आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अवकाशातल्या चंद्रावर जाऊन घर बांधणं ही आजच्याघडीलाही कवी कल्पना असली तरिही आता दुबईत अवतरणार्या महाकाय मून रिसॉर्टनं हे स्वप्न अंशत: का होईना वास्तवात आणण्याची सोय केलेली आहे. एक महाकाय चंद्र लवकरच दुबईत अवतरणार आहे.
दुबई, एक असं शहर जिथे काही दशकांपूर्वीपर्यंत मैलोनमैल पसरलेल्या वाळवंटाशिवाय काहीच नव्हतं. लोक सधन असले तरिही निसर्गाची अवकृपा असल्यानं हे शहर रखरखीत होतं. दुबईचं स्वत:चं असं काहीही नाही. रखरखीत वाळवंट सोडून काहीही नसतानाही आज हे शहर जागतिक नकाशावर पर्यटकांची गर्दी खेचणारं शहर म्हणून परिचित आहे. जगातील सर्वात प्रसिद्द्ध शहरात दुबईची गणना केली जाते.
दुबईची आणखीन एक खास ओळख म्हणजे इथली आधुनिक बांधकामं, इमारती. आधुनिक स्थापत्यशास्त्राची ओळख मिरवणारं हे शहर अचंबीत करणार्या वास्तूंमुळे ओळखलं जातं.
बुर्ज खलिफा (Burj Khalifa) ही जगातली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. जगभरातल्या पर्यटकांना वेड लावणारा दुबई मॉल असो की ॲटलांटिस पाम जुमैरा, ही सर्व बांधकामं अचंबीत करणारी आहेत.
याच यादीत आता एक नाव नव्यानं सामिल होणार असून याचं नाव आहे पंचतारांकीत मून हॉटेल. केवळ नावात चंद्र नसून ते दिसायलाही अगदी हुबेहूब चंद्रासारखं असणार आहे.
गेली अनेक दशकं पृथ्वीवरील लोकांना चंद्रावर मानवस्ती आहे का? याचं आकर्षण राहिलं आहे. चंद्रावर मानवानं पाऊल ठेवल्याक्षणापासून हे आकर्षण अधिकच वाढीस लागले आहे. समजा तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही आता चंद्रावर तुमच्या मालकीचा एक अलिशान व्हिलाही असू शकतो तर तुम्ही अर्थातच ही फ़ॅण्टसी म्हणून हसून सोडून द्याल, मात्र दुबईत हे शक्य होणार आहे.
अर्थात त्यासाठी काही लाख नव्हे तर करोडो रूपये मोजावे लागणार आहेत. ऐकून आश्चर्य वाटले असेल नां? पण हे वास्तव अवघ्या चार वर्षात अवतरणार आहे दुबईतल्या वाळवंटात. अवकाशातल्या चंद्रावर जाऊन घर बांधणं ही आजच्याघडीलाही कवी कल्पना असली तरिही आता दुबईत अवतरणार्या महाकाय मून रिसॉर्टनं हे स्वप्न अंशत: का होईना वास्तवात आणण्याची सोय केलेली आहे. एक महाकाय चंद्र लवकरच दुबईत अवतरणार आहे.
मून रिसॉर्ट नावाचा एक अचंबित करणारा प्रकल्प सध्या दुबईत आकार घेत आहे. रिसॉर्टचं डिझाईन कॅनडास्थित कंपनी मून वर्ल्ड रिसॉर्ट करत आहे. या रिसॉर्टमधे चार हजार खोल्या असणार असून याद्वारे दहा हजार पर्यटकांची सोय एकाच वेळेस करता येणं शक्य होणार आहे.
याठिकाणी साकारल्या जाणार्या “लुनार कॉलनी” द्वारे पर्यटकांना मूनवॉकचा अनुभव घेता येणं शक्य होणार आहे. रात्रीच्या अंधारात आकाशातल्या चंद्राप्रमाणेच हुबेहुब हा चंद्रही प्रकाशमान होणार आहे. म्हणजेच अवघ्या चार वर्षात दुबईत रोज दोन चंद्र उगवतील.
सध्या हा प्रकल्प नेमक्या कोणत्या भूभागावर आकाराला येईल याबाबतची रेकी चालू आहे. गेली काही वर्षं दुबईतील रिअल स्टेट व्यवसायात मंदी आलेली आहोती. दोन महत्वाकांक्शी प्रकल्पांना अर्धवट गुंडाळावे लागले होते. मात्र तब्बल पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा या व्यवसायात तेजी येतानाचं चित्र दिसत आहे. याचा फायदा या नव्या प्रकल्पाला नक्कीच होईल असा अंदाज आहे.
मून रिसॉर्ट पाच विभागात हे हॉटेल विभागलेलं असून पहिल्या विभागाला लोअर डिस्क म्हणून ओळखला जाणार आहे. या गोलाकृती डिस्कवर संपूर्ण हॉटेलच्या इमारतीचा डोलारा सांभाळला जाणार आहे. दुसरा विभाग असणार आहे, मिडल डिस्क. याठिकाणी खाण्यापिण्याचे फ़ूड स्टॉल्स, रेस्टॉरंटस, मॉल, लाऊंज यांचा समावेश असणार आहे.
यानंतरचा विभाग आहे, अप्पर डिस्क. याठिकाणी नाईट क्ल्ब्ज, ग्लोबल मिटिंग स्पेसेस, शटल स्टेशन्स, बिझनेस सेंटर्स, हॉटेल लॉबीज असणार आहेत. यानंतरचा विभाग आहे, अप्पर डिस्क टेरेस. याठिकाणी बीच क्ल्ब्ज, जीम, पार्क, स्टेडियम आदींचा समावेश असणार आहे.
अप्पर डिस्क टेरेसच्यावर काही हॉटेल सूटस असणार आहेत आणि त्यांच्या येण्याजाण्याच्या सोयीसाठी शटल स्टेशन्सची निर्मिती केली जाणार आहे. या शटल सेवेमुळे पर्यटक आतील स्ट्रक्चरची सैर करू शकणार आहेत. हे सर्व इथेच थांबत नाही, खरे आश्चर्य तर यापुढे आहे.
याच्या छतावर एका कॉलनीची निर्मिती करण्यात येणार असून याठिकाणी तिनशे लक्झरी व्हिला बांधले जाणार आहेत. या सर्व प्रोजेक्टला बाहेरून एका आवरणानं आच्छादलं जाणार असून त्याला एका चंद्राचा आकार आणि रंगरूप दिलं जाणार आहे. यात विशिष्ट प्रकारचं लायटिंग केलं जाणार असून यामुळे जमिनीवर चंद्र उतरल्याचा भास होणार आहे.
या महाकाय चंद्राची उंची सातशेपस्तीस मिटर आणि परिघ सहाशेपन्नास फ़ूट असणार आहे. हा प्रोजेक्ट चार वर्षांत पूर्ण करण्याचा कंपनीचा निर्धार असून यासाठी साधारणपणे चार अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयात सांगायचं तर साधारण चाळीस हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
प्राथमिक अंदाजानुसार प्रतिवर्षी एक कोटीहून अधिक पर्यटक याठिकाणाला भेट देतील आणि त्यातून दहा अब्ज कमाई होईल असा अंदाज आहे.
मून वर्ल्ड रिसॉर्टचे को फाउंडर मायकेल आर हेण्डरसन यांच्यामते हे रिसॉर्ट केवळ दुबईचीच नव्हे तर जगभरातली अर्थव्यवस्था हलवून टाकणारं ठरेल. शैक्षणीक, हॉस्पिटॅलिटी, स्पेस अशा अनेक क्षेत्रातील पर्यटणाला केंद्रीत ठेवून याची रचना केली जाणार आहे. जगातील एक पर्यटन आकर्षण नव्हे तर आश्चर्य बनविण्याचा मायकेल यांचा निर्धार आहे. याठिकाणी येण्यासाठी पर्यटकांना स्पेस शटलची सुविधा देण्यात असून जगभरातला हा पहिलाच प्रयोग असणार आहे. या कारणास्तव हा प्रकल्प आतापासूनच चर्चेचा विषय बनला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.