आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पृथ्वीच्या एकूण भागापैकी जमिनीपेक्षा समुद्र जास्त आहे. समुद्र एवढा विशाल आणि खोल असल्याने त्यातील काही रहस्ये, जीव इत्यादींचं कोडं माणसाला अजूनही, एवढी वैज्ञानिक प्रगती होऊनही उलगडलेलं नाही.
असंच एक रहस्य आहे अगदी क्वचितच किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या मर्यादित खोलीत दिसणाऱ्या माशाचं. हा काही साधारण मासा नसून समुद्री जगतातील सर्वांत लांब माशांपैकी एक आहे. आकाराने लांब असल्याने तो अगदी कमी वेगाने पोहतो. औरफिश असे त्याचे नाव. काही जण याला डूम्सडे फिश किंवा डेथ फिश असेही म्हणतात. जपानमध्ये या माशाला समुद्रात राहणाऱ्या ड्रॅगन देवतेचा अवतार मानतात. हा मासा काहीतरी अघटित होणार आहे याचा संकेत घेऊन किनाऱ्यावर किंवा किनाऱ्याचा आसपास येतो अशीही मान्यता आहे.
समुद्रात सापडणारा हा सर्वांत मोठा हाडे असलेला मासा (बोनी फिश) असून त्याची लांबी सुमारे २० ते ३० फूट असू शकते.
सामान्यतः औरफिश समुद्राच्या तळाशी, समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार फूट खाली असतो. पण या माशाचे किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या पृष्ठभागावर दर्शन होणे अगदी तैवानपासून ते जपानपर्यंत अतिशय अशुभ मानले जाते. जुलै २०२३ मध्ये तैवानमधील अनेक मच्छीमारांना सुमारे ६०० पौंड्स अर्थात २७२ किलोचा औरफिश दिसला. खरंतर काही डायव्हर्सना डायव्हिंग करताना या माशाचे दर्शन झाले होते. हा मासा समुद्रकिनाऱ्यावर किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ दिसल्यास काहीतरी अघटित होणार आहे असे मानले जाते.
२०११ साली जपानच्या फुकुशिमामध्ये ९.१ मॅग्निट्युडचा भूकंप, त्सुनामी आणि न्यूक्लिअर रिऍक्टर्सच्या अपघात झाला होता. या घटनेच्या आधी काही दिवस मच्छीमार, अधिकारी आणि काही स्थानिक लोकांना याच प्रकारच्या सुमारे २० माशांचे दर्शन किनाऱ्यावर झाले होते. २०१९ साली देखील अशाच प्रकारचे अनेक औरफिश मासे जपानच्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर आढळून आले होते. त्यावेळी जपानमध्ये सुमारे ७.३ मॅग्निट्युडचा प्रचंड मोठा भूकंप झाला होता, याशिवाय त्याच दिवशी जपानमध्ये विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.
जपानशिवाय २०१० साली चिली या देशातसुद्धा या माशाचे समुद्रकिनाऱ्यावर दर्शन झाल्यानंतर सुमारे ८.८ मॅग्निट्युडचा भूकंप आला होता. २०१७ साली फिलिपिन्सच्या किनाऱ्यावर देखील अशाच प्रकारचे ६ मासे आढळून आले होते. तेव्हा फिलिपिन्समध्येही ६.३ मॅग्निट्युडचा भूकंप आला होता.
समुद्राच्या पृष्ठभागाखाली ३ हजार फूट खोलीमध्ये राहणारा हा मासा कोणत्यातरी गोष्टीला घाबरून आपली जागा सोडत असेल याचीही दाट शक्यता आहे. अनेकदा भूकंप येणार असल्यास पक्षी आणि प्राणी विचित्र पद्धतीने वागू लागतात. तशीच वागणूक या माशाची देखील असू शकते. तैवान हे देखील एक भूकंपप्रवण क्षेत्र आहे.
कदाचित या घडलेल्या सर्व घटना योगायोगही असू शकतील. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, डेथफिश केवळ पौराणिक कथांचा काही भाग आहे. तसेच, सांगितल्या जाणाऱ्या घटनांशी जोडला गेलेला त्याचा संबंध निव्वळ योगायोग असून या दाव्यांमागे कोणतेही विज्ञान नाही. खरंतर औरफिश अनेकदा प्रचंड शक्तिशाली लाटांमुळे किनाऱ्यावर धडकू शकतात. याशिवाय अन्य काही माशांच्या प्रजातींप्रमाणे या प्रजातीचे मासे देखील किनाऱ्याजवळ येऊन प्रजनन करतात, कारण समुद्राच्या खोलीत त्यांचे स्नायू मजबूत होतील अशी तत्त्वं त्यांना मिळत नाहीत.
आता हे मासे किनाऱ्यावर येण्याचं नक्की कारण काय याची कारणमीमांसा आपण करू शकतोच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्की कमेंट्स करून सांगा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.