आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या काही वर्षांपासून एका शब्दाने आपल्या सर्वांचे आयुष्य अगदी आरपार बदलून टाकले आहे. तो शब्द म्हणजे कोरोना!
नोव्हेंबर २०१९ मध्ये एका नव्या व्हायरसमुळे जन्माला आलेल्या या आजाराने संपूर्ण जग व्यापले. नावात काय आहे? असे कितीही म्हटले तरी, कोरोनाचा को जरी आपल्या कानावर पडला किंवा डोळ्यासमोर आला तरी आपले कान आपसूक टवकारतात आणि डोळे विस्फारतात.
आपल्या घरात आलेल्या नव्या सदस्याचे नामकरण आपण जितक्या उत्साहाने आणि विचारपूर्वक करतो तसेच काहीसे या रोगांचेही असते. प्रत्येक आजाराला नाव देताना त्याच्या काही वैशिष्ट्यांचा आणि लक्षणांचा विचार केला जातो.
आता कोरोनाचेच उदाहरण घ्या. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात चीनमध्ये पहिल्यांदा हा व्हायरस सापडला. पण, त्याचे अधिकृत नाव जाहीर करायला जागतिक आरोग्य संघटनेला सहा महिने लागले. प्रत्येक आजाराचे नाव ठरवताना जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा लागतो.
काही वेळेला एखाद्या आजाराशी जर त्याचे ठिकाण, व्यवसाय किंवा विशिष्ट गटाचे, संघटनेचे नाव जोडले तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जे साहजिक आहे. इतरांच्या भावना दुखावल्या जातील किंवा त्यामुळे त्यांच्यावर काही ठपका बसेल अशा पद्धतीची नावे वापरणे चुकीचे असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस घेब्रेयसिस यांनी जाहीर केले.
कारण, बऱ्याच जणांनी कोरोना व्हायरसचे नाव चीनी व्हायरस किंवा वूहान व्हायरस असे केले जावे असा आग्रह होता. अगदी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या एका ट्विटमध्ये याला चायनीज व्हायरस असेच संबोधले.
The United States will be powerfully supporting those industries, like Airlines and others, that are particularly affected by the Chinese Virus. We will be stronger than ever before!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 16, 2020
पण, यामुळे त्या देशाचा आणि देशवासियांचा एकप्रकारे अपमान केल्याची भावना निर्माण होते. कोरोनाच्या बाबतीत तर माहितीचा महापूर आला आहे. हा व्हायरस म्हणजे नैसर्गिक आजार नसून तो जैविक ह*ल्ला आहे, असेही तर्क लढवले जात आहेत.
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी या आजाराबद्दल “वुहान” आणि “चायनीज”सारखी लेबले वापरणे “पूर्णपणे चुकीचे व अयोग्य” असल्याचे म्हटले आहे.
This is not a Chinese virus or an American virus. It’s a global pandemic. Leaders have to lead & protect all people. https://t.co/1UL2RytXHp
— Amnesty International (@amnesty) March 17, 2020
खरे तर आजाराला कोणत्या नावाने संबोधतो त्यावरून आपली त्या आजाराला काय प्रतिक्रिया असणार हे निश्चित होते. १९८० मध्ये जेंव्हा एड्स किंवा एचआयव्ही या आजाराला त्याचे हे अधिकृत नाव दिले नव्हते तेंव्हा त्याला ग्राइड म्हंटले जायचे.
याचे पूर्ण रूप होते गे-रिलेटेड इम्युन डीफिसीअन्सी. या नावावरून फक्त समलिंगी संबंध असणाऱ्या व्यक्तींनाच हा रोग होतो, असा समज पसरण्याची शक्यता होती. पण, एचआयव्ही आणि लैंगिक आवडनिवड याचा दुरान्वयेही संबंध नाही. म्हणून या रोगाला शेवटी एड्स हे नाव निश्चित केले.
झिका आणि इबोलासारखी आजारांची नावे ही विशिष्ट प्रदेशावरून ठेवण्यात आली आहेत. विशेषत: झिका हे नाव युगांडाच्या झिका जंगलावरून आणि इबोला हे नाव ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो’मधील इबोला नदीवरून ठेवण्यात आले होते.
या ठिकाणी या आजारांची उत्पत्ती झाली हे समजावे या हेतूने अशी नावे ठेवण्यात आली असतील. पण काही विकसित राष्ट्रांत मात्र ‘असे रोग अस्वच्छ राष्ट्रांतच पसरतात’ असा समाज झाला. काही लोकांना तर “हे लोक” आणि “आपण” फार वेगळे आहोत असे वाटत असते. पण, आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे लवकरच युरोप आणि अमेरिकेमध्येही या रोगांचा फैलाव झालाच.
कोणता आजार कोणत्या विषाणूमुळे होतो, याचे ज्ञान जोपर्यंत मानवी समाजाला नव्हते, तोपर्यंत मात्र रोगांची असे नामकरण काल्पनिक पद्धतीनेच केले जाई. न उकळलेले आणि दुषित पाणी पिल्याने कॉलरा होतो, हे त्याकाळी माहित नव्हते. पण, कॉलरा या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो, पित्त. पोटातील असंतुलनामुळे हा आजार होतो, असा समज असल्याने त्याकाळी हे नाव देण्यात आले होते.
प्राण्यांच्या शरीरावर होणाऱ्या पिसू किंवा गोचीडासारख्या कीटकांमुळे टायफस हा अजार होतो, याची माहिती नव्हती. पण, या आजारात रुग्णाची मनोवस्था ‘अस्वस्थ’ असते, ही अस्वस्थता दर्शवणारा शब्द म्हणून या आजाराला टायफस नाव देण्यात आले.
सिफीलीससारख्या लैंगिक आजाराला तर वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नावाने संबोधले जात असे. विशेषत: प्रत्येक देशात या आजाराला परदेशी नावाने संबोधले जाई. फ्रेंच लोक याला “नेपोलियन डिसीज” म्हणत, तर इटालियन याला “फ्रेंच डिसीज” म्हणता. रशियन याला “पॉलिश डिसीज” म्हणत, आणि पॉलिश याला “जर्मन डिसीज” म्हणत.
खरे तर नंतरही या नावाला जे शास्त्रीय नाव देण्यात आले, त्यामागेही मोठी काल्पनिक कथा आहे. १५३० साली इटालियन डॉक्टर आणि कवी असणाऱ्या गिरोलामो फ्रॅकास्टोरो यांच्या एका दीर्घ कवितेतील पात्राला हा आजार झालेला असतो. या कवितेतील मुख्य पात्राचे नाव सिफिलस असते, यावरून पुढे या आजारालाच हे नाव रूढ झाले.
इन्फ्लुएंझा, ज्याला आपण सामान्यत: फ्लू म्हणतो. हा एक इटालियन शब्द आहे. याचा अर्थ होतो प्रभाव. वातावरणाच्या प्रभावाने हा रोग होतो, असा समज असल्याने याला, इन्फ्लुएंझा हे नाव देण्यात आले.
१९१८-१९२० या काळात मोठ्या प्रमाणात फ्लूची महामारी पसरली होती. अर्थात, हा सामान्य फ्लू असला तरी, याला ‘स्पॅनीश फ्लू’ म्हटले जाई. एखाद्या देशाला कमी लेखण्याचा हा एक मार्ग होता, जो अर्थातच चुकीचा होता.
पहिल्या महायु*द्धाच्या काळात या महामारीचा प्रसार वाढला होता. जर्मनी, फ्रांस, ब्रिटन आणि अमेरिकेत या फ्लूने होणारा मृतांचा आकडा कमी दाखवण्यात आला. फक्त स्पेनमध्येच ही साथ असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आणि याला स्पॅनीश फ्लू म्हटले गेले. अर्थातच, स्पॅनीश लोकांनी हे नाव कधीच स्वीकारले नाही. त्यांनी या आजाराला नेपोलियन फ्लू असे नाव दिले.
आजाराला किंवा रोगाला विशिष्ट नाव देण्यामागेही सामर्थ्याची जादू कशी लपलेली असते हे यावरून कळते. म्हणूनच आज जर एखाद्या देशात कोरोनाला चायनीज व्हायरस किंवा वूहान व्हायरस किंवा चीनी व्हायरस म्हणून संबोधले जात असेल तर याची एक झलक आपल्याला इतिहासातही पाहायला मिळते. कशा पद्धतीने आजाराचे आणि रोगाचे निमित्त करून एकमेकांना कमीपणा दिला जातो.
फक्त परकीय म्हणून हिनवण्याशिवाय अशा प्रकारे एकमेकांना दुषणे देण्यात दुसरा काहीच अर्थ नसतो. सूक्ष्म जीवाणू कोणत्याही एकाच विशिष्ट प्रदेशातील अधिवासी नसतात, त्यांना सीमांची बंधने नसतात.
आजच्या या क्षणाला आपण सारे आहोत, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. म्हणूनच अशा आजारांना नावे देताना आपण अधिक डोळस, व्यवहारी आणि विवेकी होण्याची गरज आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.