आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“क्वारंटाईन शिक्षा नव्हे, हे तर वरदान!”
“कोरोनापासून वाचवण्यासाठी स्वतःला क्वारंटाईन करा.”
“एकाच घरातील १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले.”
“क्वारंटाईनचा सदुपयोग करा.”
मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण अशा अनेक बातम्यांच्या मथळ्यापासून इंटरनेटवरील हॅशटॅगपर्यंत सगळीकडे ‘क्वारंटाईन ’ हा शब्द वारंवार ऐकत आहोत. क्वारंटाईन म्हणजे एकांतवास हे तर एव्हाना आपल्या लक्षात आले, पण काय आहे या शब्दाचा इतिहास आणि नक्की कशासाठी वापरला गेला हा शब्द?
या क्वारंटाईन शब्दाचा उगम आपल्याला घेऊन जातो थेट चौदाव्या शतकात.
इ.स. १३४७ ते १३५१ मध्ये युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये मानवी इतिहासातील सर्वांत भयंकर अशी प्लेग या संसर्गजन्य रोगाची साथ ‘Black Death’ या नावाने नोंदवली गेली. या रोगाची उत्पत्ती ‘यार्सिनिया पेस्टिस’ या विषाणूमुळे झाली.
ह्या रोगाचा उगम नक्की कुठे झाला याबाबत साशंकता असली तरी या रोगाच्या विषाणूची लागण सिल्क रुटवरील व्यापारी जहाजांवरील माणसे, खारी, उंदीर आणि माश्यांना झाली आणि त्यांच्यामार्फत पूर्व युरोपमध्ये पोहोचली आणि तिथून मेडीटेरियन समुद्रामार्गे उर्वरित युरोप, आशिया आणि आफ्रिकेमध्ये ह्या साथीने मृत्यूचे अक्षरशः थैमान घातले.
१३४७ मध्ये इटलीच्या सिसिली बंदरामध्ये १२ जहाजे आली. या जहाजांवरील जवळपास सर्व प्रवासी मृत्यू पावले होते. जे जिवंत होते ते भयंकर अशा प्लेगने आजारी होते, पस आणि दुषित रक्ताने माखलेले होते. हे लक्षात आल्यावर ही जहाजं ४० दिवस बंदरातच थांबवली गेली. जहाजे बंदरातच थांबवली गेली असली तरी खूप उशीर झाला होता. Black Death ही साथ युरोपमध्ये सर्वदूर पसरली.
क्वारंटाईन हा शब्द मूळ इटलीमधला. चौदाव्या – पंधराव्या शतकामध्ये इटलीच्या वेनेटो प्रांतामध्ये प्रचलित असलेल्या वेनेशियन भाषेतला मुळ शब्द हा ‘क्वारंटेना’ ज्याचा अर्थ चाळीस.
त्या ४० दिवसांच्या एकांतवासावरून ‘क्वारंटाईन’ ह्या शब्दाला शब्दकोषामध्ये जागा मिळाली.
तिथून पुढे विशेषतः संसर्गजन्य रोगांच्या साथीच्या काळात जहाज व त्यावरील प्रवासी यांना ते सांसर्गीक रोगापासून मुक्त आहेत असे ठरेपर्यंत विलग ठेवतात त्या काळासाठी ‘क्वारंटाईन’ हा शब्द सर्वदूर वापरला जाऊ लागला.
सहसा क्वारंटाईनच्या नियमांची अंमलबजावणी करताना नैतिक आणि व्यावहारिक बाबींचा विचार केला जातो. प्रत्येक देशामध्ये हे नियम वेगवेगळे असू शकतात.
सोळाव्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये प्लेगच्या साथीमुळे अतिशय कडक असे क्वारंटाईनचे नियम बनवले गेले. १९१८मध्ये अमेरिकेमध्ये इंफ्लूएन्झाच्या साथीमुळे तब्बल २ कोटी लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
अगदी अलीकडे १९७२मध्ये युगोस्लावियामध्ये हज यात्रेहून परतलेल्या लोकांना देवीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. युगोस्लावियाने ताबडतोब लष्करी कायदा अंमलात आणला. डॉक्टरांनी घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले. हा संसर्ग लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून अतिशय कडक असे क्वारंटाईनचे नियम करण्यात आले. योग्य अश्या नियमनामुळे ही साथ चार महिन्यात आटोक्यात आली.
अमेरिकेमध्ये नॅशनल स्पेस अँड रिसर्च अॅडमिनीस्ट्रेशन (नासा) ने त्यांच्या प्रत्येक अपोलो चांद्र मोहिमेनंतर त्यांच्या अंतराळवीरांना २१ दिवसांसाठी मोबाईल क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये ठेवले गेले होते.
दुर्दैवाने जिथे या शब्दाचा उगम झाला तो इटली देश आज कोरोनाच्या महाभयंकर विळख्यात अडकला आहे. भारतात देखील क्वारंटाईनचे नियम नीट पाळले गेले नाही तर परिस्थिती अतिशय बिकट होऊ शकते.
सध्या तरी कोरोनापासून वाचावायचे असेल तर स्वतःला क्वारंटाईन करून घ्या आणि तुमचे क्वारंटाईनमधले उद्योग आम्हांला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.