आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लायब्ररीमध्ये तीन-चार तास बसून केलेल्या अभ्यासाला गावाकडील वयस्कर मंडळींसोबत मारलेल्या निवांत गप्पांची सर येणार नाही. ही मंडळी तुम्हाला इतिहासतज्ज्ञांचा कित्येक वर्षांचा अभ्यास अगदी काही मिनिटांत सांगू शकतात, तेही अगदी सोप्या भाषेत.
असंच एकदा गावातील एका शंभरीला टेकलेल्या आजीसोबत गप्पा मारताना लग्नातील रितीरिवाजांचा विषय सुरू झाला. पूर्वी काही आदिवासी आणि भटक्या जमातींमध्ये लग्नसोहळ्यात मुलाला हुंडा म्हणून मुलीसोबत गाई, म्हशी किंवा शेळ्या दिल्या जात, असं त्या आजीनं सांगितलं. नवऱ्या मुलीकडून नवरदेवाला जितकी जास्त जनावरं मिळतील तितकं ते लग्न प्रतिष्ठित मानलं जाई.
तसं तर प्राण्यांची देवाण-घेवाण हा काही आपल्यासाठी नवीन प्रकार नाही. आजही काही खेडेगावांमध्ये आपलं जनावरं नातेवाईकांच्या दावणीला नेऊन बांधली जातात. ही परंपरा कधी सुरू झाली असावी, हा प्रश्न सहज डोक्यात आला. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुरू केलेल्या शोध मोहिमेमध्ये पहिला धागा मिळाला तो ‘माया संस्कृती’चा!
असं मानलं जातं की, आजापासून साधारण तीन हजार वर्षांपूर्वी माया संस्कृती अस्तित्वात होती. हे माया लोक प्राण्यांचा व्यापार करत असल्याचे काही पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. आजपासून तीन हजार वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे मानव आजच्या इतकी प्रगत नव्हता, असं आपण म्हणू शकतो. पण, तरीदेखील माया लोकांमध्ये प्राण्यांचा व्यापार करण्याची समज कशी आली? हे जाणून घेणं नक्कीच औत्सुकत्याचं ठरेल. पण, त्यापूर्वी आपण माया संस्कृतीची जरा तोंड ओळख करून घेऊया..
‘माया’ हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील स्थानिक लोक होते. ज्यांनी आधुनिक काळातील युकाटन, क्विंटाना रू, कॅम्पेचे, टबॅस्को, मेक्सिकोमधील चियापास, दक्षिणेकडे ग्वाटेमाला, बेलीझ, एल साल्वाडोर आणि होंडुरास या प्रदेशात वस्ती केली आहे.
माया लोक हे नाव मायापनच्या प्राचीन युकाटन शहरातून आल्याचं म्हटलं जातं. युकाटन हे शहर पोस्ट-क्लासिक कालखंडातील माया साम्राज्याची शेवटची राजधानी असल्याचं मानलं जातं. माया लोक स्वतःला वांशिकता आणि भाषांच्या आधारे वर्गीकृत करत होते. जसं की दक्षिणेकडील क्विश (Quiche) आणि उत्तरेकडील युकेटक (Yucatec).
अमेरिकन एक्सप्लोरर जॉन लॉयड स्टीफन्स आणि इंग्लिश एक्सप्लोरर व आर्किटेक्ट फ्रेडरिक कॅथरवुड यांना १८४० मध्ये पहिल्यांदा माया संस्कृतीतील अवशेषांचा पहिल्यांदाचा शोध लागला होता. त्यांच्या या शोधामुळं ‘रहस्यमय माया’ संस्कृतीबद्दल जभरातील मानववंशशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आजही मायाबद्दल लोकांच्या मनात तितकीच उत्सुकता आहे.
माया संस्कृतीबद्दल असलेल्या कुतुहलापोटी आजही अनेक संशोधक उत्तर व दक्षिण अमेरिकच्या दरम्यान असलेल्या प्रदेशामध्ये संशोधनाचं काम करत आहेत. यादरम्यान, ग्वाटेमालामध्ये असलेल्या तीन हजार वर्ष जुन्या माया साइटवर प्राण्यांची हाडं आणि दात सापडले आहेत. प्राण्यांचे हे अवशेष मायाकाळातील प्राण्यांचा व्यापार आणि व्यवस्थापनाचे पुरावे देतात.
माया लोक आपल्या महत्त्वाच्या धार्मिक समारंभांमध्ये प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात बळी देत असल्याचा निष्कर्षदेखील संशोधकांनी काढला आहे. प्राण्यांच्या बलिदानाचा समावेश असलेल्या विविध समारंभांनी माया लोकांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असावी, असं मत संशोधकांचं आहे.
प्राण्यांचा व्यापार किंवा त्यांचा बळी देणं हा विषय आपल्याला एकदम असामान्य वाटणार नाही. कारण, आजही आपण प्राण्यांचा व्यापार करतो. विशेषत: कुत्रे, मांजर, हॅमस्टर, गाई, म्हशी, बैल घोडे यांसारख्या पाळीव प्राण्यांची खरेदी-विक्री करण्यास कायदेशीर परवानगी आहे. पण, जर आपण माया संस्कृतीला या समीकरणात ठेवलं तर ही गोष्ट संपूर्णपणे वेगळ्या वळणावर जाते.
माया लोक आणि त्यावेळचा प्राण्यांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आपण प्रथम पशुपालनाचा इतिहासाचा अभ्यासला पाहिजे. आपल्याला माहित आहे की, होमो सेपियन्स या मानवानं अन्नासाठी प्राण्यांची शिकार केली. हळूहळू मानव आणखी उत्क्रांत होत गेला व प्राण्यांचा इतर कामांसाठीही वापर होऊ शकतो याची त्याला जाणीव झाली.
सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर पशुपालन सुरू झाल्याचं मानलं जातं. डुक्कर हा सर्वात पहिला पाळीव प्राणी होता.
जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी प्राणी पाळणं आवश्यक होतं गेलं. कारण वाढत्या पोटांची भूक भागवण्यासाठी प्राण्यांची संख्या वाढवणंदेखील गरजेचं होतं. त्यामुळं मानवानं पशुपालनाला सुरुवात केली. पुढे याच प्राण्यांचा वापर करून शेतीही सुरू केली. जगाच्या बर्याच भागांमध्ये वाढत्या समाजांचं पोट भरण्यात पशुपालनानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्राचीन मेसोअमेरिकेत मात्र, काहीशी वेगळी परिस्थिती होती. आढळलेले पुरावे असं दर्शवतात की, माया लोकांनी पिकांची लागवड केली. त्या तुलनेत पशुपालन मात्र फारच कमी केलं. ते कुत्री आणि टर्कीचं संगोपन करायचे.
प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, संशोधकांनी ग्वाटेमालामधील सेबाल येथे सापडलेली हाडं आणि दातांचं परीक्षण केले. ही साइट माया संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे देते. ग्वाटेमालामधील माया साईटवर सापडलेली हाडं माया लोकांच्या पशुपालनाबद्दल नवीन माहिती देतात. ही हाडं इसवीसन पूर्वी ७०० मधील असून त्यात कुत्रे आणि मांजरींच्या हाडांचा समावेश आहे.
उत्खननात सापडलेल्या विविध आयसोटॉप्सचं गुणोत्तर निश्चित करण्यासाठी संशोधकांनी चाचणी केली. हायर कार्बन आयसोटॉप्स लेव्हल हे सूचित करतं की, प्राण्यांनी त्याच्या जीवनकाळात भरपूर प्रमाणात मक्यासारख्या वनस्पती खाल्ल्या होत्या.
याचाच अर्थ माया लोक कुत्र्यांना मका खाऊ घालत होते. या आयसोटॉप सिग्नेचरनं हे देखील उघड केलं आहे की, प्राण्यांच्या अवशेषांच्या 46 संचापैकी पैकी 44 संच स्थानिक पातळीवर जन्मलेल्या प्राण्यांचे आहेत. तर दोन प्राणी सीबलच्या दक्षिणेकडील सखल प्रदेशापासून दूर असलेल्या कोरड्या डोंगराळ भागातून आले आहेत. म्हणजे, माया लोक प्राण्यांची देवाण-घेवाणदेखील करत असल्याची शक्यता समोर आली आहे.
‘प्राण्यांचे बळी देणं हा माया संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग होता. ग्वाटेमालामधील साईटवर खरोखर एक यज्ञभूमी होती. जिथे मांजर आणि कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांचे बळी दिले जात होते,’ असा प्राथमिक निष्कर्ष प्राचीन इतिहासकारांनी काढला आहे.
माया लोक प्रामुख्यानं धार्मिक कारणांसाठी प्राण्यांचा वापर करत होते. त्यांनी खाण्यासाठी किंवा शेतीसाठी प्राण्यांचा वापर फारच कमी केल्याचं अनुमान संशोधकांनी काढलं आहे. माया लोकांनी प्राण्यांचा आहारामध्ये किंवा व्यापारासाठी प्राण्यांचा जास्त वापर केला असता तर कदाचित ही संस्कृती लवकर लयास गेली नसती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.