आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असला तरी भारतात ते स्थान क्रिकेटला आहे. नव्हे, भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे आणि त्याचा सर्वोत्तम खेळाडू हा भारतीयांचा देव आहे. भारतीय संघ हा दर्जेदार फलंदाजी आणि घातक फिरकी गोलंदाजी यासाठी ओळखला जायचा. भारताचे दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर.
हे दोघेही भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचे आदर्श मानले जातात. विशेषतः भारतीय क्रिकेटमध्ये तंत्रशुद्धतेला अजूनही महत्व दिलं जातं.
मात्र, शैली, तंत्र वगैरे या सगळ्या मापदंडांना अक्षरशः पायदळी तुडवून गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची एक नवीनच बेदरकार शैली भारतीय क्रिकेटमध्ये एका खेळाडूने रुजवली. त्याचं नाव वीरेंद्र सेहवाग!
भारतीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज गोलंदाज त्यापूर्वीही होते. नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे कृष्णम्माचारी श्रीकांत. मात्र, त्याच्यासकट सगळ्या फलंदाजांना बेभरवशाचं मानलं जायचं आणि त्यात तथ्यही होतं. खेळपट्टीवर उतरायचं, फटकेबाजी करायची, भराभर धावा जमवायच्या आणि असाच एखादा उत्तुंग फटका मारताना झेल किंवा त्रिफळाबाद व्हायचं, असाच एकूण प्रकार असायचा. मोठ्या शतकी वगैरे खेळीची अपेक्षाच केली जात नसे.
मात्र, या समजुतीला धक्का दिला तो वीरेंद्र सेहवागने! सलामीला येऊन फटकेबाजी करत कित्येक शतकं त्याने अक्षरश: ठोकून काढली. त्या सर्वांचा कळस म्हणजे त्याने सन २००४ मध्ये काढलेलं कसोटी त्रिशतक!
कसोटीत भारताकडून पहिलं त्रिशतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यातून या त्रिशतकाचं आणखी महत्त्व वाढतं कारण हे ते भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आणि ते ही त्यांच्या भूमीत! मुल्तानमध्ये झालेल्या कसोटीत सेहवागने हा ‘भीमपराक्रम’ केल्याने त्याला त्याच्या चाहत्यांकडून ‘मुलतान का सुलतान’ ही पदवीही बहाल करण्यात आली.
सेहवागने हे त्रिशतक साकारलं ते ही त्याच्या भन्नाट आणि बेदरकार शैलीत. सेहवागने पहिल्या कसोटी पहिल्या डावात नाबाद २२८ धावा ठोकल्या होत्या.. भारताने पहिल्या दिवशी २ फलंदाज गमावून ३५६ धावा जमवल्या.
दुसऱ्या दिवशीच्या खेळासाठी सेहवाग मैदानात उतरला तेव्हा भारतातलेच नव्हे तर जगभरातले त्याचे चाहते आणि दर्दी क्रिकेट शौकीन त्याच्या त्रिशतकी खेळीकडे डोळे लाऊन बसले होते. सेहवागने त्यांना निराश केलं नाही.
दुसऱ्या दिवशी तो २९५ धावांवर फलंदाजी करत होता. समोरून सकलेन मुश्ताक गोलंदाजी करत होता. पुढच्याच चेंडूवर सेहवागने षट्कार ठोकला आणि त्रिशतक साजरं केलं. ते ही जोशात आणि जोमात. त्याने या डावात ३०९ धावा केल्या. मोहोम्मद सामीने त्याला तंबूत धाडलं. या खेळीची आणखी दोन वैशिष्ट्य म्हणजे या खेळीमुळे सेहवाग पाकिस्तानच्या विरोधात एका डावात सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज ठरला. दुसरं म्हणजे या कसोटीनंतर साकलेन कसोटी खेळण्यासाठी परत मैदानावर आलाच नाही.
सेहवागने वैयक्तिक आणि भारतीय संघासाठीही पहिलं त्रिशतक झळकावलं तो दिवस होता २९ मार्च. योगायोगाने ४ वर्षानंतर त्याच दिवशी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध खेळताना आणखी एक त्रिशतक झळकावलं. या डावात त्याने ३१९ धावांची खेळी केली.
सेहवागने सन २००१ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्याने आपल्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळून तब्बल ८ हजार ५८६ धावा केल्या. त्यामध्ये २३ शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट ८२ पेक्षाही अधिक एवढा विलक्षण आहे. पदलालित्य आणि शैली नसतानाही सेहवाग हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक गतीने धावा काढणारा गोलंदाज ठरला. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कारकीर्द घडवणाऱ्या या खेळाडूने टी २० या क्रिकेटच्या नव्या प्रकारातही आपला दबदबा निर्माण केला.
ज्या काळात भारतीय क्रिकेटमध्ये मुंबई, दिल्ली आणि महानगरातल्या खेळाडूंचं वर्चस्व होतं, ते नजफगढमधून आलेल्या सेहवागच्या पदार्पणाने अप्रत्यक्षपणे मोडून काढलं गेलं. सेहवाग सचिनला आदर्श मानून क्रिकेटकडे आत्कृष्ट झाला असला तरी त्यानंतरच्या काळात देशभरातल्या छोट्या-छोट्या शहरातली मुलं सेहवाग होण्याच्या निर्धाराने क्रिकेट खेळायला लागली आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हा त्याचंच फलीत ठरला.
सेहवागने खेळात यश मिळवण्यासाठी तंत्र आणि शैली यापेक्षाही उत्कटता आणि मनस्वीपणा उपयोगी पडतो हे दाखवून दिलं. फलंदाजी म्हणजे पदलालित्य दाखवणं नव्हे तर जास्तीत जास्त धावा जमवणं, ते ही जास्तीत जास्त वेगाने; हा त्याचा दृष्टिकोन होता. या ही अर्थाने धोनी त्याचा वारसदार ठरला आणि त्याने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.
सेहवाग निवृत्तीनंतरही अजून तितकाच ताजातवाना आहे. समाजमाध्यमातून तो क्रिकेटवर त्याचं परखड म्हणणं मांडतो. नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करतो. क्रीडा वाहिन्यांच्या माध्यमातून परखड भाष्य करतो. इतर खेळातल्या उभरत्या खेळाडूंची ‘उम्मीद इंडिया’सारख्या ‘टिव्ही शो’मधून प्रेक्षकांना ओळख करून देतो. हे सगळं तो मापासून करतो. मनस्वीपणा हीच सेहवागची सच्ची ओळख आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.