आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
देशाच्या संसदेचं प्रमुख उद्दिष्ट राज्यकर्त्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घेणे हे आहे, परंतु मागील काही वर्षांपासून लोकशाहीचे मंदिर म्हणवल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये विरोध दर्शविताना अनेक अप्रिय घटना घडल्या, अनेकदा मर्यादांचं उल्लंघन देखील झालं. पण याच संसदेत एकाहून एक अर्थपूर्ण आणि भावनिक भाषणे देणारे वक्तेसुद्धा येऊन गेले.
अनेक ऐतिहासिक भाषणं देखील या संसदेत झाली, मग ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं अवघ्या काही तासांचं सरकार पडतानाचं भाषण असू द्या, किंवा, देशाचे पहिले प्रधानमंत्री नेहरूंची काही निवडक भाषणे असू द्या. या भाषणांमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचं. एकेकाळी त्यांनी ‘तीन अण्यांच्या मुद्द्यावरून’ नेहरू सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं, प्रकरण नेमकं काय होतं हे समजून घेण्याआधी राम मनोहर लोहियांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ..
राम मनोहर लोहिया स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी नेत्यांपैकी एक. विचाराने समाजवादी असले तरी कोणत्याही विचारासारणीआधी देश ठेवण्याची सद्सद्विवेकबुद्धी त्यांच्याकडे होती. लोहिया काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या (सीएसपी) संस्थापकांपैकी एक होते आणि ‘काँग्रेस सोशलिस्ट’ या सीएसपीच्या मुखपत्राचे संपादक देखील. त्यांची कार्यक्षमता पाहून जवाहरलाल नेहरूंनी १९३६ साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या परराष्ट्र विभागाचे सचिव म्हणून त्यांची निवड केली होती.
पण अवघ्या दोन वर्षांनंतरच, अर्थात १९३८ साली त्यांनी ही जबाबदारी सोडली. स्वातंत्र्योत्तर काळात, काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोहिया यांना काँग्रेस पक्षात सरचिटणीस पदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती फेटाळून लावली. देशाला एक नवा पर्याय देण्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोहिया यांच्यासह काँग्रेस सोडणारे अनेक समाजवादी नेते होते. सर्व समाजवाद्यांनी मिळून काँग्रेसमधून बाहेर पडत, समाजवादी पक्षाची स्थापना केली. नेहरूंना आव्हान देण्याचे धाडस लोहिया यांच्यात होते. देशात केवळ काँग्रेसचे वारे वाहत असतानाही लोहिया यांनी काँग्रेस सरकारला आव्हान दिले.
समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पार्टी या पक्षांनी एकत्र येऊन प्रजा सोशालिस्ट पार्टी बनेपर्यंत अर्थात १९५२ सालापर्यंत लोहिया सोशालिस्ट पार्टी पक्षाचे सदस्य बनून राहिले. परंतु किसान मजदूर प्रजा पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही आणि त्यांनी १९५६ साली सोशालिस्ट पार्टी (लोहिया) हा पक्ष सुरु केला. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत फुलपूरमध्ये नेहरूंकडून त्यांचा पराभव झाला. १९६३ साली मात्र फारुखाबाद येथील पोटनिवडणुकीनंतर लोहियांना लोकसभेत एंट्री मिळाली.
दिनांक २१ ऑगस्ट १९६३ रोजी लोहिया यांनी लोकसभेतील भाषणात काँग्रेस सरकारवर जोरदार ह*ल्ला चढवला. यावेळी देशावर प्रचंड अन्नसंकट ओढवले होते. एक दिवसापूर्वी झालेल्या कृषीमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले, “सरकार धान्योत्पादनाबाबत बोलते पण ते किती केले हे सांगत नाही. देशातील ६० टक्के लोकसंख्या दररोज ३ आण्यावर जगत आहे. एक मजूर, शिक्षक किती कमावतो? पंतप्रधानांच्या कुत्र्यावर दररोज ३ रुपये खर्च होत आहेत.“
याशिवाय त्यांनी सभागृहात इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आणि “माझे म्हणणे कोणीतरी खोटे सिद्ध करावे..” असे आव्हानही त्यांनी दिले. पुढे ते म्हणतात की, त्यांची पंतप्रधानांप्रती कोणतीच दुर्भावना नाही पण इतरांचे काय? यावेळी त्यांनी देशातील आर्थिक विषमतेवर प्रश्न उपस्थित केले.
लोहियांच्या या विधानांना पंतप्रधान पंडित नेहरूंनी कडकडून विरोध केला आणि ते म्हणाले, “नियोजन आयोगाच्या अहवालानुसार देशातील ७० टक्के लोक दररोज १५ आणे कमावत आहेत.” यावर लोहिया म्हणाले, “तीन आणे विरुद्ध १५ आणे सोडा, २५ हजाराची किंमत लाखो आणे आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर दररोज किती खर्च होतो..?”
तीन अण्यांच्या या मुद्द्यावर लोहिया पूर्ण तयारीनिशी बोलत होते. त्यांनी पंडित नेहरूंना त्यांचे दावे खोटे सिद्ध करण्याचे आव्हान दिले. लोहिया यांच्या या लढाऊ बाण्यानेच प्रचंड बहुमताने सत्तेत असलेल्या काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले होते. लोहिया संसदेत बोलत असत तेव्हा पंडित नेहरूंना प्रचंड तयारीनिशी यावं लागत असे. अनेकदा वेळ कमी पडल्यास इतर खासदार देखील आपला वेळ राम मनोहर लोहियांना देत असत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.