आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगात एकही देश असा नाही की जिथे आर्थिक गैरव्यवहार आणि फसवाफसवी झाली नसेल. आजवर भारतात बरेच घोटाळे झाले, चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा इत्यादी. हल्ली सगळीकडे बिटकॉइनची चर्चा सुरू आहे. गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये सध्या बिटकॉईनचा समावेश होतो.
आजपर्यंत आर्थिक गैरव्यवहार म्हटलं की बँकेचे गैरव्यवहार, सरकारी योजनेत भ्रष्टाचार, शेअर बाजारात गैरव्यवहार अशी उदाहरणे समोर येतात. पण आज आपण बिटकॉईनचा उपयोग करून आर्थिक गैरव्यवहार कसे केले जातात हे समजून घेणार होतो. बिटकॉईनचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार कुणी केले?, कसे केले?, या गैरव्यवहाराचे विविध पैलू कोणते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण समजून घेणार आहोत.
बिटकॉइनचा शोध हा २००८ साली सातोषी नाकामोतोने लावला आणि २००९ पासून बिटकॉईनचा वापर आर्थिक व्यवहारासाठी सुरू झाला. २०२२ च्या अर्थसंकल्पात भारत सरकारने बिटकॉईनच्या व्यवहारातून मिळणाऱ्या नफ्यावर 30% कर लावला. कर लावला म्हणजे बिटकॉईनला भारत सरकारने आणि भारताच्या मध्यवर्ती बँकेने त्याला मान्यता दिली असा अर्थ होत नाही.
बिटकॉईनच्या व्यवहारात पारदर्शकता यावी या करता हा कर लावण्यात आला. पण हा कर लावायचा आधी बिटकॉईनच्या व्यवहारात कोणतीही पारदर्शकता नव्हती व या पळवाटेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत.
आज बिटकॉईनचा वापर करून सतीश कुंभाणी या माणसाने आर्थिक गैरव्यवहार कसे केले व कशी लोकांची फसवणूक केली हे आज जाणून घेणार आहोत.
आता बिटकॉइनचा वापर करून लोकांची फसवणूक करणारा सतीश कुंभाणी हा भारतातील पहिला माणूस आहे का? तर याचं उत्तर आहे नाही, या आधीही बिटकॉइनचा वापर करून लोकांची फसवणूक झाली आहे.
काही उदाहरणे पुढीलप्रमाणे, २०१६ साली बिटकॉईनचा वापर हा ऑनलाईन बेटिंग रॅकेटसाठी करण्यात आला नंतर हा गैरव्यवहार करणारे तुरुंगात गेले. त्यानंतर बंगलोरमध्ये “लॉंग रिच ग्लोबल”, “लॉंग रिच टेक्नॉलॉजीज” या तिन्ही कंपन्यांनी, “मॉरिस कॉइन” या बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला जास्त परतावा देतो असे सांगून तब्बल ११ लाख लोकांची फसवणूक केली होती. या घोटाळ्याला “मॉरिस कॉइन स्कॅम” असे म्हणतात.
दिल्लीत प्लुटो एक्सचेंज नावाचा बिटकॉईन घोटाळा दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला. २०१७ साली अमित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने अमेझ मायनिंग अँड ब्लॉकचेन रिसर्च लिमिटेड ही कंपनी स्थापन केली व मल्टिलेवल मार्केटिंगचा वापर करून लोकांना बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले व केलेल्या गुंतवणूकीवर तुम्हाला वर्षाच्या आत ११% नफा मिळवून देऊ असे सांगून कित्येक लोकांना त्याने फसवले. पण या सगळ्या घोटाळ्यांचा विक्रम मोडला तो सतीश कुंभाणीने.
आता हा सतीश कुंभाणी नक्की आहे तरी कोण? सतीश कुंभाणी हा गुजरातमधील सुरतचा रहिवासी. सतीश कुंभाणीने त्याचे पदव्युत्तर शिक्षण हे ग्रीनवीच विद्यापीठातून घेतले आहे. १५ फेब्रुवारी २०१६ रोजी सतीश कुंभाणी याने “बिट-कनेक्ट” या कंपनीची स्थापना केली. बिट-कनेक्ट ही एक क्रिप्टोकरन्सी वेबसाईट, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, व कर्ज देणारी सेवा होती.
बिट-कनेक्ट हे क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण करण्याचे व त्या व्यवहारातून नफा कमवण्याचे व्यासपीठ होते. बिट-कनेक्ट कंपनीने त्यांची स्वतःची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी तयार केली होती ज्याचे नाव होते “बिट-कनेक्ट कॉइन” ज्याला आपण सोप्या शब्दात “बीसीसी” असे म्हणू.
सतीश कुंभाणीने एक योजना तयार केली, या योजने अंतर्गत सतीश कुंभाणीने गुंतवणूकदारांना तुम्ही आमच्या योजनेत तुमच्या बिटकॉईनची गुंतवणूक करा व त्याचा परतावा म्हणून आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात “बीसीसी” ही क्रिप्टोकरन्सी देऊ. बिट-कनेक्टच्या या योजने अंतर्गत तुम्हाला मिळालेली “बीसीसी” ही क्रिप्टोकरन्सी तुम्ही इतरांना कर्ज म्हणून पण देऊ शकता व त्यावरचे व्याज तुम्ही नफा म्हणून स्वतःकडे ठेऊ शकता असे सांगितले.
या योजनेअंतर्गत बिट-कनेक्ट कंपनीने २.८० करोड इतकी बीसीसी क्रिप्टोकरन्सी जारी केली. या २.८० करोड बीसीसी क्रिप्टोकरन्सीमधील 1.80 करोड बीसीसी क्रिप्टोकरन्सी ही बिट-कनेक्ट कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना विकली. आपल्याला अल्पावधीतच भरपूर नफा मिळेल या अपेक्षेने भरपूर लोकांनी बिट-कनेक्टच्या या योजनेत गुंतवणूक केली.
या योजनेत गुंतवणूक वाढावी या करता बिट-कनेक्टच्या प्रमोटर्सने जगभरात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. बिट-कनेक्टच्या या सर्व प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि अखेर डिसेंबर २०१७ मध्ये बीसीसी ही सर्वात जास्त मागणी असलेली क्रिप्टोकरन्सी ठरली.
२०१७ च्या ऑक्टोबर पर्यंत बिट-कनेक्ट कंपनीचे सगळे व्यवहार अगदी सुरळीतपणे चालू होते. पण ७ नोव्हेंबर २०१७ रोजी बिट-कनेक्ट कंपनीला त्यांचा पहिला कायदेशीर फटका बसला, युनायटेड किंगडमच्या सरकारने बिट-कनेक्टला त्यांची वैधता सिद्ध करण्यासाठी त्यांच्या नावे एक नोटीस जारी केली. पण सुदैवाने बिट-कनेक्टने काहीतरी कायदेशीर पळवाट शोधून वेळ मारून नेली व ते प्रकरण शांत झालं.
३ जानेवारी २०१८ रोजी टेक्सस स्टेट सिक्युरिटीज बोर्डाने बिट-कनेक्ट कंपनीच्या नावाने “सीझ अँड डेझिस्ट ऑर्डर्स” जारी केल्या. सीझ अँड डेझिस्ट ऑर्डर्स ही एक लेखी सूचना असते ज्याचा अंतर्गत कोर्ट किंवा सरकारी यंत्रणा एखाद्या माणसाला किंवा कंपनीला ते करत असलेल्या बेकायदेशीर गोष्टी त्वरित थांबवण्याचे आदेश देते पण सीझ अँड डेझिस्ट ऑर्डर्स या कायदेशीर बंधनकारक नाहीत.
टेक्सास स्टेट सिक्युरिटीज बोर्ड नंतर नॉर्थ कॅरोलिना सेक्रेटरी ऑफ स्टेट सिक्युरिटीज डिव्हिजन यांनी देखील बिट-कनेक्ट कंपनीच्या नावाने “सीझ अँड डेझिस्ट ऑर्डर्स” जारी केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून १६ जानेवारी २०१८ रोजी बिट-कनेक्ट कंपनीने क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि कर्ज देण्याची सेवा बंद करण्याचे जाहीर केले.
१७ जानेवारी २०१८ रोजी बिट-कनेक्ट कंपनीने आपल्या सर्व सेवा बंद केल्या व या सर्व गोष्टीला टेक्सास स्टेट सिक्युरिटीज बोर्ड व नॉर्थ कॅरोलिना सेक्रेटरी ऑफ स्टेट सिक्युरिटीज डिव्हिजन यांच्या सीझ अँड डेझिस्ट ऑर्डर्स कारणीभूत आहेत असा आरोप सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून ३१ जानेवारी २०१८ रोजी अमेरीकन सरकारने बिट-कनेक्टच्या सर्व मालमत्ता गोठवल्या.
१८ जानेवारी २०१८ रोजी बिट-कनेक्टचे संस्थापक सतीश कुंभाणी आणि कंपनीचे इतर प्रमोटर्स यांनी बिट-कनेक्टचे वेबसाईट आणि इतर सर्व व्यवहार बंद केले व हे सर्व लोक भूमिगत झाले. वेबसाईट आणि बिट-कनेक्टचा एक्सचेंज बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आणि अशा प्रकारे एका नवीन घोटाळ्याची सुरूवात झाली.
बिट-कनेक्टमुळे झालेल्या घोटाळ्याचे धागेदोरे भारतात आणि अमेरिकेत सापडले. आता हा घोटाळा कसा सुरू झाला हे समजून घेऊ. या घोटाळ्याचे दोन भाग आहेत एक भाग जो भारताशी निगडित आहे आणि दुसरा जो अमेरिकेशी निगडित आहे. आधी आपण बिट-कनेक्टने भारतात कसा घोटाळा केला हे समजून घेऊ.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा व करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली. आता आपला काळा पैसा हा सरकारच्या हाती लागू नये या करता काही लोकांनी हा पैसा वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवला. लोक त्यांच्याकडचा काळा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवत आहेत ही गोष्ट जेव्हा सरकारला समजली त्यावेळी देशाच्या मध्यवर्ती बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर बंदी घातली.
२०१६च्या अखेरीस आणि २०१७च्या सुरुवातीला गुजरातमधला एक प्रॉपर्टी डीलर शैलेश भट यानेही त्याच्याकडे असलेला काळा पैसा हा बिट-कनेक्टमध्ये गुंतवला होता. पण २०१८ रोजी जेव्हा बिट-कनेक्टने त्यांचे सर्व व्यवहार बंद केले आणि यामुळे शैलेश भट याचे पैसे अडकले.
आपले पैसे परत मिळवण्यासाठी शैलेश भट आणि त्याच्या नऊ साथीदारांनी मिळून सुरतमधल्या बिट-कनेक्टच्या ऑफिसमधील धवल मवानी आणि पियुष सावलीया या दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले व त्यांच्याकडे २२५६ बिटकॉईनची खंडणी मागितली. अखेर शैलेश भट व त्याच्या नऊ साथीदारांनी बळजबरीने २४०० बिटकॉईन हे शैलेश भटच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा करायला लावले.
शैलेश भट सोबत जे नऊ साथीदार होते त्यातला एक माणूस होता ज्याचे नाव किरीट पालदिया. २४०० बिटकॉईन पाहून किरीट पालदियाला हाव सुटली आणि त्याने एक योजना आखली. किरीट पालदिया याचे काका नवीन कोटाडिया हे गुजरातमध्ये भाजपाचे आमदार होते. किरीट पालदिया आणि नवीन कोटाडिया यांनी स्थानिक पोलिसांना हाताशी धरून शैलेश भटकडे २०० बिटकॉईन एवढी खंडणी मागण्यास सुरुवात केली, त्यावेळी २०० बिटकॉईनची किंमत ही २० लाख रुपये इतकी होती.
किरीट पालदिया आणि नवीन कोटाडिया यांना असं वाटलं की शैलेश भट आपल्या दबावाला बळी पडेल पण तसे काही झाले नाही, आपल्या जीवाला धोका आहे म्हणून शैलेश भट थेट गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांना जाऊन भेटला व घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. हा सर्व प्रकार २०१७ रोजी घडला.
नुकतीच झालेली, नोव्हेंबर २०१६ मधली, नोटबंदी आणि २०१७च्या अखेरीस असलेल्या विधानसभा निवडणुका या सर्व गोष्टींचा विचार करून व आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी हे प्रकरण गुजरात सी.आय.डी कडे सोपवले. तपास सुरू होताच गुजरात सी.आय.डीने ज्या स्थानिक पोलिसांचा सहभाग शैलेश भट खंडणी प्रकरणात होता त्यांना अटक केली.
जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा गुजरात सी.आय.डीला बिट-कनेक्टने केलेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल माहिती मिळाली. तपासा दरम्यान शैलेश भट व त्याचा नऊ साथीदारांनी २४०० बिटकॉईनची खंडणी वसूल केली होती ही माहिती गुजरात सी.आय.डीला मिळाली.
त्याचवेळी दिव्येश दारजी या माणसाबद्दल गुजरात सी.आय.डीला माहिती मिळाली. दिव्येश दारजी हा बिट-कनेक्ट कंपनीचा प्रमोटर होता. लोकांनी बिट-कनेक्ट मध्ये भरपूर गुंतवणूक करावी या करता दिव्येश दारजी हा भारत व इतर देशातील प्रमुख शहरात कार्यशाळा घ्यायचा.
१८ ऑगस्ट २०१८ रोजी इमिग्रेशन विभागाकडून गुजरात सी.आय.डीला माहिती मिळाली की दिव्येश दारजी हा सुरतला २० ऑगस्ट २०१८ रोजी येणार आहे या माहितीच्या आधारावर गुजरात सी.आय.डीने दिव्येश दारजीला अटक केली. गुजरात सी.आय.डीने बिट-कनेक्टच्या संस्थापक व प्रमोटर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे व सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
आता बिट-कनेक्टने अमेरिकेत कसा घोटाळा केला हे समजून घेऊ. बिट-कनेक्टचे संस्थापक सतीश कुंभाणी यांना यूएस फेडरल ग्रँड ज्यूरीने पोंझी स्कीम अंतर्गत अमेरीकेतील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यूएस फेडरल ग्रँड ज्यूरीने सतीश कुंभाणी यांच्यावर वायर फ्रॉड केल्याचा व फसव्या क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या सॅन दिएगोमध्ये सतीश कुंभाणी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सतीश कुंभाणीने अमेरिकेतील गुंतवणूकदारांना वोलॅटिलिटी सॉफ्टवेअरवर आधारित परताव्याची खोटी आश्वासने दिली होती. बिट-कनेक्टने नवीन गुंतवणूकदारांचा पैसा जुन्या गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी वापरला.
सप्टेंबर २०२१ रोजी, बिट-कनेक्टचे अमेरिकेतील प्रमोटर ग्लेन अर्करो यानी आपण बिट-कनेक्ट कॉइनची मागणी वाढवण्यासाठी बिट-कनेक्ट कॉइनच्या किंमतीत फेरफार केल्याची कोर्टात कबुली दिली.
बिट-कनेक्ट कंपनी ही पैसे पाठवण्याच्या व्यवसायातही कार्यरत होती, पण या व्यवसायात असून देखील बिट-कनेक्ट कंपनीने स्वतःची नोंदणी तिथल्या फायनान्शियल क्राइम्स इन्फोरसमेंट नेटवर्कमध्ये केलेली नाही त्यामुळे अमेरिकेच्या यूएस बँक सिक्रेसी ऍक्ट अंतर्गत बिट-कनेक्ट कंपनीचे सर्व व्यवहार हे बेकायदेशीर ठरतात. अमेरिकन तपास यंत्रणा एफ.बी.आयने बिट-कनेक्ट अमेरिकेतील घोटाळ्याचे मूल्यांकन २.४ अब्ज डॉलर्स एवढे केले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी अमेरिकेचे डिपार्टमेंट ऑफ जस्टीस करत आहे व त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
आज प्रत्येकाला वाटतं की आपण आर्थिकदृष्टीने सक्षम व्हावं, आपली आर्थिक प्रगती व्हावी. ही आर्थिक प्रगती साधण्यासाठी आज आपण विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करतो. मराठीत एक म्हण आहे अति घाई संकटात नेई. त्यामुळे गुंतवणूक योजना किती जरी आकर्षक वाटत असल्या, दिसत असल्या, तरीही त्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून त्या योजनेत आपल्या कष्टाचे पैसे गुंतवणे हे योग्य ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.