आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लहानपणी तुम्ही नक्कीच श्रेक नावाचे कार्टून पहिले असेल. हिरव्या रंगाचे अवाढव्य कॅरेक्टर जगातील बिनकामी नियमांचे उल्लंघन करून परीकथांवर विनोद करत असतं. सुरुवातीला श्रेक एक रागीट आणि एकाकी व्यक्तिरेखा दाखवली जाते, पण त्याची दुसरी बाजू देखील याच सिरीजमध्ये उघड होते. जसजशी सिरीज पुढे सरकते तसतसा श्रेकचा मृदू स्वभाव आणि विनोदबुद्धी अधिक स्पष्ट होत जाते. विनोदी आणि व्यंग्यात्मक वक्तव्य त्याची ओळख बनतात.
एका खऱ्याखुऱ्या माणसापासून प्रेरणा घेऊन हे कॅरेक्टर तयार झाले आहे. फ्रेंच-रशियन कुस्तीपटू मॉरिस टिलेट असं त्या माणसाचं नाव. मॉरिसचे शरीर वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याचे शरीर सामान्यांप्रमाणे नाही तर प्रचंड अवाढव्य होते. ॲक्रोमॅगली नावाच्या रोगामुळे त्याच्या शरीराची अनियंत्रित वाढ झाली होती. नेमका कोण होता हा मॉरिस आणि त्याच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी हा लेख..
मॉरिस टिलेटचा जन्म १९०३ साली फ्रेंच आई-वडिलांच्या पोटी रशियामध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्या मोहक आणि निष्पाप चेहऱ्यामुळे त्याच्या आईने त्याला अँजेल असे टोपणनाव दिले होते. तो इतरांप्रमाणेच नॉर्मल आणि सुंदर तरुण मुलगा होता. १९१७ साली रशियामध्ये सुरु झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीमुळे मॉरिसच्या आईने आपल्या मुलासह फ्रान्समध्ये स्थलांतर केले. त्यानंतर त्याच्या शरीराची वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. ही वाढ मुळीच सामान्य नव्हती. त्याचे डोके, छाती, हात आणि पायांची प्रचंड प्रमाणात वाढ होत होती. वयाच्या विसाव्या वर्षीच त्याला अक्रोमॅगली नावाचा रोग असल्याचे निदान झाले.

पिट्यूटरी ग्रंथीवर (मेंदूच्या मागच्या पृष्ठभागाच्या मध्यात असलेली नलिकाविरहित ग्रंथी) ट्युमर तयार झाल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे पिट्यूटरी ग्रंथी वाढीचे अत्यधिक हॉर्मोन्स तयार करते. मॉरिसच्या ऐन तारुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळेच त्याची उंची वाढण्याऐवजी हाडे अधिक जाड होऊ लागली. यामुळेच त्याचा चेहरा आणि शरीर देखील प्रचंड मोठे झाले.
या रोगामुळे त्याच्या आवाजावरही परिणाम झाला, म्हणून त्याने आपल्या कायद्याच्या पदवीचा अभ्यास देखील अर्ध्यात सोडून दिला. कालांतराने त्याने आपली अर्ध्यावर सोडलेली डिग्रीदेखील पूर्ण केली पण आपल्या विचित्र आवाज आणि स्वरूपामुळे तो कधीही यशस्वी होणार नाही असे त्याला वाटले. त्यानंतर मॉरिस फ्रेंच नौदलात अभियंता बनला, त्यामध्ये मॉरिसला चीफ पेटी ऑफिसर हे पद बहाल करण्यात आले. तो प्रचंड बुद्धिमान होता. मॉरिसचे सुमारे १४ भाषांवर प्रभुत्व असल्याचे सांगितले जाते.
फ्रेंच नौदलामध्येच त्याने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. कुस्तीच्या या प्रशिक्षणानंतर त्याने युरोप आणि इंग्लंडमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावले. फ्रेंच नेव्हीने दिलेले प्रशिक्षण आणि शारीरिक ताकद यांच्या जोरावर त्याने सर्व सामने जिंकले. यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. तिथे त्याला एक प्रोफेशनल कुस्तीपटू म्हणून कीर्ती मिळाली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हरवत असे. प्रतिस्पर्धी एकदा दमला की तो अस्वलाप्रमाणे त्याला कवटाळत असत. यालाच बेअर हग म्हणतात, ही त्याची सिग्नेचर स्टाईल होती.
कुस्तीशिवाय तो वैज्ञानिक क्षेत्रातही प्रसिद्ध होता. त्याला निअँडरटल माणसाच्या सर्वांत जवळचा आणि आजवर जिवंत असलेला माणूस म्हणून मान्यता मिळाली. निअँडरटल्स ही एक विलुप्त प्रजाती किंवा पुरातन मानवांची उपप्रजाती आहे जी सुमारे ४० हजार वर्षांपूर्वी युरेशियामध्ये राहत होती. मॉरिसची शारीरिक रचना देखील या निअँडरटल माणसाच्या शरीररचनेशी मिळतीजुळती होती. शिकागो येथील ‘फिल्ड म्यूजियम फॉर नॅचरल हिस्ट्री’ याठिकाणी निअँडरटल माणसाच्या काल्पनिक चित्रांबरोबर त्याचे फोटोदेखील काढण्यात आले.

मॉरिस आपल्या प्रचंड शारीरिक क्षमतेमुळे ट्रेन, बस किंवा मोटार कार अतिशय लीलया ओढत असे. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जात असत. त्याच्या काळातील सर्व बलाढ्य आणि शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या पैलवानांबरोबर त्याने कुस्ती खेळली होती आणि तो जिंकलाही होता. याच अद्वितीय कारनाम्यांमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक संरचनेमुळे त्याला अनेक फ्रेंच आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण त्याला अनेकदा जगातील सर्वांत कुरूप माणूस म्हणूनही संबोधले गेले.
सन १९४६ पर्यंत तो अमेरिकेतील सर्वांत जास्त शुल्क घेणारा क्रीडापटू बनला होता. शारीरिक संरचनेमुळे तो कदाचित वरवर पाहता रागीट माणूस वाटेलही, पण तो एक सभ्य, सुशिक्षित आणि दयाळू माणूस होता. त्याला चेसची प्रचंड आवड होती. आपला मित्र पॅट्रिक केलीसोबत तो बराच वेळ चेस खेळण्यात घालवत असे.
आयुष्याच्या मध्यानंतर या रोगामुळे त्याला प्रचंड शारीरिक वेदना होत असत. त्याला अनेक वैद्यकीय समस्या देखील होत्या. १९५४ साली, वयाच्या ५१व्या वर्षी, न्यूमोनियामधून बरं होत असताना, हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आणि ही ज्वलंत कारकीर्द थाम्बली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे श्रेक नावाचे कॅरेक्टर तयार करण्यात आले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.