आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रेडिट सुईस हे नाव कदाचित तुम्ही ऐकलेही नसेल. कारण या नावाची संस्था तिकडे दूर, युरोप खंडात आहे. पण गेला आठवडाभर या बँकेने चांगलीच हवा तापवली आहे. याचे कारण जगभरात परत एकदा मंदीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच्या मुळाशी आहे ही बँक.
या बँकेची प्रकृती तशी गेल्या तीन वर्षांपासून तोळामासाच आहे.
मध्यंतरी या बँकेतून मोठ्या प्रमाणावर डेटा लीक झाल्यामुळे हे आर्थिक संकट उभे राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवार ३ ऑक्टोबर रोजी या बँकेच्या शेअर्सच्या किमतीमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली. हे या बिघडलेल्या प्रकृतीचेच निदर्शक.
मात्र यामागे अनेक कारणे आहेत. बँकेच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये झालेले बदल, जोखीम व्यवस्थापनात झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या चुका आणि एका मागून एक अशा तोट्यांची मालिका यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे याचा भारतावर काय आणि किती परिणाम होऊ शकेल? त्याआधी थोडेसे इतिहासात डोकावून पाहणे गरजेचे आहे.
ही बँक १८५६ मध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी तिचे मूळ नाव होते क्रेडिट सुईस ग्रुप ए जी. मुळात तिची निर्मिती झाली होती ती स्वित्झर्लंडमधील रेल्वेला अर्थपुरवठा करण्यासाठी. गेल्या काही दशकांमध्ये तिने केवळ स्वित्झर्लंडच नाही तर संपूर्ण युरोपमधील रेल्वे नेटवर्क आणि इलेक्ट्रिक ग्रीड यांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान दिले.
संपूर्ण युरोपभर ही बँक प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने पर्सनल बँकिंग आणि रिटेल बँकिंग या क्षेत्रांमध्येही हातपाय पसरले. २०२१ च्या अखेरपर्यंत या बँकेचा पसारा ५० हजार कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारला होता आणि बँकेच्या नावे १.६ ट्रिलियन स्विस फ्रँक एवढी मत्ता जमा होती.
मार्च २०२१ मध्ये झालेल्या एका मोठ्या घोटाळ्यामुळे या बँकेला चांगलाच फटका बसला. या घोटाळ्याचे नाव होते आर्चीगोज कॅपिटल स्कँडल. आर्चीगोज कॅपिटल नावाच्या अमेरिकन हेज फंड कंपनीने अनेक नामांकित बँकांची फसवणूक केली होती ज्यामध्ये क्रेडिट सुईस हेदेखील एक प्रमुख नाव होते. यात बँकेला ४.७ बिलियन डॉलर्सचा फटका बसला.
बँकेचा डेटा मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. चोरीला गेलेल्या डेटामुळे वेगळीच माहिती समोर आली. ज्या खात्यांमध्ये कोट्यवधी डॉलर्स होते, त्याच खात्यांची गोपनीय माहिती उघड झाली. त्यामधून बँकेने गुन्हेगार, गुप्तचर अधिकारी, राजकारणी, उद्योगपती अशा लोकांचा काळा पैसा आपल्याकडे ठेवला आणि तो पांढरा करण्यासाठी संबंधित लोकांना मदत केली असे समोर आले.
हा काळा पैसा अर्थातच अनैतिक मार्गाने जमा झालेला होता. ड्रग्जची तस्करी, मनी लॉन्ड्रींग, भ्रष्टाचार आणि इतर अवैध धंदे अशा मार्गांनी जमा झालेला काळा पैसा मोठ्या प्रमाणावर या बँकेमध्ये पाठवण्यात आला होता. अशा तब्बल १८००० खात्यांची गोपनीय माहिती उघड झाली.
हे उघड झाल्यानंतर बँकेची पत धोक्यात आली आहे आणि त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. या घोटाळ्यामुळे स्वित्झर्लंडमधील इतर केंद्रीय बँकांनी आपले व्याजाचे दर वाढवले. त्यामुळे साहजिकच महागाई वाढली आहे आणि देशाच्या जीडीपीमध्ये घट झाली आहे.
आणि यातूनच मंदीचे संकट उभे राहिलेले आहे. क्रेडिट सुईस ही काही लहान बँक नाही. आपल्याकडे समजा अशी परिस्थिती एसबीआयसारख्या बँकेवर आली तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट उभे राहील. याचे कारण देशातील बहुतांश जनतेचा पैसा या बँकेत गुंतलेला आहे. त्याचप्रमाणे सरकारचीही होल्डिंग्ज या बँकेत असल्याने सरकारचे देखील यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. जागतिक पटलावर हीच परिस्थिती क्रेडिट सुईसारख्या बँकांच्या दिवाळखोरीमुळे उद्भवू शकते.
त्यातल्या त्यात एक जमेची बाजू. भारतात मुळातच लोकांचा काटकसरीकडे कल आहे. वस्तू जपून वापरण्याला आपल्याकडे महत्त्व दिले जाते. शिवाय भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे या मंदीची आपल्याला तुलनेने आर्थिक झळ कमी बसेल. पण तरी तूर्तास अमेरिका, युरोप, चीन यासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना हादरे बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.