आईन्स्टाईनला ना स्वतःच्या घराचा पत्ता लक्षात राहायचा ना फोन नंबर

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गेल्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारल्यास कोणीही सहज उत्तर देईल. अल्बर्ट आईनस्टाईन! त्याच्या इतका बुद्ध्यांक असणारी व्यक्ती आजवर झाली नाही. बौद्धिक श्रीमंतीचे एक उदाहरण, प्रेरणास्त्रोत म्हणून आईनस्टाईनकडे पाहिले जाते.

आईनस्टाईनचा ज्या दवाखान्यात मृत्यू झाला तिथल्या पॅथेलॉजिस्टने गुपचूप त्यांचा मेंदू काढून घेतला होता. का तर या महान वैज्ञानिकाच्या मेंदूत सामान्य लोकांपेक्षा काही तरी वेगळे असणार अशी शंका अनेकांना होती. त्याच्या मेंदूवर आजही संशोधन सुरु आहे.

आईनस्टाईनने लावलेले शोध आजच्या विज्ञानासाठी फार महत्त्वपूर्ण ठरले आहेत. विज्ञानात जे स्थान न्यूटनला आहे तेच स्थान आईनस्टाईनला आहे. आईनस्टाईनने आपल्या आयुष्यातील बहुंताश वेळ हा आपला सापेक्षतावादाचा सिद्धांत, अवकाश, वेळ, पदार्थ आणि उर्जा यांच्यावरील संशोधनातच खर्च केला.

प्रकाशाचा क्वांटम सिद्धांत, सापेक्षतेचा सिद्धांत, अ‍ॅव्होगॅड्रो नंबर, बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, असे कित्येक शोध मांडणाऱ्या आईनस्टाईनने विज्ञानाच्या क्षेत्रात बहुमोल भर घातली. विश्वशास्त्र आणि विश्वरचनाशास्त्रासारख्या क्षेत्रातही त्याने विशेष योगदान दिले आहे.

परंतु केंब्रीज आणि ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांच्या मते अल्बर्ट आईन्स्टाईनला लहानपणापासूनच एक मानसिक आजार होता. ज्यामुळे त्याची बौद्धिक वाढ नीट झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याला वैज्ञानिक भाषेत डेव्हलपमेंट डिसॉर्डर म्हंटले आहे.

आईनस्टाईनचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म येथे झाला. लहानपणी आईनस्टाईनची शैक्षणिक प्रगती म्हणावी तशी समाधानकारक नव्हती. एकीकडे प्रचंड बुद्धीमत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आईनस्टाईनचे स्मृतीभ्रंशाचेही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्याची स्मरणशक्ती खूपच कमी होती, याबद्दल वैज्ञानिकांत चर्चा असे.

मोठमोठे शोध लावणारा आणि सिद्धांत मांडणारा आईनस्टाईन भूलक्कड होता यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, आईनस्टाईनच्या स्मृतीभ्रंशाचे हे मजेशीर किस्से वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अनेक मोठ्या लोकांच्या बाबतीत तर ही म्हण खरी ठरलेली आढळते. आपण पुढे जाऊन नक्कीच नाव कमावणार याचे काही न काही संकेत बालपणीच दिलेले अनेक मोठ्या लोकांच्या बाबतीत आपणही वाचले असेलच.

आईनस्टाईनच्या बाबतीत मात्र अगदीच उलटी वस्तुस्थिती होती. आईनस्टाईन चार वर्षांचा होईपर्यंत त्याला बोलता येत नव्हते. चार वर्षांचा होईपर्यंत त्याने एकही शब्द उच्चारला नव्हता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला अनेक डॉक्टरांना दाखवले पण, सर्वांनी तो एक सामान्य मुलाप्रमाणेच कधीतरी बोलू लागेल असे सांगितले. त्याच्या उशिराने बोलण्या मागचे कारण काय यावर कुणालाच काही स्पष्टीकरण देता आले नाही. आईनस्टाईनने स्वतः ही बाब लेखक कार्ल सिलिगला सांगितली होती. एकदा ते दोन वर्षांचे असताना त्यांचे आजी-आजोबा त्यांचा घरी आले. तेंव्हा दोन वर्षांचा आपल्या नातू एक अक्षरही बोलू शकत नाही हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पत्राद्वारे आपल्या सगळ्या नातेवाईकांना याबद्दलची माहिती दिली होती.

एका रात्री सर्वजण टेबलवर बसून रात्रीचे जेवण घेत होते. जेवणातील गरमागरम सूप खाल्ल्याने आईनस्टाईनच्या जिभेला चांगलाच चटका बसला तेंव्हा त्याने ‘सूप किती गरम आहे’, असे संपूर्ण वाक्य एकदमच उच्चारले. घरातील लोक अक्षरश: आनंदाने वेडे झाले.

आईनस्टाईनच्या लहरी स्वभावाचे आणि विसराळूपणाचे किस्से सांगत असताना हा किस्सा तर आवर्जून चर्चिला जातो. नाझीवादाच्या वाढत्या प्रभावाने आईनस्टाईनने तेंव्हा जर्मनी सोडून अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी इन प्रिन्स्टन येथे शिकवत होता. विद्यापीठातून घरी जाण्यासाठी तो एका टॅक्सीत बसला. टॅक्सीवाल्याने त्याला कुठे जायचे आहे विचारले. पण, आईन्स्टाईनला स्वतःच्या घराचा पत्ताच आठवेना. मग त्यानेच टॅक्सीवाल्याला उलट विचारले, “तुला अल्बर्ट आईनस्टाईन कुठे राहतो माहित आहे का?” टॅक्सीवाला म्हणाला, “हो माहित आहे. तुम्हाला त्यांच्या घरी जायचे आहे का?” आईनस्टाईनने होकार दिला. घरी पोचल्यानंतर त्यानी टॅक्सीवाल्याला आपली खरी ओळख सांगितली. टॅक्सी ड्रायव्हरलाही आश्चर्याचा धक्का बसला.

आईनस्टाईनच्या विसरभोळेपणाचा असाच आणखी एक किस्सा सांगितला जातो. एकदा त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला त्याचा टेलिफोन नंबर विचारला. त्यावर आईन्स्टाईन जवळ पडलेल्या एका डायरीत नंबर शोधू लागला. आईनस्टाईनला स्वतःचा नंबर लक्षात नाही हे पाहून त्या सहकाऱ्याला फारच आश्चर्य वाटले. यावर त्याच्या सहकाऱ्याने त्याला विचारले, “तुम्हाला स्वतःचा नंबर लक्षात नाही?” यावर आईनस्टाईनने जबरदस्त उत्तर दिले, “ज्या गोष्टी मला पुस्तकात शोधल्यावर सापडतात अशा गोष्टी मी कशासाठी लक्षात ठेऊ?”

आईनस्टाईनने विज्ञान क्षेत्रात भरीव योगदान दिले. मात्र त्याचे व्यक्तिगत आयुष्य अगदी साधे सरळ होते. त्याच्या साधेपणाचा हा किस्सा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एकदा त्याला कोणीतरी लिफ्ट विषयी माहिती दिली. यामुळे वेळ वाचतो वगैरे कौतुकही सांगितले. ही माहिती ऐकून अल्बर्टने आपल्याही घरी लिफ्ट बसवण्याचा विचार केला आणि त्याने लिफ्ट बसवणाऱ्यांना घरी बोलावून घेतले.

लिफ्ट बसवणारे जेंव्हा आईनस्टाईनच्या घरी पोहोचले तेंव्हा ते गोंधळूनच गेले. कारण आईन्स्टाईनचे घर एकमजलीच होते. तिथे लिफ्टची काय गरज?

आईनस्टाईनने विज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती सर्वांनाच थक्क करणारी आहे. त्याचे सिद्धांत आज विज्ञानातील संशोधनासाठीचे मुलभूत सिद्धांत ठरलेले आहेत. पण, विज्ञानाचा संहारासाठी केलेला वापर पाहून त्याला खूप वेदना होत. अमेरिकेने लावलेला अणुबॉम्बचा शोध आणि त्याचा जर्मनीवर केलेला वापर पाहून तो हादरून गेला होता.

जगातील सर्व युद्धे लवकरात लवकर थांबवीत अशी त्याला भाबडी अशा होती. यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्नही केले. जगातील सर्व राष्ट्रांवर अंकुश लावण्यासाठी संपूर्ण देशांचे एकच एकत्रित सरकार असावे असे त्याचे मत होते. विज्ञानाचा वापर करून संहारक युद्धे लढणे त्याला कधीच मान्य नव्हते. विज्ञानाचा वापर शांततेसाठी व्हावा याचा आग्रह धरणारा तो एक शांतीदूत होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!