आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील अनेक स्पेस कंपन्या आणि देशाच्या स्पेस एजन्सीजनी आपापले सॅटेलाईट्स अंतराळात सोडले असून ते वर्षभर सबंध पृथ्वीवर नजर ठेऊन असतात. विशेषतः युरोप, अमेरिका आणि जगातील काही प्रभावशाली देशांचे सॅटेलाईट्स. युरोपियन स्पेस एजन्सीचा असाच एक जिओ-आय-१ हा सॅटेलाईट काही दिवसांपूर्वी उत्तर ब्राझीलवरून प्रवास करीत होता. या सॅटेलाईटला उत्तर ब्राझीलमध्ये मोठ्या भूभागावर काही काळे डाग आढळून आले. यापूर्वी त्याठिकाणी असं काहीही दिसलं नव्हतं. ही नापीक जमीन पशुपालकांनी साफ केल्याचं त्यांना समजलं, पण त्या भूभागावरील मोठ्या काळ्या डागांचं कोडं काही अजून सुटलं नव्हतं.

सुरुवातीला हे काळे डाग म्हणजे बॉ*म्बस्फो*टामुळे तयार झालेले खड्डे किंवा अन्य काही कारणांनी खणलेले खड्डे असल्याचा निष्कर्ष लावण्यात आला. याचे अवलोकन करणाऱ्या अभ्यासकांना अशा प्रकारचे सुमारे ३०० खड्डे असल्याचे आढळून आले. या सॅटेलाईट इमेजेसवर आणखी संशोधन करताना ते कोणत्याही प्रकारचे खड्डे नसून जमिनीवर तयार झालेले मातीचे ढिगारे आहेत हे स्पष्ट झाले. ऍमेझॉनमध्ये अशाच प्रकारचे ६ हजार मातीचे ढिगारे सापडले होते, पण त्या ढिगाऱ्यांचा वापर मृतदेहांसाठी करण्यात आला होता.
३,८६,००० स्क्वेअर माइल्सच्या या वनक्षेत्रात सापडलेले हे ढिगारे मात्र वेगळ्या प्रकारचे होते. या क्षेत्राला व्हाईट फॉरेस्ट असेही म्हणतात. इथे असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे इथली झाडे फार कमी काळ टिकतात, तसेच अन्य ठिकाणांच्या जंगलांपेक्षा याठिकाणी कमी वन्यजीव आढळतात.
प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मात्र हे ढिगारे म्हणजे वाळवी कीटकांचे वारुळं असल्याचं लक्षात आलं.
अनेकदा लाकडाला वाळवी लागून जुन्या लाकडी इमारती कोसळण्याची शक्यता असते. लाकूड पोखरणारा हा कीटक जुने लाकडी बनावटीचे वाडे, इमारती, किंवा दगडी इमारतींमधील लाकडी दारा-खिडक्यांमध्येसुद्धा आढळून येतो.
वाळवी मुख्यतः उष्ण भागांमध्ये आढळून येते. पालापाचोळा, मातीमध्ये राहिलेले वनस्पती किंवा प्राण्यांचे अवशेष आणि प्रामुख्याने लाकूड या गोष्टींवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. याशिवाय ते दिसायला मुंग्यांप्रमाणेच असतात, आकाराने लहान आणि रंगाने पांढऱ्या असलेल्या या किड्यांना काही पाश्चिमात्त्य “व्हाईट अँट्स” असेही म्हणतात. त्यांना “व्हाईट अँट्स” संबोधण्यामागे कारण म्हणजे ते मुंग्यांप्रमाणेच सतत कार्यरत असतात. पण मुंग्यांचा आणि वाळवीचा थेट संबंध नाही.
वाड्यांच्या इमारतींच्या लाकडाचं नुकसान करणारे हे किडे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. अनेक ठिकाणी त्यांच्या वारुळांची भली मोठी साम्राज्यं पसरलेली आहेत. वर सांगितल्याप्रमाणे ईशान्य (उत्तर पूर्वीय) ब्राझीलमध्ये या कीटकांच्या वारुळांची प्रचंड संख्या आढळून येते.
ब्राझीलमधील कीटकांच्या वारुळांची संख्या किती असेल याचा अंदाज लावण्यासाठी तुम्हाला ग्रेट ब्रिटनचा नकाशा डोळ्यासमोर आणावा लागेल. ग्रेट ब्रिटनच्या क्षेत्रफळाइतक्याच प्रचंड क्षेत्रावर या कीटकांनी आपले साम्राज्य उभे केले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एवढ्या प्रचंड क्षेत्रावर या कीटकांनी हजारो वर्षांपासून वारुळे उभी केली आहेत. आजतागायत अशी सुमारे २० करोड वारुळे या क्षेत्रात सापडली आहेत. ही वारुळे मागच्या ४ हजार वर्षांत तयार झाली असून या कीटकांनी आजपर्यंत ५ करोड टन मातीचे उत्खनन केल्याचे संशोधनाअंती समोर आले.
मागील ४ हजार वर्षांत आतापर्यंत कीटकांनी जेवढ्या मातीचे उत्खनन केले तेवढ्या मातीपासून गिझाचे ४ हजार पिरॅमिड्स तयार होऊ शकतात. यावरून आपल्याला या लहानशा कीटकांनी वर्षानुवर्षे केलेली कामगिरी किती प्रचंड आहे याचा अंदाज येऊ शकतो. ही वारुळं सिंटर्मेस डायरस नावाच्या वाळवीच्या प्रजातीने बांधले आहेत, हे कीटक फक्त अर्धा इंच लांबीचे असतात. इथे सापडणारी वाळवींची वारुळं ही जगातील अन्य ठिकाणी सापडणाऱ्या वारुळांपेक्षा कैक पटीने वेगळी आहेत.
शास्त्रज्ञांनी अशा ११ वारुळांवर रेडिओऍक्टिव डेटिंगचा प्रयोग केला.सर्वांत अलीकडील वारूळ सुमारे ६९० वर्षे जुनं आहे तर सर्वांत प्राचीन वारूळ हे सुमारे ३२८० वर्षं जुनं असल्याचं आढळून आलंय. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे कीटक या व्हाईट फॉरेस्टमध्ये डायनोसोर्सच्याही आधीपासून म्हणजे सुमारे २५ कोटी वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ही वारुळं ईशान्य ब्राझीलच्या कॅटिंगाच्या झाडाझुडपांमध्ये आढळतात. कुरणासाठी जमीन साफ केल्यावर ते दिसू शकतात.
प्रचंड उष्णतेमुळे दिवसाच्या वेळी इथे कोणताही वन्यजीव, अगदी किडे देखील बाहेर पडत नाहीत. रात्रीच्या वेळेत ते बाहेर पडून अशा प्रकारची बांधकामं करतात. या वारुळांची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण असते. वारुळांमध्ये अनेक खोल्या असतात, त्यातील प्रमुख खोली ही वाळवींच्या राणीसाठी असते. त्याठिकाणी राणी एका मिनिटाला सुमारे २५ अंडी देत असते, ही प्रक्रिया सुमारे ५० वर्षं चालते. एवढ्या काळामध्ये २.५ कोटी किडे तयार होतात. याठिकाणी असलेली काही जुनी वारुळं संपूर्णतः रिकामी आहेत.
पण वाळवींच्या वारुळांच्या या संख्येवरून ईशान्य ब्राझीलच्या या भागात त्या कीटकांचे एक मोठे शहरच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.