आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ऐतिहासिक किंवा पौराणिक महत्त्व असलेल्या ठिकाणी उत्खनन करून शेकडो वर्षांपूर्वीच्या वस्तू आणि वास्तू शोधण्याचं काम पुरातत्व शास्त्रज्ञ करत असतात हे आपल्याला माहिती आहेच. मात्र, एखाद्या वनस्पतीच्या हजारो वर्ष जुन्या बिया कुठे तरी सापडतील; इतकंच नव्हे, तर त्या रुजतील आणि त्यापासून झाड उगवेल, अशी कल्पना तरी आपण करू शकतो का?
अविश्वसनीय वाटलं तरी शास्त्रज्ञांनी इस्त्रायली वाळवंटात मिळालेल्या काही तब्बल २ हजार वर्ष जुन्या डझनभर बियांमधून रुजवून त्यापासून सात ज्यूडियन खजुराची झाडे वाढवली आहेत. खजुराच्या झाडांचा विकास, त्याच्या जनुकांमध्ये घडलेले बदल अभ्यासण्यासाठी शास्त्रज्ञांना या ‘पुरातन’ बियांपासून उगवलेल्या झाडांचा उपयोग होत आहे.
अमेरिका, अबूधाबी, इस्रायल आणि फ्रान्सच्या संशोधकांचा समावेश असलेल्या गटाने इस्राएलच्या दक्षिणेकडील लेव्हंट भागातल्या पुरातन स्थळांवरून उत्खननाच्या कामात मिळालेल्या ३५ बिया पेरल्या, त्यापैकी सात यशस्वीरित्या अंकुरित झाल्या. ‘पीएनएएस’ जर्नलमध्ये त्यांनी आपल्या अभ्यासात त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत.
ज्युडियन खजूर, फिनिक्स डॅक्टीलिफेरा ही प्रजाती खरं तर हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेलेली खजुराची प्रजाती आहे. रोमन आक्रमणानंतर व्यावसायिक पद्धतीने निर्यातीसाठी खजुराचे उत्पादन घेण्याची पद्धत हळूहळू मागे पडत गेली. त्यामुळे ज्युडियन खजूर नामशेष झाले, अशी एक मान्यता आहे. मात्र, समकालीन साधनांच्या अभ्यासावरून असं दिसून येतं की, खजूर उद्योग संपूर्ण रोमन कालावधीत जुडियामध्ये चालू होता आणि या व्यापाराने रोमन शाही खजिन्यात मोठ्या प्रमाणावर भर घातली.
आसाफ गोर यांनी आपल्या ‘हिस्ट्री ऑफ द डेट थ्रू द एजेस इन द होली लँड’ या लेखात रोमन आक्रमणामुळे खजूर नष्ट झाल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे. हवामानातील टोकाच्या बदलांमुळे खजूर आणि अन्य काही वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्याचा त्यांचा दावा आहे.
मात्र, शास्त्रज्ञांच्या करामतीने या प्रजातीचं पुनरुज्जीवन करणं शक्य झालं आहे. ही खजुराची झाडं म्हणजे जनुकीय क्रमवारीत बियाण्यांपासून उगवलेल्या सर्वात जुन्या वनस्पती आहेत असं मानलं जातंय. त्याच्या जनुकीय रचनेची आधुनिक खजुराच्या जातींशी तुलना करून संशोधकांना ही प्रजाती कालांतराने कशी विकसित झाली हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.
विशेष म्हणजे बिया हजारो वर्ष जुन्या असूनदेखील त्यांच्या आणि सध्या असलेल्या खजुरांच्या जनुकीय रचनेत कोणतेही महत्त्वपूर्ण उत्परिवर्तन झालेले संशोधनात आढळून आलेले नाही.
ज्यूडियन खजुरांची उत्पत्ती भूमध्य समुद्राभोवती झाली आणि हा खजुराचा एक लोकप्रिय प्रकार होता, असा दावा संशोधकांनी केला आहे. रोमन लेखक प्लिनी द एल्डर यांनी त्यांच्या नैसर्गिक इतिहासाच्या ग्रंथात ‘मधासारखा अत्यंत गोड स्वाद असलेला,’ असे या खजुराचे वर्णन केले आहे.
“आम्ही या २ हजार वर्ष जुन्या बियाण्यांमधून बाहेर पडलेल्या वनस्पतींच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करू शकलो. या अभ्यासात दिसून आले आहे की, त्या काळात खजुरांनी ‘फिनिक्स थिओफ्रास्टी’ या पामच्या प्रजातीपासून जनुकं घेतली आहेत,” असं या संशोधकांपैकी एक आघाडीचे संशोधक आणि अबूधाबी येथील जीवशास्त्राचे प्राध्यापक मायकेल पुरुग्गनन यांनी स्पष्ट केलं.
२ हजार वर्षांपूर्वीच मध्यपूर्वेतील खजूर जंगली क्रेटन पामसह संकरित झाल्यामुळे आता उत्तर आफ्रिकेत खजूर मोठ्या प्रमाणावर वाढले. काळानुरूप सध्या अस्तित्वात असलेल्या खजुरांमध्ये हरवलेले एक विशिष्ट प्रकारचे उपयुक्त जनुक पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या वनस्पतींमधून पुन्हा रुजवणे शक्य होईल अशी आम्हा सर्वांना आशा आहे, असं पुरुग्गनन यांनी सांगितलं आहे.
‘सीआरआयएसपीआर’ तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतींमधल्या नामशेष झालेल्या वैशिष्ट्यांना पुनरुज्जिवीत करता येईल, असंही ते म्हणाले. साधारणपणे जीवाश्मांमध्ये टिकून राहणारी जनुक कालांतराने क्षीण होत जातात. तसंच त्यांच्यात रासायनिक बदल होत जातात. त्यामुळे संशोधकांना ते मूळ स्वरूपात मिळणं अवघड जातं. मात्र, रुजण्याची क्षमता कायम असलेल्या हजारो वर्ष जुन्या बिया पुरातन स्थळांवरून परत मिळाल्यामुळे, संशोधकांना जीवाश्म वनस्पतींवर अवलंबून राहावे लागले नाही, असंही ते सांगतात.
खजुराच्या बियांचं वैशिष्ट्य हे आहे की, त्या कोरड्या आणि रखरखीत वातावरणातही टिकवून ठेवता येतात. म्हणूनच त्या हजारो वर्ष उगवू शकणारं बियाणं म्हणून त्या जिवंत राहू शकल्या असाव्या. खजुरांप्रमाणेच इतर नामशेष झालेल्या इतर काही वनस्पतींच्या जुन्या बिया परत मिळवल्या गेल्या आहेत. टिश्यू कल्चरचा वापर करून ३०, हजार वर्षे सायबेरियन बर्फाळ प्रदेशात गाडल्या गेलेल्या वनस्पतींच्या प्रजातींचं बियाणंही पुनरुज्जीवित करता आलं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या उत्साहात भर पडली असून त्यांना नामशेष झालेल्या वनस्पतींना पुनरुज्जीवित करून त्याचा अभ्यास करण्यास प्रेरणा मिळाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.