इंडोनेशियातील या ज्वालामुखीतून निळ्या रंगाचा लाव्हा का बाहेर पडतो?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“पृथ्वीच्या गाभ्यात एक तप्त रस असतो, ज्याला लाव्हा म्हणतात. पृथ्वीच्या गर्भात सुरु असलेल्या हालचालींमुळे हा लव्हा रस सतत पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्न करत असतो.

आतील भागात होणाऱ्या शीघ्र हालचालींमुळे कधी कधी भूकवचाला तडे जातात. जमिनीला जेंव्हा अशा मोठमोठ्या भेगा पडतात तेंव्हा हा आतील तप्त लाव्हारस उसळून बाहेर येतो. ज्या ठिकाणाहून हा लाव्हा बाहेर येतो त्याला ज्वालामुखी म्हटले जाते.”

इतकी माहिती तरी शालेय स्तरावर आपण वाचलेली असते. पुढे नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी यासारख्या चॅनेलवरून हा उसळता लाव्हा नेमका कसा दिसतो हेही आपण पहिले आहे.

ज्वालामुखी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो पिवळा, केशरी रंगाचा आगीसारखा उफाळणारा लाव्हारस.

पण चक्क निळ्या रंगाचा ज्वालामुखी तुम्ही कधी पहिला आहे का? ज्वालामुखी आणि निळा रंग? काहीसे विचित्र वाटते ना? पण, इंडोनेशियाच्या बनयुवांगी प्रांतातील या ज्वालामुखीतून निळा रस वाहताना दिसत आहे.

या निळ्या रंगाच्या ज्वालामुखीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवरून प्रचंड व्हायरल होत आहे. डोंगरावरून खाली येणारा हा निळ्या रंगाचा प्रवाह पाहण्यासाठी इथे लोक जमत आहेत. रात्रीच्या वेळी तर हे दृश्य प्रचंड आकर्षक दिसते.

सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात डोंगराच्या माथ्यावर उफाळणाऱ्या ज्वालामुखीतून निळ्या रंगाचा रस बाहेर येत आहे. हा ज्वालामुखी दिवसा आणि रात्रीही निळ्या रंगाचाच दिसतो. डोंगराच्या टोकावरून खाली ओघळत येणारा हा निळ्या रंगाच्या या लाव्हाचे दृश्य रात्रीच्यावेळी तर फारच लोभस वाटते.

इंडोनेशियातील या ज्वालामुखीचे नाव आहे कावा इजेन.

डोंगरावरून खाली येणाऱ्या या निळ्या रंगाच्या ज्वालामुखीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे या ज्वालामुखी विषयी बरीच चर्चा सुरु आहे. रात्रीच्या वेळी तर याचा प्रकाश जास्तच प्रखर दिसतो. पण, यातील निळ्या रंगामागे नेमके काय रहस्य आहे, जाणून घेऊया या लेखातून.

या ज्वालामुखीतून निघणारा हा रस म्हणजे आतील लाव्हाच आहे. पण, याचा रंग निळा नाही. या ज्वालामुखीतून जो सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडतं. हे सल्फ्युरिक ऍसिड हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने त्याच्या रंग निळा होतो. पॅरीसमधील ऑलिव्हर ग्रुनेवाल्ड हा फोटोग्राफर सातत्याने या ज्वालामुखीचा अभ्यास करत आहेत.

या ज्वालामुखीचा दिसणारा हा निळा रंग काही पहिल्यांदाच दिसतोय असे नाही. या आधीही अनेकदा यातून असा निळा प्रकाश देणारा लाव्हा बाहेर ओसंडलेला आहे.

या ज्वालामुखीच्या शेजारीच आम्लीय एक तलाव आहे. या तलावातील पाण्यात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या ज्वालामुखीतून निघणारे वायू जेंव्हा या तलावातील पाण्याच्या संपर्कात येतात तेंव्हा या तलावातील पाण्याची आणि त्या वायूंची रासायनिक प्रक्रिया घडून येते.

या रासायनिक प्रक्रियेमुळे या तलावातील पाण्याचा pH ०.५ इतका होतो. यातून अजून काही वायू बाहेर पडतात आणि ते या पाण्याच्या संपर्कात आल्यावर थंड होतात. हे वायू थंड झाल्यावर या पाण्याच्या पृष्ठभागावर सल्फरचे क्षण साठलेले दिसून येतात.

द्रवरूप सल्फर जेंव्हा जळतो तेंव्हा त्याच्या ज्वाला निळ्या रंगाच्या दिसतात. हा द्रवरूप सल्फर हळूहळू पर्वत उतारावरून खाली येऊ लागतो. तेंव्हा ज्वालामुखीतून येणारा लाव्हाच खाली ओघळतोय असे दिसते.

ज्वालामुखीचा रंग हा त्याच्या तापमानावर अवलंबून असते. ज्वालामुखीतून जेंव्हा लाव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्याचे तापमान अतिशय उच्च असते. बाहेर पडताना लाव्हाचे तापमान १००० डिग्री सेल्सियस असते. या तापमानाला लाव्हाचा रंग नारंगी असतो. हळूहळू याचे तापमान कमी होईल तसतसे याचा रंग बदलत जातो.

तापमान जेंव्हा ८०० ते ६०० डिग्री असते. तेंव्हा याचा रंग गडद लाल असतो. तापमानानुसार लाव्हाचे रंग बदलत जातात. इंडोनेशियातील हा जो कावा इजेन लावा आहे, त्याचा रंगही इतर ज्वालामुखींप्रमाणेच आहे. पण त्यातील सल्फर वायू हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्याने त्यातून निळ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होत आहे.

सुरुवातीला शास्त्रज्ञांना असे वाटत होते, या कावा इजेनमधून निघणाऱ्या ज्वालामुखीच्या रंगाचा संबंध त्याच्या तापमानाशी आहे.

गेली कित्येक वर्षे वैज्ञानिकही या अनोख्या रंगाचा लाव्हारस पाहून हैराण झाले होते. परंतु, संशोधनानंतर असे आढळून आले की, याठिकाणी सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने हा लाव्हा असा निळ्या रंगाचा दिसतो.

परंतु निळ्या रंगाच्या या लाव्हामुळे हा ज्वालामुखी इतर ज्वालामुखीहून काहीसा वेगळा वाटतो. ज्यामुळे शास्त्रज्ञांसह सामान्य माणसातील कुतूहलही जागे होते.

खरेतर या ज्वालामुखीतून हा निळा रंग आताच वाहतो आहे असे नाही. तर या ज्वालामुखीचा उदय झाल्यापासून इथून निळ्या रंगाचाच लाव्हा वाहतो आहे. पण, सध्या लॉकडाऊनमुळे जगभरातील लोकं अधिकाधिक वेळ नेटवर सक्रीय आहेत. त्यामुळे या ज्वालामुखीबद्दलची चर्चा, फोटोज आणि व्हिडीओजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

यातील निळ्या रंगाची आग पाहून ही कुठल्यातरी हॉलीवूड चित्रपटातील व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरून केलेले, दृश्य असावे असेही वाटते. या ज्वालामुखीतून निघणाऱ्या निळ्या ज्वालांनी सर्वांना जास्त भुरळ घातली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!