आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२३ ऑगस्ट २०२३, भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक महत्वाचा माईलस्टोन. १४ जुलै २०२३ रोजी लाँच केलेल्या चंद्रयान-३च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं. या ऐतिहासिक घटनेनंतर केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी आदित्य L1 चा आवर्जून उल्लेख करून त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. चंद्राच्या अभ्यासाबरोबरच भारताने आता आपला मोर्चा सूर्याकडे वळवला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरोने आपल्या स्थापनेपासून वैज्ञानिक विकासासाठी, कृषी तसेच हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त असे अनेक उपग्रह (सॅटेलाईट्स) अंतराळात सोडले, त्याशिवाय इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीसुद्धा इसरोने अनेक प्रयत्न केले आहेत. चंद्रयान-१, चंद्रयान-२, चंद्रयान-३ आणि मार्स ऑर्बिटर मिशन हे त्या अथक प्रयत्नांचे साक्षीदार. सूर्यमालेतील या महत्वाच्या ग्रहांच्या संशोधनाबरोबरच इसरोने सूर्यमालेचा केंद्रबिंदू असलेल्या सूर्याचे अधिक संशोधन करण्याचे ठरवले आहे. सूर्याचा इतर ग्रहांवर तसेच पृथ्वीवर पडणारा प्रभाव लक्षात घेता त्याचा अभ्यास करून संशोधनात्मक विश्लेषणे करणे हा या मोहिमेचा प्रमुख हेतू असला तरीही जागितक पातळीवर देखील ही मोहीम भारताला एक विशेष स्थान निर्माण करून देणार आहे.
जिओपॉलिटिकली हे मिशन भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारताने आधीच अंतराळ शक्ती (स्पेस पॉवर) म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आदित्य L1 मोहिमेमुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. चंद्रयान-३द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जरी चौथा देश असला तरीही आदित्य L1 द्वारे अशा प्रकारचे सोलर प्रोब मिशन लाँच करणारा भारत हा पहिला आशियाई देश आहे. जगातील स्पेस पॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि रशिया किंवा त्याआधीच्या युएसएसआरनेसुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न केला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या संयुक्त विद्यमाने अशाच प्रकारचे SOHO (SOlar and Heliospheric Observatory) मिशन डिसेंबर १९९५ मध्ये लाँच केलं गेलं होतं. या सर्व कारणांमुळे आदित्य L1 मिशनद्वारे अंतराळामध्ये भारत फक्त दक्षिण आशियाचेच नाही तर ‘BRICS’ देशांचे देखील प्रतिनिधित्व करणार आहे. ज्याक्षणी आदित्य L1 चा सोलर प्रोब काम करण्यास सुरूवात करेल तेव्हा भारत पुन्हा इतिहास रचणार आहे!
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जपानच्या ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’नेही (JAXA) अशा प्रकारच्या दोन मोहिमा राबवल्या होत्या. त्यातील एक आहे १९८६ सालची HINOTORI (ASTRO-A) आणि दुसरी आहे २००६ सालची HINODE. या दोन्ही मोहिमांमध्ये जपानने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सॅटेलाईट्स सोडल्या होत्या, ज्या सॅटेलाईट्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ६५० किलोमीटर अंतरावरून पृथ्वीचे परिभ्रमण करतानाच सूर्याचा अभ्यास करणार होत्या. परंतु भारताचं आदित्य L1 सोलर प्रोब पृथ्वीपासून सुमारे १५ लाख १० हजार किलोमीटरवर असलेल्या L1 पॉइंटवर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे.
आदित्य L1 मधील ‘L1’ म्हणजे नक्की काय?
या मिशनचे नामकरण करताना इसरोने ‘आदित्य L1’ असे केले आहे. आदित्य म्हणजे सूर्य हे तर आपल्याला माहितीच आहे. L1 म्हणजे L1 पॉईंट! अंतराळात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या या संकल्पनात्मक पॉइंट्सचा शोध इटालियन-फ्रेंच गणितज्ज्ञ ‘जोसेफ लॅग्रेन्ज’ने लावला. याच गणितज्ज्ञाच्या सन्मानार्थ या पॉइंट्सना ‘लॅग्रेन्ज पॉईंट्स’ असे नाव देण्यात आले. त्या नावाचे संक्षिप्त रूप म्हणजेच L पॉईंट्स!
लॅग्रेन्ज पॉईंट्स
‘प्रत्येक क्रियेला सामान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असतेच’ हा न्यूटनचा तिसरा गुरुत्वाकर्षणाचा नियम विश्वातील सर्व गोष्टींना लागू होतो. मग सूर्य आणि पृथ्वी हे अपवाद कसे ठरू शकतील?! सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांवर प्रभाव पाडत असते. त्यामुळे पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलांमधील या चढाओढीमध्ये किंवा रस्सीखेचेमध्ये, एकमेकांचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस कॅन्सल होऊन काही ग्रॅव्हिटेशनल पॉईंट्स तयार होतात. या ग्रॅव्हिटेशनल पॉइंट्सवर कोणतीही वस्तू स्पेसमधील अन्य कोणत्याही जागेच्या तुलनेत जास्त स्थिर राहू शकते. याठिकाणी परिभ्रमण करण्यासाठी सोडलेल्या उपग्रहांचे किंवा अशा प्रकारच्या सोलर प्रोब्सचे काम कमी इंधनातही होऊ शकते.
पृथ्वीच्या अवतीभोवती असे ५ लॅग्रेन्ज पॉईंट्स आहेत आणि त्यांना L1, L2, .. अशी अनुक्रमे नावे देण्यात आली आहेत. यातील L2 पॉइंटवर NASAचा सर्वशक्तिशाली ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ आहे, तर L1 पॉइंटवर NASA आणि ESA च्या संयुक्त विद्यमाने सोडलं गेलेलं SOHO सोलर प्रोब आहे. हा L1 पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख १० हजार किलोमीटरवर असून आदित्य L1 ला तेथे पोहोचण्यासाठी सुमारे १२५ दिवसांचा अर्थात ४ महिन्यांचा कालावधी लागणार असून या मिशनचे गंतव्य (Destination) चंद्रयान-३ पेक्षा ४ पट लांब आहे. L1 पॉईंट जास्त स्थिर नसून आदित्य L1 याठिकाणीही परिभ्रमण करूनच सूर्याबद्दल संशोधनात्मक माहिती गोळा करणार आहे.
‘आदित्य L1’ची उद्दिष्टे:
मिशनच्या नामकरणामागील कारण मीमांसा आणि मिशनचं महत्व लक्षात घेतल्यानंतर लाँचसहित ४०० करोड रुपये खर्च असलेल्या या संशोधनाचा नक्की वैज्ञानिक फायदा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे चंद्रयान-३ मध्ये असलेले प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे १५ दिवस ॲक्टिव्ह राहणार आहे त्याचप्रमाणे आदित्य L1 चा सोलर प्रोब L1 पॉईंटवर सुमारे ५ वर्षे परिभ्रमण करणार आहे. या कालावधीत हा प्रोब सूर्याच्या कोरोनाचा, सोलर स्टॉर्म्सचा अभ्यास आणि सूर्याचा विविध ग्रहांवर आणखी कोणकोणत्या पद्धतीने प्रभाव पडतो इत्यादी विषयांचा अभ्यास करणार आहे.
खाली दिलेल्या चित्रात दर्शवल्याप्रमाणे सूर्याचा कोरोना म्हणजे सूर्याभोवती असलेला एक घेराव!
आपण जितके आगीच्या जवळ जाऊ तितके तपमान वाढत जाते आणि आपण जितके लांब जाऊ तितके ते कमी होत जाते हे सामान्य विज्ञान आपल्याला माहितीच आहे. अशाच प्रकारे सूर्याच्या गाभ्याचे तपमान ‘दीड कोटी डिग्री सेल्सियस’ असून सूर्याच्या पृष्ठभागावरील तपमान ५५०० डिग्री सेल्सियस आहे, पण सूर्याच्या पृष्ठभागापासून काही अंतर दूर असलेल्या या सूर्याच्या कोरोनाचे तपमान सुमारे ‘१० ते ३० लाख डिग्री सेल्सियस’ इतके आहे, हेच कोडं सोडवण्याच्या दृष्टीने आदित्य L1 महत्वाची भूमिका बजावेल.
सोलर स्टॉर्म्स किंवा सौर वादळे ही सूर्यामधून होणारे रेडिएशन्स आणि उष्णेतेचे तीव्र स्फोट आहेत. ही वादळे दोन प्रकारची असतात, एक प्रकार आहे सूर्याच्या चुंबकीय शक्तीतून निर्माण होणारी वादळे आणि दुसरी म्हणजे सूर्याच्या कोरोनातून निर्माण होणारे सौर वारे, चुंबकीय शक्तीतून निर्माण होणारी ऊर्जा, आणि सोलर प्लाज्मा यांचे स्फोट! सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय शक्ती अचानक रिलीज झाल्यानंतर जो स्फोट होतो तो पहिल्या प्रकारात बसतो. सौर वादळे रेडिओ कम्युनिकेशन्स, नेव्हिगेशन सिस्टिम्स आणि पृथ्वीवरील पॉवर ग्रिड्सवर देखील विपरीत परिणाम करू शकतात.
इसरोच्या आदित्य L1 प्रमाणेच नासाने २०१८ साली ‘नासा पार्कर सोलर प्रोब’ अंतराळात सोडले आहे. हा सोलर प्रोब विशेषतः सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अर्थात कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. ‘नासा पार्कर सोलर प्रोब’ सूर्याच्या अत्यंत जवळ गेलेली पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली असून अवकाशातील हवामान, त्याचा पृथ्वीवरील प्रभाव अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर होत आहे. या सोलर प्रोबचे बजेट १५० कोटी डॉलर्स इतके प्रचंड होते.
समारोप
इसरोतील शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमधून आज (२ सप्टेंबर २०२३ रोजी) हे मिशन पीएसएलव्ही-सी५७ या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने यशस्वीरीत्या लाँच झालं आहे. त्याबरोबरच भारताला जागतिक अंतराळ क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त करून देण्याऱ्या या प्रकल्पास आमच्या टीमकडून शुभेच्छा. भारताची प्रगती पाहून मिरची लागणाऱ्या आणि खाली दिले आहे अशी व्यंगचित्रे तयार करणाऱ्या ‘अति’पंडितांना इसरो आणि भारताचे हे उत्तुंग यश खणखणीत उत्तर आहे!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.