आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ग्लोबलायझेशन हा शब्द अलीकडे फारच परवलीचा झालाय. आपल्यापैकी अनेकांना ग्लोबलायझेशनची संकल्पना ही अत्याधुनिक आहे असे वाटत असेल, पण तसे मुळीच नाही. चीनचा इतिहासात प्रसिद्ध असलेला ‘सिल्क रूट’ देखील दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे. या सिल्क रूटच्या माध्यमातून चीन युरोप आणि जगाच्या इतर भागांमध्ये वस्तूंची निर्यात करत असे, तर अनेक विदेशी वस्तू देखील याच मार्गाने चीनमध्ये येत असत. अशाच एका ऐतिहासिक व्यापाराच्या माध्यमातून चीनमध्ये काचेचे वाईन ग्लास बनवण्याचा उद्योग सुरु झाला. नेमका काय आहे त्याचा इतिहास जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..
जगातील इतर देशांमध्ये सर्वोत्तम गुणवत्तेच्या वाईन ग्लासची किंमत सुमारे ५ डॉलर्स ते २५ डॉलर्सपर्यंत आहे. पण चीनमधील झिशन (Qixian) याठिकाणी जो काचेचा वाईन ग्लास बनतो त्याची किंमत फक्त १ अमेरिकन डॉलर आहे. झिशनमधील या वाईन ग्लासच्या उद्योगाबद्दल अनेक चिनी लोकांना देखील माहिती नाही. तरीही याठिकाणी चीनमधील एकूण वाईन ग्लासेसपैकी ९०% वाईन ग्लास बनतात. काचेच्या विविध वस्तू बनवण्याचे काम याठिकाणी गेल्या काही शतकांपासून अविरतपणे सुरु आहे.
विशेष म्हणजे १९९० पर्यंत येथील लोकांनी कधीही ना दारू पहिली होती, ना चाखली होती, तरीही इथे अशा प्रकारचे ग्लासेस मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे काम सुरु झाले. गेल्या अनेक वर्षांपासून झिशन प्रांतातील लोक व्यापार करत आहेत. सुरुवातीला याठिकाणी उत्पादित झालेला चहाची युरोपमध्ये निर्यात केली जात असे. सिल्क रूटमार्गे हे व्यापारी युरोपमध्ये जात असत.
सिल्क रुटनेच युरोपातून पुन्हा चीनमध्ये येताना या व्यापाऱ्यांनी आपल्याबरोबर आणलं ते ग्लासवेअर, म्हणजेच काचेच्या विविध वस्तू! या काचेच्या वस्तू विलोभनीय होत्या. म्हणून त्यांचा व्यापार करण्याच्या उद्देशाने झिशनमधील लोकांनी काचेच्या वस्तू बनवायला सुरुवात केली.
काचेला आकार देण्यासाठी, ती अत्युच्च तापमानावर तापवून लवचिक बनवली जाते आणि फुग्याप्रमाणे फुगवून तिला पाहिजे तसा आकार दिला जातो. या प्रक्रियेसाठी ब्लोपाइपचा वापर केला जातो. काचेच्या वस्तू बनवण्यासाठी कमीत कमी खर्च यावा यासाठी व्यापाऱ्यांनी तोंडाने हवा भरून काचेचा काच फुगवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी अनेक स्थानिक कामगारांना याचे प्रशिक्षण दिले, आणि तिथूनच झिशन हे ठिकाण काचेच्या वस्तूंसाठी जगभरात प्रसिद्ध होऊ लागले.
मध्यंतरीच्या काळात, जेव्हा कम्युनिस्ट आणि विस्तारवादी धोरण स्वीकारलेल्या ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ने अर्थव्यवस्थेवर अनेक बंधने लादली होती, तेव्हा हा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता होती. पण सुदैवाने १९९० साली चीन सरकारने अर्थव्यवस्था खुली केली, तेव्हा झिशन प्रांतातील या उद्योगाला नवसंजीवनी मिळाली.
याच वेळी अनेक युरोपियन कंपन्या आपली उत्पादन अथवा वस्तुनिर्माण प्रक्रिया चीनमध्ये स्थलांतरित करण्याच्या विचारात होत्या, याचं प्रमुख कारण म्हणजे इथे मिळणारे स्वस्त मजूर आणि इतर संसाधने. या कंपन्यांमध्ये युरोपमधील अनेक वाईन ग्लास निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा देखील समावेश होता. उच्च दर्जाचे वाइन ग्लासेस हाताने बनवून तोंडाने फुगवले जातात. यासाठी युरोपियन मजूर जास्त पैसे घेत असत, त्या तुलनेत चीनमधील मजूर अगदीच नगण्य मोबदला घेत असे.
चीनच्या झिशन या प्रांतात सुरुवातीपासूनच विकसित काच उत्पादनांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो म्हटल्यावर युरोपियन कंपन्यांच्या हाती सोन्याची अंडी देणारी कोंबडीच लागली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण तिथे सुरुवातीपासूनच काचेच्या वस्तू तयार होत असल्याने मजुरांना विशेष प्रशिक्षणाची अथवा त्यांच्यावर विशेष खर्च करण्याची अजिबात गरज नव्हती.
झिशनमधील मजूर एका दिवसांत ३०० ते ५०० ग्लासेस तयार करत असत. परंतु कार्यक्षमता आणि अचूकता वाढवण्यासाठी युरोपियन कंपन्यांनी काच फुगवण्यासाठीचे यंत्र आणले, हे यंत्र मजुरांपेक्षा ८ पट जास्त उत्पन्न घेत असे. तरीही काही निवडक वाईन ग्लास आजही हाताने तयार होतात आणि मजूरच तोंडाद्वारे फुगवतात.
सुरुवातीपासूनच चीनने उत्पादन अथवा वस्तुनिर्माण प्रक्रिया किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर विशेष भर दिल्याने आणि स्थानिक जनतेला प्रचंड उद्योगशील बनवल्याने चीनची अर्थव्यवस्था जगातील काही सर्वोत्तम अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. जीडीपी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर युआन या चिनी चलनाच्या क्रयशक्तीनुसार (पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार) आजमितीस चीन ही जगातील अव्वल अर्थव्यवस्था आहे.
प्राचीन सिल्क रूट, त्याद्वारे चालणारा व्यापार आणि त्या व्यापारांमधील सातत्य यांमुळे चीनमध्ये आज वाईन ग्लासचा उद्योग भरभराटीस आला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.