आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पाकिस्तान हे एक धर्माधिष्ठित मुस्लीम राष्ट्र आहे, हे आपण जाणतोच. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा जसे काही मुस्लीम गटांनी भारत सोडून पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे, पाकिस्तानातील काही हिंदू ही पाकिस्तानमध्येच राहिले. पाकिस्तानमध्ये हिंदू संख्येने अत्यल्प असले तरी तिथेही हिंदूंचे अस्तित्व आहे.
पाकिस्तानमध्ये हिंदू हा अल्पसंख्य समूह असल्याने त्यांच्या मानवाधिकाराचे हनन होण्याच्या, त्यांच्यावरील अ*त्याचाराच्या घटनाही सातत्याने समोर येतात. पाकिस्तान मधील हा छोटा हिंदू समुदाय अविकसित आणि पिडीत आहे.
१९९० साली पाकिस्तानमधील हिंदूंनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत होण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वतःचा एक पाकिस्तान हिंदू पार्टी नावाचा पक्षही काढला होता. परंतु, या पक्षाला पाकिस्तानातील हिंदू जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने पक्ष दुर्बल होत गेला.
आज या पक्षाचे केवळ कागदोपत्री अस्तित्व सोडल्यास कुठलीच खुण राहिलेली नाही. हा पक्ष कुणी स्थापन केला होता आणि ती कशी गडप झाली जाणून घेऊया याचा इतिहास.
हिंदुंना देखील पाकिस्तानच्या सत्तेत वाटा मिळाला पाहिजे या भूमिकेतून हा पक्ष स्थापण्यात आला. पक्षाची स्थापना करताना नेहमीप्रमाणेच मोठा गाजावाजा झाला. या पक्षाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारे हिंदू नेते होते. जितका गाजावाजा करून या पक्षाची स्थापना झाली तितक्याच शांततेने पक्षाचे अस्तित्वही पुसून गेले.
या पक्षाची स्थापना उमरकोटचे जहागीरदार राजा राणा चंद्र सिंह यांनी केली होती. या पक्षामुळे पाकिस्तानमधील हिंदूंना त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवता येईल अशी आशा होती. पण, मान्यता हवेतच विरल्या प्रत्यक्षात, यातील एकही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे या पक्षाची नोंदणी सध्या नाही. पण, कागदोपत्री या पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. सध्या राणा चंद्र सिंह यांचे पुत्र राणा हमीर सिंह या पक्षाचे प्रमुख आहेत.
पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा अमरकोट संस्थान पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानातील हे एक मोठे आणि विस्तृत संस्थान होते. या संस्थानाची व्याप्ती २२,००० स्क्वेअर किमी परिसरात पसरली होती. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी या संस्थानिकांनी पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केली.
नंतर जुल्फिकार अली भुट्टो यांच्यासोबत मिळून राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना केली. परंतु पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय असूनही त्यांच्या वतीने आवाज उठवणारा एकही पक्ष नाही, हे राणा चंद्र सिंह यांच्या लक्षात आले.
त्यामुळे १९९० मध्ये राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टीची स्थापना केली. पाकिस्तानमधील हिंदूंची उन्नती घडवून आणणे आणि त्यांना मजबूत करणे हेच या पक्षाचे ध्येय होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हाच या पक्षाचा झेंडा होता ज्यावर ॐ लिहिले होते. या झेंड्यावर त्रिशुळाचे चिन्ह वापरण्यात आले होते.
कोण होते हे राणा चंद्र सिंह?
राणा चंद्र सिंह हे पाकिस्तानमधील अमरकोट (सध्याचे उमरकोट) हा संस्थानाचे संस्थानिक होते. ते हिंदू राजपूत होते. त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
उमरकोट मतदारसंघातून ते सात वेळा राष्ट्रीय विधानसभेत निवडून गेले होते. त्यांनीच पुढाकार घेऊन पाकिस्तान हिंदू पार्टीची स्थापना केली.
राजा राणा चंद्र सिंह दोनवेळा पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री होते. पाकिस्तान अल्पसंख्याक कमिटीचे चेअरमन देखील होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार आली भुट्टो यांचे ते खास निकटवर्तीय होते, असे मानले जायचे. २००३ साली राणा चंद्र सिंह यांचे निधन झाले.
पक्षाचे अस्तित्व संपण्याचे कारण?
राणा चंद्र सिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टीची स्थापना जरूर केली परंतु या पक्षाचे अधिकाधिक पदाधिकारी हे राणा चंद्र सिंह यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयच लोक होते. या पदाधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ आणि सरंजामी हिंदूचीच संख्या जास्त होती. या पक्षाने पाकिस्तानमधील दलित हिंदू जातींना प्रतिनिधित्व दिले नाही. या पक्षाला व्यापक जनाधार अजिबात मिळाला नाही.
शिवाय, या पक्षाला ज्या पद्धतीने सर्व हिंदुना एकत्र आणायचे होते ते स्वप्नही साध्य होऊ शकले नाही. दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीने ज्या हिंदूंना स्थानिक विधानसभा आणि राष्ट्रीय विधानसभेवर पाठवले ते स्वतः दलित हिंदू नसले तरी, त्यांचा दलित हिंदूशी संपर्क होता. त्यामुळे बहुतांश हिंदूंचा पीपीपीवर जास्त विश्वास होता. आजही पाकिस्तान मधील बहुतांश हिंदू पीपीपी पक्षाशीच जोडले गेले आहेत.
पाकिस्तान हिंदू पक्षाला निवडणुकीतही अपेक्षित यश मिळाले नाही. किमान स्थानिक विधानसभेत तरी त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तीही पूर्ण झाली नाही.
हळूहळू पक्षाचा प्रभाव क्षीण होत गेला. शेवटी तर स्वतः राजा राणा चंद्र सिंह यांनीच पीपीपीमध्ये प्रवेश केला. यानंतर मात्र पाकिस्तानमध्ये पुन्हा कधीच हिंदूचा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला नाही.
विशेष बाब म्हणजे इथे ख्रिश्चनांचे अनेक पक्ष आणि संघटना आहेत.
जसे की,
- पाकिस्तान ख्रिश्चन नॅशनल पार्टी
- ख्रिश्चन मिल्लत पार्टी
- ख्रिश्चन नॅशनल अँड लिबरेशन फ्रंट
- ऑल पाकिस्तान मासीही इत्तीहाद
- पाकिस्तान क्रिश्चियन मुव्हमेंट
- ख्रिश्चन लेबर पार्टी
- पाकिस्तान ख्रिश्चन लीग
- पाकिस्तान ख्रिश्चन कॉंग्रेस
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदुंवर अ*त्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतात. तरीही पाकिस्तान राष्ट्रीय विधानसभेत हिंदू नेते मौन बाळगून असतात. पाकिस्तानच्या सत्तेत असणारे हिंदू मंत्री हिंदुंवरील अ*त्याचाराविरोधात चकार शब्दही उच्चारत नाहीत.
हे हिंदू नेते सत्तेत असूनही हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी एक तरी हिंदू संघटना स्थापन करावी असा विचारही या हिंदू नेत्यांच्या मनात येत नाही. तिथे हिंदूंचे प्रभावी संघटन असते तर नक्कीच हिंदूंच्या सामाजिक स्थितीत परिणाम दिसून आला असता.
दुर्दैवाची बाब म्हणजे पाकिस्तानातील दलित हिंदूंची अवस्था तर अगदी दयनीय आहे. कारण उच्च जातीय हिंदूच या जातीतील हिंदूंना जवळ करत नाहीत. उच्च जातीय हिंदू हे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यामुळे दलित हिंदूंवर अधिक अ*त्याचार होतो. शिवाय त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणारी त्यांचीही एखादी संघटना अस्तित्वात नाही. त्यामुळे या हिंदूंना तिथे कुणीही वाली नाही.
राणा चंद्र सिंह यांच्यानंतर त्यांच्या मुलानेही राजकारणाचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांची प्रतिमा एक दाबंद राजपूत अशीच आहे. उमरकोट परिसरात त्यांचा विशेष प्रभाव आहे. उमरकोटचा प्रसिद्ध किल्ला त्यांच्याच मालकीचा आहे. याच किल्ल्यावर अकबराचा जन्म झाला होता.
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा तर मोठ्या दिमाखात पार पडला. थार, परकार, उमरकोट आणि मिठी या प्रांतातील हिंदू आणि मुसलमान आजही त्यांनाच आपले शासक मानतात. तेही तीन वेळा राष्ट्रीय विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.