आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
जनरल कासम सोलेमानी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्स ( IRGC) या संस्थेचा प्रमुख अधिकारी होता, जो शुक्रवारी रात्री अमेरिकेच्या हल्ल्यात बगदाद विमानतळावर मारला गेला. त्याच्यासोबतचे त्याचे ६ साथीदार देखील या कारवाईत मारले गेले.
सोलेमानी हा इराणमध्ये एक मोठा सेलिब्रिटी होता. त्याचावर श्रद्धा असणारा एक मोठा वर्ग इराणमध्ये कार्यरत होता.
त्याच्या नेतृत्त्वाखाली इराणच्या सैन्याने इराक आणि सिरीयामधील आयसिसविरोधी कारवाया केल्या. त्याने आपल्या कुशल सैन्य नेतृत्वाच्या बळावर मध्यपूर्वेत इराणचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढवला होता.
मागील २० वर्षांपासून इस्रायल, सौदी अरब आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी सोलेमानीला संपवण्याचे बरेच कट रचले पण कोणालाही यात अपेक्षित यश मिळवता येत नव्हतं. सोलेमानी प्रत्येकवेळेस हल्ल्यातून सुखरूपपणे बचावला होता. शुक्रवारी मात्र त्याला अत्यंत बेसावध अवस्थेत अमेरिकन सैन्याने कंठस्नान घातले व अखेरीस त्यांना यश मिळाले.
पण यामुळे इराणमध्ये असंतोषाची लाट उसळली असून लोक मोठ्या प्रमाणावर हत्येचा प्रतिशोध घेण्याची मागणी करत आहेत.
सोलेमानीच्या हत्येचा उचित बदला घेतला जाईल, अशी घोषणा इराणचा धार्मिक नेता आयातुल्ला खोमेनी याने केली असून इराणचे प्रमुख हसन रुहानी यांनी देखील ही चूक अमेरिकेला महागात पडेल, असं म्हणून युद्धाचे रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी इराणमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.
कोण होता कासीम सोलेमानी ?
१९९८ साली सोलेमानी यांची इराणच्या क्वाड सैन्य दलाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. त्याने लेबनॉनच्या हिज्बुल्लाशी व सीरियाच्या बशर अल असादशी इराणचे संबंध मजबूत केले आणि शिया पंथी मुस्लिमांचा एक वेगळा गट तयार केला.
गेल्या काही वर्षात त्याने इराणच्या प्रमुख धार्मिक नेत्यासोबत आपली जवळीक वाढवली होती. तो अयोतुल्ला खोमेनीच्या विशेष मर्जीतला होता.
सोलेमानीच्या नेतृत्वाखाली इराणच्या सैन्याचा मोठा विस्तार झाला. त्याने गुप्तचर यंत्रणेचा विस्तार केला. त्याने इराणच्या राजकीय आणि आर्थिक आकांक्षांचा विस्तार केला. त्याने इराणच्या सैन्याचा चेहरामोहरा बदलून त्याला अत्याधुनिक रूप प्रदान केलं. त्याला इराणी सेनेचा शिल्पकार देखील म्हटले जाऊ लागले होते.
सोलेमानीचा जन्म इराणच्या केर्मान प्रांतात झाला. त्याचा घरची परिस्थिती बेताचीच होती. वयाच्या १३ व्या वर्षी तो त्याचा कुटुंबाचा आधार बनला आणि त्याने आपल्या मोकळ्या वेळात खोमेनीच्या प्रवचनांचा प्रसार करून पैसे कमवायला सुरुवात केली.
१९७९ च्या इराणमधील क्रांतीत त्याने सहभाग नोंदवला होता.
सोलेमानीने पुढे इराणच्या सैन्यात प्रवेश केला. फक्त सहा आठवड्यांच्या तयारी नंतर त्याला अझरबैजानच्या एका प्रांतात मोहिमेला पाठवण्यात आले. त्याठिकाणी तत्याने सैन्याच्या विविध युद्धनीतीचा अभ्यास केला.
इराण आणि इराक यांच्या दरम्यान युद्ध झाले, ज्यात इराणने मोठा विजय मिळवला. सोलेमानी या विजयाचा शिल्पकार होता, यामुळे तो इराणचा राष्ट्रीय नायक म्हणून उदयास आला.
आपल्या युद्धनीतीबरोबर बुद्धीचातुर्याची ओळख त्याने वेळोवेळी जगाला करून दिली होती.
२००३ साली अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि सद्दाम हुसेनची राजवट संपुष्टात आणली, त्यानंतर इराक पुढील दोन वर्ष इराणमध्ये अराजक माजले होते. या अराजकातून सावरल्यानंतर २००५ साली इराकमध्ये नवीन सरकारची स्थापना झाली. या सरकारच्या राजकीय हालचालीवर सोलेमानीचा मोठा प्रभाव होता. त्याला पंतप्रधान जफारी आणि नुरी मालिकी यांची मोलाची साथ लाभली.
त्याने बाद्र संघटनेच्या माध्यामतून इराकच्या भूमीवर सौदी विरोधात प्रोक्सी युद्धाला सुरुवात केली. या काळात इराणची वाहतूक आणि अंतर्गत यंत्रणा त्याने इराकी मिलेटरीच्या आखत्यारीत घेऊन त्याने हे युद्ध इराकच्या भूमीवरसुरु केलं होतं. इराकवर त्याने इराणचे अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केले.
२०११ साली सिरीयामध्ये यादवी माजली आणि सोलेमानीने इराकी सैन्याला बशर अल असादच्या सरकारला वाचवण्याचा सूचना केल्या होत्या.
पुढे आयसीसच्या विरोधात जी लढाई मध्य पूर्वेत उभी राहिली, त्या युद्धात सोलेमानीचा मोठा वाटा होता. यामुळे त्याला इराणी जनतेच्या मनात आपली एक हिरो अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आले.
जर तो नसता तर अरबस्तानाच्या मोठ्या प्रदेशावर आज आयसीसची सत्ता राहिली असती.
सोलेमानीच्या मृत्युच्या अनेक अफवा आजवर उठवल्या गेलाय होत्या. २००६ साली सोलेमानी विमान दुर्घटनेत मारला गेल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. २०१२ साली दमास्कसमध्ये एका लष्करी कारवाईत तो मारला गेल्याची देखील अफवा पसरवण्यात आली होती. पण ती देखील पोकळ निघाली. आलेप्पोमध्ये असद सोबत सोलेमानी मारला गेल्याच्या अनेक अफवा उठवण्यात आल्या होत्या.
इस्त्रायलने अनेक वेळा विविध मार्गाने सोलेमानीला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यांनी ड्रोन्सच्या माध्यमातून सिरियातील सोलेमानीच्या क्वाड सैन्याचा तळावर असंख्य हल्ले केले होते. परंतु यश मिळत नव्हते.
सोलेमानीच्या विरोधात सौदी अरेबियाने देखील अनेक षडयंत्र रचले होते. अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे अमेरिकेने संधी साधून इराकच्या बगदाद येथील विमानतळावर हल्ला केला.
यात त्यांनी इराणच्या सर्वात कर्तुत्ववान अशा लष्करी नेत्याचा जीव घेतला आहे. यामुळे बऱ्याच काळापासून शांतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मध्य पूर्वेच्या अपेक्षांवर पाणी फिरणार हे मात्र नक्की..
===
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.