आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१९७५ पासून दर चार वर्षांनी खेळल्या जाणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या २०२३ च्या सिजनचा आज अंतिम सामना. भारताने या विश्वचषकात असामान्य खेळी करून सर्व संघांबरोबर झालेल्या मॅचेस जिंकल्या आहेत. भारताचा संघ आता ऑस्ट्रेलियाबरोबर फायनलच्या महालढतीसाठी अहमदाबादमध्ये आहे.
यावर्षी झालेला क्रिकेट वर्ल्ड कप सर्वार्थाने विशेष म्हणावा लागेल. विराट आणि शमीने तोडलेले रेकॉर्डस्, ग्लेन मॅक्सवेलने ठोकलेले द्विशतक, भारताच्या उपांत्य फेरीसाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज्जांनी वानखेडे स्टेडियममध्ये लावलेली हजेरी, आणि अशाच अनेक गोष्टींमुळे हा वर्ल्ड कप अविस्मरणीय ठरला.
आज म्हणजेच दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस देखील उपस्थित असणार आहेत, याशिवाय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखोंच्या संख्येने प्रेक्षकही उपस्थित असणार आहेत. एकूणच गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी झाल्यानंतर भारतातला हा सर्वांत मोठा उत्सव असेल असे दिसते.
यावर्षी क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात देखील अतिशय उत्साहात झाली. अशी सगळी जय्यत तयारी असताना भारतीय वायुसेनेने देखील या सामन्याची शान वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. सामन्यादरम्यान भारतीय वायुसेनेची सूर्य किरण एरोबॅटीक टीम प्रात्यक्षिके दाखविणार आहे. भारतीय वायुसेनेचे आन-मान-शान असलेली सूर्यकिरण एरोबॅटीक टीम नेमकी काय आहे, एरोबॅटीक्स म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचा आढावा घेणारा हा लेख…
“सूर्यकिरण” ही भारतीय वायुसेनेची एरोबॅटीक टीम आहे. एरोबॅटीक टीम म्हणजे आधीच कोरियोग्राफ केलेल्या काही एअर फॉर्मेशन्सद्वारे वैमानिकांचे कौशल्य आणि अचूकता प्रदर्शित करणाऱ्या टीम्स. हे संघ अनेक एअर शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नावाप्रमाणेच चमकदार कामगिरीसाठी ओळखले जातात.
सूर्यकिरण एरोबॅटिक टीम ही भारतीय हवाई दलाची एरोबॅटिक प्रात्यक्षिके दाखविणारी टीम आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच ते नेत्रदीपक प्रात्यक्षिकं करतात. या संघाची स्थापना १९९६ साली करण्यात आली आणि तेव्हापासून ते देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतीय हवाई दलाच्या एअर शोचा अविभाज्य भाग आहे.
भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम सुरुवातीला हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेडने तयार केलेले किरण मार्क II हे विमान उडवत असे, किरण मार्क II संपूर्णतः स्वदेशी बेसिक ट्रेनर विमान आहे. २०१५ साली, या टीमने अत्याधुनिक हॉक एमके १३२ विमानांचा स्वीकार केला, या प्रकारची विमानं हिंदुस्थान ऐरोनौटिक्स लिमिटेड देखील तयार करते.
सूर्यकिरण टीम आपल्या अचूक आणि चित्तथरारक एरोबॅटिक डिस्प्लेसाठी जगभर ओळखली जाते, यामध्ये विमानांच्या विविध प्रकारच्या हवाई रचनांचा समावेश होतो. सूर्यकिरण टीम अनेकदा लूप, रोल आणि वेगवेगळे प्रकारचे क्लिष्ट पॅटर्न्स आकाशात साकारताना दिसते. अशी क्लिष्ट प्रात्यक्षिकं म्हटल्यावर प्रशिक्षणही तसं तगडं मिळतं. सूर्यकिरण टीमचे मेम्बर्स भारतीय हवाई दलातील कुशल आणि अनुभवी लढाऊ वैमानिक असतात. एरोबॅटिक डिस्प्ले दरम्यान एकमेकांमधील ताळमेळ ठेवण्यासाठी तसेच सर्व सदस्यांची सुरक्षितता ठेवण्यासाठी ते अनेक महिने ट्रेनिंग घेतात.
भारतीय हवाई दलाचे प्रोफेशनॅलिजम आणि क्षमता दाखवून देत भारत आणि परदेशातील विविध एअर शोज आणि वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये हा संघ भाग घेतो. सूर्यकिरण टीमचे प्रदर्शन म्हणजे पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण रचनांचे मिश्रण असते. आशियातील सर्वात मोठ्या एअर शोपैकी एक असलेल्या, आणि प्रत्येकी दोन वर्षांनी होणाऱ्या ‘एरो इंडिया’ एअर शोमध्ये सूर्यकिरण टीम नियमितपणे सहभागी होत आली आहे. याव्यतिरिक्त, संघाने आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशाच्या एअर फोर्सच्या स्किल्स दाखवून दिल्या आहेत.
तर अशा या नेत्रदीपक सूर्यकिरणांच्या साक्षीने आजचा वर्ल्डकप २०२३ अंतिम सामना पार पडत आहे. एअर फोर्सने याची रंगीत तालीम घेतली असून प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी होणारे प्रात्यक्षिके पाहणे औत्सुक्याचे ठरेल..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.