथेच जे. पी. नाईट्सच्या शोधाचा शेवट झाला.
जरी हे संशोधन फार काळ टिकले नसले तरी ते बरेच प्रसिद्ध झाले होते. नंतरच्या काळात एका उंच लोखंडी पोलवर फळ्या (तराफा) लावल्या जात, याचा ऑपरेटर अनेकदा एक पोलीस ऑफिसर असे. त्याच्याकडेच संपूर्ण ट्रॅफिकचे नियंत्रण असत. मग तो ऑफिसर गर्दीचा अंदाज घेऊन सिग्नल सुटण्याच्या आधी शिट्टी देत असे.
सेमाफोरच्या ऑपरेटर्सना ट्रॅफिकचा अंदाज अचूक यावा यासाठी, आणि कदाचित सतत वाहणाऱ्या गाड्यांपासून त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने १९१०-१९२० च्या दशकात अमेरिकेच्या काही शहरांमध्ये लहान आकाराचे बूथ उभारले गेले. चौकाच्या मधोमध किंवा बाजूला ठराविक उंचीवर हे बूथ्स असत.

विसाव्या शतकापर्यन्त ट्रॅफिक लाईट्स आणण्याचे प्रयत्न होत राहिले. पण ५ ऑगस्ट १९१२ साली, अमेरिकन ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ट्रॅफिक लाईट्स यशस्वीरीत्या तयार केल्या. त्यावर्षीच न्यूयॉर्कमधील वन हंड्रेड फिफ्थ स्ट्रीटवर आणि ओहियो राज्यातील क्लिव्हलँड येथील युक्लिड अव्हेन्यू याठिकाणी या लाईट्स बसवण्यात आल्या. या सिग्नलमध्ये सुरुवातीला दोनच रंगांचा वापर झाला. लाल आणि हिरवा. या सिग्नलमध्ये एक बझरसुद्धा लावण्यात आले होते. सिग्नलची लाईट बदलताना हे बझर वाजत असे.
अशा प्रकारे तुम्हाला आम्हाला नकोशा वाटणाऱ्या पण तरीही सुरक्षित ठेवणाऱ्या ट्रॅफिक सिग्नल्सचा शोध लागला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.