आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पाकिस्तानच्या दडपशाहीतून पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचा बांग्लादेश मुक्त झाला पाहिजे अशी इंदिरा गांधींची इच्छा होती. कारण भविष्यात भारताच्या बाजूने उभा राहील आणि भारताप्रमाणेच खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही व्यवस्था असलेला एक तरी देश हवा म्हणून त्यांनी बांगलादेशमध्ये सैनिकी कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. बांग्लादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बांग्लादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे मुजीबुर रेहमान यांची ७ जानेवारी १९७२ रोजी पाकिस्तानच्या रावळपिंड येथील लष्करी मुख्यालयातून सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयातून सुटल्यानंतर रेहमान दुसऱ्या दिवशी सकाळी लंडन येथे पोहोचले.
रेहमान बांग्लादेशमध्ये सुखरूप पोहोचावेत आणि त्यांची भेट घेता यावी यासाठी इंदिराजींनी प्रयत्न सुरु केले. त्यांनी मुजीबुर यांना लंडनहून बांग्लादेशमध्ये पोहोचवण्यासाठी भारतीय विमानाची सोय केली.
भारताच्या एअर इंडियाचे व्हीआयपी जेट विमान मुजीबुर यांना लंडनहून बांगलादेशला पोहोचवेल आणि मध्ये दिल्लीत भेटीसाठी थांबेल असे नियोजन करण्यात आले. इतक्यात त्यांच्या गुप्तहेर खात्याने अशी माहिती दिली की, मुजीबुर यांना घेऊन जाणारे भारतीय विमान हायजॅक करण्याचा कट रचला जात आहे. ही बातमी मिळताच त्यांनी तत्काळ हे नियोजन रद्द केले गेले.
त्यांनी जराही वेळ न घालवता ब्रिटनचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांच्याशी संपर्क साधला. मुजीबुर यांना लंडनहून बांग्लादेशला पोहोचवण्यासाठी ब्रिटनने आरएएफ व्हीआयपी विमानाची सोय करण्याची विनंती केली. ढाक्यात उतरण्यापूर्वी हे विमान दिल्लीत काही काळ थांबेल असेही नियोजन केले.
अत्यंत तातडीने नियोजनबद्ध करण्यात आलेला मुजीबुर रेहमान यांचा हा विमानप्रवास ऐतिहासिक होता असेच म्हणावे लागेल. ब्रिटीश पंतप्रधानांनी इंदिराजींना तत्काळ होकार दिला. मुजीबुर यांना सुखरूप बांग्लादेशमध्ये पोहोचवण्याची ही संधी इंदिराजींना अजिबात दवडायची नव्हती.
मुजीबुर यांच्यासोबत भारताच्या वतीने चर्चा करण्यासाठी आणि त्यांना या प्रवासात सोबत म्हणून एखाद्या जबाबदार व्यक्तीची निवड करणे आवश्यक होते. बांग्लादेशाबाबत इंदिराजींच्या ज्या काही कल्पना होत्या त्या मुजीबुर यांच्यापर्यंत नेमक्या शब्दात पोहोचवणे आणि त्याबाबत त्यांची सहमती मिळवणे हे एक जोखमीचे आणि जबाबदारीचे काम होते.
रॉ प्रमुख राम नाथ कौ, पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार पी. एन. हक्सार आणि परराष्ट्र सचिव टी. एन. कौल या सर्वांच्या मते भारतीय प्रशासकीय अधिकारी शशांक बनर्जी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
शशांक बॅनर्जीच का?
बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारताची मदत मिळते का याची चाचपणी करण्यासाठी म्हणून स्वतः मुजीबुर यांनी १९६२ साली शशांक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. भारताच्या वतीने मुजीबुर यांना भेटणारे शशांक बॅनर्जी हेच पहिले अधिकारी होते.
त्यांनी २४/२५ डिसेंबर रोजी शशांक बनर्जी यांच्याशी पहिली भेट घेतली. या भेटीत मुजीबुर यांच्यासोबत माणिक मिया देखील होते. माणिक मिया, हे ‘द इत्तीफाक’ या बंगाली राष्ट्रवादी वृत्तपत्राचे संपादक होते. हे वृत्तपत्र बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाचले जायचे.
तिघांचीही ही पहिलीच भेट तीन तास चालली. या भेटीत मुजीबुर यांनी आपल्याला भारताकडून काय अपेक्षा आहेत, हे अगदी स्पष्टपणे सांगितले होते. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांना भारताचा बिनशर्त पाठींबा हवा होता.
भारताकडून त्यांना जी काही मदत हवी होती ती त्यांनी एका कागदावर लिहून काढली होती. तो लिफाफा शशांक बनर्जी यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या पर्यंत पोहोचवावा अशी त्यांची अपेक्षा होती.
२५ डिसेंबर १९६२ रोजी मुजीबुर रेहमान यांनी हा लिफाफा शशांक बॅनर्जी यांच्या हाती सोपवला. हा लिफाफा स्वीकारताना, बॅनर्जींनी त्यांना थोड्याशा धाडसाने विचारले, भारताने जर त्यांना मदत करण्याचे नाकारले तर त्यांच्याकडे काही दुसरा पर्याय आहे का? तेंव्हा त्यांनी फक्त एकाच शब्दात उत्तर दिले. “नाही.”
या नंतर दहा वर्षांनी आत्ता कुठे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले होते. अखेर पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान, म्हणजेच आजचा बांग्लादेश स्वतंत्र झाला होता.
इंदिराजींच्या आधी पंडित नेहरूंनी मुजीबुर यांच्या या प्रश्नावर अनेक सल्ला-मसलती केल्या. मुजीबुर यांना पाठींबा देण्याची पंडित नेहरूंनी तयारी दर्शवली. पण, नेहरूंनी त्यांच्या समोर काही अटी ठेवल्या. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यलढा हा अहिं*सेच्या मार्गाने लढला गेला पाहिजे.
बांग्लादेशचा स्वातंत्र्यलढा हा बंगाली राष्ट्रवादाच्या तत्त्वावर आधारलेला हवा. यात धर्मनिरपेक्षतेला महत्त्व दिले गेले पाहिजे आणि ही एक बहुआयामी लोकशाही चळवळ झाली पाहिजे.
या लढ्यात सामील होणाऱ्या बांग्लादेशातील सर्व धर्म-पंथांनी अहिं*सेच्या तत्त्वाचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्ययु*द्धात मदत करण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.
त्यानंतर बॅनर्जी आणि मुजीबुर हे १९६२-१९७२ अशी दहा वर्षे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. म्हणूनच इंदिराजींनी या प्रवासात त्यांच्यासोबत शशांक बॅनर्जीच भारतीय राजदूत म्हणून प्रवास करतील असे ठरवले. लंडन ते बांगलादेश हा प्रवास तब्बल तेरा तासांचा होता. या दरम्यान फक्त दोन वेळा, सायप्रस येथील अक्रोतीरी आणि ओमान येथील आरएएफ विमानतळावर इंधन भरण्यासाठी म्हणून विमानाने थांबा घेतला.
भारतीय अधिकारी शशांक बॅनर्जी आणि बांग्लादेशचे राष्ट्रपिता मुजीबुर रेहमान यांच्या या विमानप्रवासात अनेक गोष्टींवर सांगोपांग चर्चा झाली. या चर्चेमध्ये तीन बाबी फार महत्वाच्या होत्या. ज्या शशांक बॅनर्जी यांनी नंतर एका लेखाद्वारे जाहीर केल्या.
या विमान प्रवासाच्या आठवणी लिहिताना शशांक बॅनर्जी यांनी लिहिले आहे, “एक तासभर औपचारिक गप्पा झाल्यानंतर बंगाली नेते मुजीबुर रेहमान उठून उभे राहिले आणि त्यांनी “अमार शोनार बांग्ला, आमी तोमाये भालोबाशी’ (हे माझ्या सोनेरी बंगालदेशा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे) हे गीत त्यांच्यासोबत म्हणण्याचा आग्रह केला. माझा आवाज तितकासा गोड नसतानाही मी केवळ त्यांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी उठून उभा राहिलो आणि दोघेही हे गीत गाऊ लागलो. हे गीत गाताना रेहमान यांचे डोळे पाण्याने भरले होते.”
त्यांना हे गीत बांग्लादेशचे राष्ट्रगीत म्हणून निवडायचे होते. त्यांनी याबद्दल शशांक यांचे मत विचारले, तेंव्हा शशांक बॅनर्जी यांनी मुजीबुर रेहमान यांच्या मनातील सुप्त इच्छा आपसूक ओळखली आणि ही हे गीत बांग्लादेशचे राष्ट्रगीत म्हणून घोषित केले पाहिजे असे ते म्हणाले. आपल्या मनातील इच्छा बनर्जी यांनी अचूक ओळखली हे पाहून मुजीबुर सुखावून गेले.
बांग्लादेशचे राष्ट्रगीत आणि भारतीय राष्ट्रगीत
बांग्लादेश आणि भारताला जोडणारा एक समान धागा म्हणजे बांग्लादेश आणि भारताचे राष्ट्रगीत एकाच महान साहित्यिकाच्या लेखणीतून अवतरले आहे. रवींद्रनाथ टागोर!
ज्या साहित्यिकाबद्दल दोन्ही देशांना गर्व आहे. भारताचे जन-गण-मन हे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या टागोर यांच्या शब्दांनीच बांग्लादेशला त्यांच्या स्वातंत्र्याची उर्मी दिली, ही गोष्ट भारतासाठी आणि बांग्लादेशसाठीही निश्चितच अभिमानास्पद आहे.
त्या दोघांच्या गप्पा सुरु असतानाच त्या आरएएफ व्हीआयपी विमानाचा पायलट त्या दोघांजवळ आला. अत्यंत नम्रपणे त्यांनी दोघांनाही त्यांचे फोटो घेण्याची परवानगी मिळेल का अशी विचारणा केली. दोघांनीही आनंदाने संमती देताच त्याने आपल्या कॅमेऱ्यात दोघांची छबी एकत्र टिपली.
असाच हलकाफुलका माहोल असताना शशांक यांनी बोलता बोलता मूळ आणि गंभीर विषयाला हात घातला. बांग्लादेशने संसदीय पद्धतीची लोकशाही स्वीकारावी असे मुजीबूर यांना सुचवायचे होते. शशांकनी मुजीबुर यांना संसदीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले. भारताला या शासन व्यवस्थेमुळे कसा लाभ झाला याचीही माहिती दिली.
सगळे ऐकून घेतल्यानंतर मुजीबुर यांनी क्षणाचाही विलंब न लावता यासाठी होकार दर्शवला. यामागे काही विशेष कल्पना आहे का हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती, तसे काही प्रश्नही त्यांनी लगेचच विचारले.
मुजीबुर यांनी स्वतंत्र बांग्लादेशचे पंतप्रधानपद स्वीकारावे आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अबू सइद चौधरी यांना बांग्लादेशचे राष्ट्रपती म्हणून निवडले जावे, यावरही मुजीबुर सहमत झाले. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात कायदेतज्ञ अबू सइद चौधरी यांनीही अतुलनीय योगदान दिले होते.
या सगळ्या कल्पना मुजीबुरना पटल्यानंतर बांगलादेशने संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारण्याची मूळ कल्पना इंदिरा गांधीची होती हे देखील नंतर शशांक यांनी उघड केले. इंदिरा गांधींना अध्यक्षीय शासन व्यवस्थेची प्रचंड चीड होती. शेजारच्या पाकिस्तानमध्ये अध्यक्षीय शासन व्यवस्थेमुळे सगळी सत्ता कशी एकहाती एकवटली जाते, हे त्या पाहत होत्या.
अशा शासनपद्धतीद्वारे लष्करी अधिकारी देखील कशाप्रकारे देशाची सत्ता आपल्या हातात घेऊ शकतात आणि देशात कशी लष्करी हुकुमशाही आणली जाऊ शकते, याचे पाकिस्तानच्या रुपात एक ज्वलंत उदाहरण त्या पाहत होत्या.
म्हणूनच भारतीय सीमेला लागून, भारताप्रमाणेच लोकशाही व्यवस्था असणारा आणि लोकशाही मुल्यांवर विश्वास असलेला एक तरी देश असावा, अशी इंदिराजींची दृढ इच्छा होती. बांग्लादेश स्वतंत्र झाला असला तरी भारतीय सैन्याने बांग्लादेशमधून माघार घेतली नव्हती.
इंदिराजींनी ३० जून १९७२ रोजी भारतीय सैन्य बांग्लादेशमधून माघार घेईल असे जाहीर केले होते. परंतु, मुजीबूर यांची इच्छा होती की पुढच्या तीन महिन्यात भारताने आपले सैन्य माघारी घ्यावे. त्यांचा हा निरोप इंदिराजींपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी शशांक बॅनर्जी यांच्याकडे केली. ३० जून १९७२ ऐवजी भारतीय सैन्याने ३१ मार्च १९७२ रोजी बांग्लादेशातून माघार घ्यावी अशी त्यांची इच्छा होती.
आरएएफ विमान दिल्लीत उतरताच मुजीबुर रेहमान आणि इंदिराजी यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले. या भेटीत मुजीबुर यांनी स्वतःहून सैन्य माघारीचा विषय काढला. भारताने ३१ मार्च १९७२ पर्यंत बांगलादेशमधून आपले सैन्य माघारी घ्यावे अशी विनंती केली. इंदिराजींनीही मुजीबुर यांच्या या विनंतीचा मान राखत त्यांची मागणी मान्य केली.
इंदिराजींच्या वतीने भारताचे मत मुजीबुर यांना पटवून देण्यात शशांक बॅनर्जी यशस्वी झाले होते.
शेख मुजीबुर रेहमान १० जानेवारी १९७२ रोजी ढाका येथे पोहोचले. रोमा मैदान येथे आपल्या देशाच्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. संपूर्ण मैदान ‘जोय बॉन्गो बोन्धू, जोय बांगला’च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
व्यासपिठावरून आपल्या धीरगंभीर आवाजात जमावाला उद्देशून बोलताना मुजीबुर म्हणाले, “आनंद व्यक्त करा माझ्या देशबांधवांनो. बांग्लादेश आता एक स्वतंत्र सार्वभौम देश बनला आहे.”
देश स्वतंत्र झाल्याचा हा आनंद, उत्साह आणि जल्लोषाने भरलेले ते वातावरण पाहून शशांक बनर्जी देखील भारावून गेले.
१२ जानेवारी १९७२ रोजी शेख मुजीबुर रेहमान यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. न्यायाधीश अबू सइद चौधरी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
यावेळी आपल्या भाषणाचा शेवट करताना मुजीबुर यांनी ‘जोय बांगला’ ही घोषणा दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जशी भारताला जय हिंद ही घोषणा दिली. जोय बंगला ही अगदी त्याचेच प्रतिबिंब असल्याचे भासते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.