टायर बनवणारी ही कंपनी गाद्या बनवू लागली आणि यातही अव्वलस्थानी राहिली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आरामाची व्याख्या वेळेनुसार बदलत आली आहे. फक्त पाऊस, वारा यापासून वाचण्यासाठी आसरा शोधणारा माणुस घरांच्या निवाऱ्यात राहू लागला. जमिनीवर झोपणारा तो आता गादीवर झोपतो. प्रगतीची व्याख्या आता त्याच्याकडे असणाऱ्या सुखसोयींवरून केली जाते म्हणजे मोठं घर, मोठी आलीशान गाडी, घरात आरामदायी गाद्या, नोकर-चाकर.

अनेक लोकांना अगदी मऊमऊ गाद्यांवर झोपायची सवय असते. तसे तर बाजारात अनेक ब्राॅँड आहेत. आज आपण अशाच एका प्रसिद्ध ब्रँडची माहिती घेणार आहोत.

या ब्रँडचं नाव आहे डनलॉपिलो. डनलॉपिलोची गादी प्रसिद्ध झाली ती तिच्या जाहीरातींमुळे.

५० च्या दशकातील सुप्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार आणि अभिनेत्री मिना कुमारी हे या जाहीरातीत झळकत होते. अशोक कुमार यांच्या अरबी समुद्रालगत असलेल्या घरात आपल्या पुढच्या चित्रपटाची तालीम करत असताना या ब्रँडच्या उत्पादनांची जाहिरात चित्रीत केली जात होती.

डनलॉपिलोचा भारतात येण्याचा प्रवास तसा रंजकच आहे. भारतातील लोक त्यावेळी घरीच बनवलेल्या कापसाच्या गाद्या वापरत असत. खराब झाल्यानंतर कापूस बाहेर काढून पुन्हा नविन कापूस भरला जात असे. त्यामूळे डनलॉपिलोची गादी म्हणजे फक्त उच्चवर्गीय भारतीय लोकांसाठीच होती. महागड्या किंमती आणि अजुनही एवढ्या आरामदायक गाद्यांची भारतीय समाजाला नसलेली सवय यावरुन याची खरेदी फक्त श्रीमंत आणि पाश्चिमात्य राहणीमान असणारे लोकच करत असत.

ब्रँडची जाहिरातसुद्धा इंग्रजी भाषेतच चित्रीत केली होती यावरुन नेमका ग्राहक वर्ग कोणता असेल याची कल्पना आपल्याला येते. कापसाची सवय असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात लेटेक्सच्या या गाद्या खपणे जरा अवघडच होते. अशोक कुमार यांनी निवड केली म्हणजे ही गादी चांगलीच असणार अशा आशयाची ही जाहिरात उच्चभ्रू वर्गाच्या चर्चेचा विषय असायची. उच्चभ्रू वर्गात ही गादी पुढे अधिकच प्रसिद्ध झाली.

या गादीची अजुन एक रंजक बाब म्हणजे आखाती देशांमधून भारतात येणारे कित्येक व्यक्ती ही गादी घेऊनच येत असत. रेडिओ, रेकॉर्डर आणि कपडे धुण्याचे यंत्र याबरोबरच या गाद्या मोठ्या प्रमाणात आखाती देशात गेलेले भारतीय नागरिक घेऊन येत असत. भारतात त्यावेळी आयातीवर असणाऱ्या भरघोस कराचा परीणाम म्हणुन या गाद्या भारतात अतिशय महाग किंमतीत विकल्या जात.

कंपनीची सुरुवात झाली ती १९२९ मध्ये. इ.ए. मर्फी या संशोधकाने बर्मिंगहॅम येथे जानेवारी १९२९ मध्ये या गादीच्या तंत्राचा शोध लावला. वेगवेगल्या लेटेक्सच्या मिश्रणातुन एक मऊ पदार्थ तयार करत असताना त्याला ही कल्पना सुचली. 

त्याच्या बायकोने लेटेक्सच्या मिश्रणासाठी केक मिक्सर वापरण्याचा सल्ला त्याला दिला आणि त्यातूनच द्रवरुपी लेटेक्सची निर्मिती झाली. हे लेटेक्स त्याने साबण आणि मिश्रणास मदत करणाऱ्या पदार्थांत टाकले आणि १०० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात ठेवले. अशाप्रकारे पहिल्या मऊ लेटेक्सची आणि यातुनच या मऊ पदार्थाचा वापर करून डनलॉपिलोची गादी तयार झाली.

मुख्य कंपनी असलेली डनलॉप १९२६ मध्येच स्थापली गेली होती. ही कंपनी न्यूमेटीक टायर बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. हे टायर सगळ्या सार्वजनिक वाहतूकीत प्रामुख्याने वापरले जात असत. पुढे १९२९ मध्ये डनलॉपिलो या नविन विभागाची स्थापना करण्यात आली.

कंपनीने सुरूवातीला गाड्यांमध्ये लेटेक्सच्या मऊ मऊ गाद्या पुरवण्याचं काम केलं. तसंच सिनेमागृह, घरगुती गाद्या, घरगुती उशी इत्यादी साधने निर्माण करण्यास सुरुवात केली. हॉटेल्स, दवाखाने तसंच जहाजे या ठिकाणीसुद्धा ही उत्पादने वापरली जाऊ लागली.

कंपनीची प्रसिद्धी एवढी वाढली की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडने लेटेक्सचा पुरवठा खंडीत केला होता. तेव्हा उत्पादन कमी झाल्यामुळे ही गादी मिळवण्यासाठी चक्क वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक होते.

संसदेच्या इमारतींचं नविन बांधकाम पूर्ण झाल्यावर इमारतीत फक्त डनलॉपिलोची उत्पादने वापरली जावीत अशी ताकिद कंत्राटदारास देण्यात आली होती. डनलॉपिलो हा डनलॉप कंपनीचा सगळ्यात यशस्वी विभाग होता.

१९८५ मध्ये BTR plc. या लंडन मधील बहुराष्ट्रीय कंपनीने डनलॉपिलोचे हक्क आपल्याकडे घेतले. ऑकटोबर २००२ मध्ये डनलॉपिलोने आपले इंग्लंडमधील मालकी हक्क Hilding Anders या कंपनीला विकले आणि तिथुन पुढे ती डनलॉप लेटेक्स फ़ोम या नावाने ओळखली जाऊ लागली.

कंपनीचे मालकी हक्क बऱ्याच वेळी बदलले आहेत. या हातातुन त्या हातात जाणारी ही कंपनी आजही ३० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. नोव्हेंबर २००५ मध्ये कोलकातामधील रुईया समुहाने डनलॉप इंडियाचे मालकी हक्क विकत घेतले आहेत.

आजही ही कंपनी भारतातील उच्चभ्रू वर्गाला आरामदायी आयुष्य पुरवण्यात मोठा हात लावत आहे. अशोक कुमार आणि मिना कुमारीला घेऊन जाहिरात केलेल्या या कंपनीने आजही भारतात आपलं स्थान मजबूतपणे टिकवून ठेवलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!