आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ॲडव्हान्स रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाचं एक स्वप्न होतं, जे अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर सत्यात उतरताना दिसत आहे. आद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातच ‘कॅल्क्युलेटर’चा आविष्कार झाला. पण तरीही त्याच्या काही मर्यादा आहेत.
त्यामुळे जटिल गणितं सोडवण्यासाठी व त्याचबरोबर इतर अनेक मानवाच्या कक्षेच्या बाहेरची बुद्धिमत्ता एका साधनात यावी म्हणून कॉम्प्युटरचा आविष्कार झाला. अश्या अनेक कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सना एकत्र करून मानवी आकार देण्यात आला, ज्याला ‘रोबोट’ असं म्हणतात.
मानवाच्या या आविष्कारांकडे बघून आपण थक्क होतो, पण जर एखादा व्यक्ती स्वतःच आविष्कार असेल तर? शकुंतला देवी या एका भारतीय स्त्रीला हा दर्जा मिळाला आहे. त्यांना ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणूनसुद्धा ओळखतात.
शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ साली म्हैसूर येथे एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी पिढीजात परंपरेनुसार पुजारी बनायला नकार दिला व सर्कसमध्ये काम करु लागले. शकुंतला देवी तीन वर्षांच्या असतानाच त्यांच्याकडे असामान्य बुद्धिमत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सर्कशीचं काम सोडून ते आपल्या मुलीसोबत रस्त्यावर खेळ करु लागले ज्यात ती छोटी शकुंतला अत्यंत कठिण गणितं काही सेकंदात सोडवून सगळ्यांना अचंबित करायची.
वयाच्या सहाव्या वर्षी हीच कला तिनं मैसूरच्या विद्यापीठात सादर करून दाखवली. पुढे विदेशात देखील त्यांची कीर्ती पसरू लागली. अनेक जर्नल्समध्ये त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेबद्दल लेख छापून येऊ लागले.
न्यूयॉर्क, कॅलिफॉर्निया, युरोपच्या अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांत चाचणी करण्यासाठी त्यांना बोलवलं जायचं. जोपर्यंत तज्ज्ञ गणितं कागदावर उतरवायचे तोपर्यंत त्यांचं उत्तर तयार असायचं.
तीन आकडी अंकाचं वर्ग, वर्गमुळ तोंडी सोडवणं त्यांच्यासाठी फार सोपं होत. १९५० साली, बीबीसीच्या एका मुलाखतीत त्यांना अत्यंत जटिल प्रश्न विचारण्यात आला. एका मिनटाच्या आतच त्यांचं उत्तर तयार होतं, पण कार्यक्रमातील तज्ज्ञांनी काढलेल्या उत्तराशी ते मिळतं जुळतं नव्हतं. तेच उत्तर पुन्हा तपासून बघितल्यावर लक्षात आलं की शकुंतलादेवींचं उत्तर अगदी चोख व अचूक आहे.
२०१ या आकड्याचा तेवीसावा वर्गमूळ त्यांनी ५० सेकंदात शोधून दाखवला.
१९७७ साली स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीत तेरा आकडी अंकांचा गुणाकार त्यांनी अगदी सहज करून दाखवला. १९८२ साली त्यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा आला. “गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”मध्ये त्यांच्या या विशेष बुद्धिमत्तेची नोंद झाली.
अंकासोबतचा हा प्रवास सुरू असताना त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपला जोडीदार निवडला. त्या काळात समलैंगिकतेवर बोलणंसुद्धा निषिद्ध होतं. अशा काळात एक समलैंगिक व्यक्ती त्यांनी जोडीदार म्हणून निवडला. १९६० साली पारितोष बॅनर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कलकत्ता येथे ते IAS ऑफीसर म्हणून कार्यरत होते. इथूनच त्यांना त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा विषय सापडला.
१९७७ साली ‘The World of Homosexuals’ या नावाने त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं व भारतात समलैंगिकतावर भाष्य करणारं , व अभ्यासक करून त्यांची बाजू मांडणार ते पहिलं पुस्तक ठरलं.
या पुस्तकांतला मुख्य नायक समलिंगी असून त्याचा भवती गोष्ट फिरते. समलैंगिकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन यावर त्यांनी परखड भाष्य केलेलं आहे .
त्यांच्या समस्या, त्यांचं जीवन या सगळ्या मुद्द्यावर अभ्यसात्म्क प्रकाश टाकला आहे. त्यांचंच ‘अस्ट्रोलोजी फॉर यू’, ज्योतिषशास्त्रावर आधारित हे पुस्तक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक उत्तम पुस्तक आहे.
याचसोबत अनेक कथा कादंबऱ्या देखील त्यांच्या लेखणीने साकारल्या .
पुढे राजकारणात त्यांनी उडी घेतली. १९८० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या दक्षिण मुंबई व मेदक येथून अपक्ष लढल्या.
मेदक या मतदारसंघात इंदिरा गांधी यांच्या विरोधात त्या उभ्या होत्या. ‘इंदिरा गांधीकडून मतदारांना मूर्ख बनवण्यापासून मला वाचवायचं आहे’ असं त्या म्हणत. पण या क्षेत्रात मात्र त्यांना अपयश आलं.
२३ एप्रिल २०१३ साली त्यांचं बंगलोर येथे निधन झालं. आपल्या ८३ वर्षाच्या कारकीर्दीत अनेक रोकॉर्ड्स त्यांनी आपल्या नावी केले. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.
केवळ ‘कॉम्प्युटरी बुद्धिमत्ता‘ त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी स्वतःला एक विचारवंत, लेखक म्हणूनसुद्धा आपल्या बुद्धिमत्तेची ओळख करून दिली. समाजाच्या विरुध्द दिशेने वाहण्याची त्यांनी वेळोवेळी हिंमत दाखवली. ‘तो’ किमयागार करोडो मधून एखादाच निवडतो, अशी अचंबित करणारी बुद्धिमत्ता प्रदान करतो आणि किमया घडवतो. जेव्हा सगळे मानवी आभ्यास थांबतात. तेव्हा ‘शी इस गॉड गिफ्ट’ असं म्हणण्यापलीकडे आपल्याकडे काहीही उत्तर उरत नाही.
शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २०२० साली प्रदर्शित झाला. मुख्य भूमिकेत, शकुंतला देवींची भूमिका साकारली आहे विद्या बालन यांनी. त्यांचा जीवनप्रवास फक्त भारतीयांसाठीच नव्हे संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा व अचंबित करणारा असेल यात काही शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved